विजय दादा गोरे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत हजारो वडार बांधवांची उपस्थिती; संदिप अशोकराव कुसळकर यांची महाराष्ट्र राज्य कोर कमिटी सदस्यपदी निवड
मुंबई (प्रतिनिधी) : वीर वडार एकता फाउंडेशनच्या वतीने संस्थापक अध्यक्ष आदरणीय विजय दादा गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई येथे आयोजित करण्यात आलेली महाराष्ट्र राज्यस्तरीय अधिकारी व पदाधिकारी बैठक अत्यंत उत्साहात आणि दिमाखात पार पडली. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील विविध जिल्हे आणि तालुक्यांमधून हजारो वडार समाजबांधव, पदाधिकारी, प्रतिनिधी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याने या बैठकीला भव्य राज्यस्तरीय महामेळाव्याचे स्वरूप प्राप्त झाले होते. समाजाच्या एकजुटीचे आणि संघटनात्मक ताकदीचे दर्शन या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्राला घडले.
या बैठकीत संघटनेच्या विस्तारासोबतच समाजाच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विजय दादा गोरे यांनी वडार समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि राजकीय परिस्थितीवर परखड भाष्य केले. स्वातंत्र्यानंतर अनेक दशके उलटूनही वडार समाज विकासाच्या मुख्य प्रवाहापासून दूर असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. आजही समाजातील अनेक कुटुंबांना भटकंतीचे जीवन जगावे लागत असून, अनेक कुटुंबे बेघर आहेत. तरुणांना शिक्षणाच्या पुरेशा संधी मिळत नाहीत. समाजातील गरीब आणि सामान्य कुटुंबांना अनेक मूलभूत समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
हिरोजी इंदुलकरांच्या ऐतिहासिक योगदानाची आठवण!
वडार समाजाचा इतिहास अत्यंत गौरवशाली असून, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य उभारणीत वडार समाजाने महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे महान स्थापत्यकार हिरोजी इंदुलकर यांनी रायगड किल्ल्यासह अनेक ऐतिहासिक वास्तूंच्या उभारणीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. किल्ले, राजवाडे, रस्ते, मंदिरे आणि शिल्पकलेच्या माध्यमातून वडार समाजाने महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वैभवात मोलाची भर घातली. ज्या समाजाने आपल्या कष्टातून ऐतिहासिक वास्तू उभ्या केल्या, तोच समाज आजही हलाखीचे जीवन जगत आहे, ही अत्यंत दुर्दैवी बाब असल्याचे विजय दादा गोरे यांनी सांगितले.
प्रत्येक वाडी-वस्तीपर्यंत संघटना पोहोचविण्याचा निर्धार!
समाजाचा खऱ्या अर्थाने विकास साधायचा असेल, तर सर्वांनी आपापसातील मतभेद बाजूला ठेवून वीर वडार एकता फाउंडेशनच्या छत्रछायेखाली एकत्र येणे आवश्यक आहे, असे आवाहन विजय दादा गोरे यांनी केले. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा, तालुका, गाव, वाडी, वस्ती आणि पाड्यापर्यंत संघटनेचे कार्य पोहोचविण्याचे त्यांनी पदाधिकाऱ्यांना निर्देश दिले.
केवळ बैठका आणि भाषणांपुरते संघटनेचे कार्य मर्यादित न ठेवता समाजातील गरीब, गरजू आणि सामान्य कुटुंबांच्या प्रत्यक्ष भेटी घेऊन त्यांच्या अडचणी जाणून घ्याव्यात. शिक्षण, निवारा, रोजगार, शासकीय योजना, सामाजिक अन्याय आणि अत्याचार अशा विविध प्रश्नांवर बांधवांना मदत व आधार देण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी सक्रिय राहावे, असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले.
