shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/

About Me

वाघ्या-मुरळी समाजाच्या मागण्यांना न्याय मिळवून देण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करणार – दत्तात्रय भरणेगोतोंडी येथे राज्यस्तरीय महामेळावा उत्साहात; कृषिमंत्री भरणे यांनी समाजबांधवांशी साधला संवाद

वाघ्या-मुरळी समाजाच्या मागण्यांना न्याय मिळवून देण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करणार – दत्तात्रय भरणे

गोतोंडी येथे राज्यस्तरीय महामेळावा उत्साहात; कृषिमंत्री भरणे यांनी समाजबांधवांशी साधला संवाद
गोतोंडी, ता. इंदापूर : वाघ्या-मुरळी समाजाच्या विविध समस्या आणि प्रलंबित मागण्यांची शासनस्तरावर दखल घेऊन त्यांच्या पूर्ततेसाठी आवश्यक तो पाठपुरावा करण्यात येईल, अशी ग्वाही राज्याचे कृषिमंत्री तथा इंदापूरचे आमदार ना. दत्तात्रय भरणे यांनी दिली.

गोतोंडी येथे वाघ्या-मुरळी परिषद, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय महामेळाव्यास ना. दत्तात्रय भरणे यांनी उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी समाजबांधवांशी संवाद साधत त्यांच्या विविध समस्या, अडचणी आणि मागण्या जाणून घेतल्या.

या महामेळाव्यात वाघ्या-मुरळी समाजाच्या वतीने विविध मागण्या मांडण्यात आल्या. या मागण्यांची भरणे यांनी गांभीर्याने दखल घेत समाजाच्या न्याय्य मागण्या शासनदरबारी मांडून त्या मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील राहण्याची ग्वाही दिली. समाजाच्या प्रश्नांकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहून त्यावर योग्य तोडगा काढण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

वाघ्या-मुरळी समाज हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेचा महत्त्वपूर्ण घटक आहे. या समाजातील बांधवांना सन्मानाचे जीवन जगता यावे, त्यांना शैक्षणिक संधी उपलब्ध व्हाव्यात, सामाजिक सुरक्षा मिळावी तसेच समाजाचा