मी समाजाच्या प्रश्नांसाठी रात्रंदिवस झटत असून, समाजाच्या सर्व प्रलंबित अडचणी दूर करण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्न केले जातील. वडार समाजाला त्यांचे हक्क, न्याय आणि सन्मानाचे स्थान मिळवून देण्यासाठी आपण सर्वांनी एकजुटीने संघर्ष केला पाहिजे. समाजाला हक्काचे आणि उज्ज्वल भविष्य मिळवून देण्याचा आमचा निर्धार आहे, अशी ठाम भूमिका विजय दादा गोरे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केली.
संदिप अशोकराव कुसळकर यांची कोर कमिटी सदस्यपदी नियुक्ती!
या राज्यस्तरीय बैठकीचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या आणि निवडी. ज्या समाजात आपण जन्माला आलो, त्या समाजासाठी काहीतरी देणे लागतो, ही भावना मनाशी बाळगून सामाजिक कार्यात सक्रिय झालेले संदिप अशोकराव कुसळकर यांनी अल्पावधीतच संघटनात्मक कार्याचा ठसा उमटविला आहे.
वीर वडार एकता फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विजय दादा गोरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांनी अवघ्या काही दिवसांत महाराष्ट्रभर दौरे, समाजबांधवांच्या भेटीगाठी आणि संघटनात्मक संपर्क अभियानाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात समाजबांधवांना संघटनेशी जोडण्यासाठी प्रयत्न केले आहेत. समाजातील तरुणांना संघटित करणे, वाडी-वस्तीपर्यंत संघटनेचा विचार पोहोचविणे आणि समाजाच्या प्रश्नांसाठी सातत्याने कार्यरत राहणे, या त्यांच्या कार्याची दखल घेत संदिप अशोकराव कुसळकर यांची महाराष्ट्र राज्य कोर कमिटी सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली.
त्याचबरोबर गणपत पिट्टेवाड यांची वीर वडार एकता फाउंडेशनच्या महाराष्ट्र कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली. महाराष्ट्र महिला प्रदेश अध्यक्ष ललिता धनवटे या तीन नियुक्त्यांमुळे संघटनेच्या राज्यस्तरीय कार्याला अधिक गती मिळणार असून, संघटन विस्तार आणि समाजाच्या प्रश्नांवर प्रभावीपणे काम करण्यासाठी नवे बळ मिळणार आहे. या निवडीबद्दल महाराष्ट्रातील विविध स्तरांतून दोन्ही पदाधिकाऱ्यांवर अभिनंदन आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
एकजुटीतून समाजाच्या उज्ज्वल भविष्याचा संकल्प!
या बैठकीत उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी एकदिलाने काम करण्याचा संकल्प केला. समाजातील प्रत्येक घटकाला न्याय मिळावा, मुलांना शिक्षणाच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, तरुणांना रोजगाराच्या संधी मिळाव्यात, बेघर कुटुंबांना निवारा मिळावा आणि समाजाला शासनदरबारी योग्य प्रतिनिधित्व मिळावे, यासाठी संघटितपणे प्रयत्न करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी वीर वडार एकता फाउंडेशनचे महासचिव ब्रह्मा धोत्रे, सहसचिव रमेश धोत्रे, कोषाध्यक्ष नागेश चौगुले, महाराष्ट्र राज्य कोर कमिटी सदस्य संदिप अशोकराव कुसळकर, कल्याण जिल्हाध्यक्ष रामू देवकर, विशाल घुगरे, विजय आंबेकर, अविनाश आरोटे सर, उमेश शेल्हाळे, निलेश म्हात्रे, अर्जुन पवार, विजय राजबर, अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष संपत गायकवाड, धुळे येथील अरुण लष्करे, नगरसेवक तुकाराम पवार लहू पवार श्रीरामपूरचे भास्कर शिंदे, युवा उद्योजक अनिल निमसे यांच्यासह महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.
मुंबईतील या राज्यस्तरीय बैठकीतून वडार समाजाच्या एकजुटीचा नवा अध्याय सुरू झाला असून, संघटनेच्या माध्यमातून समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी राज्यभर व्यापक जनजागृती आणि संघटनात्मक चळवळ उभी राहणार असल्याचा विश्वास उपस्थित समाजबांधवांनी व्यक्त केला.
000

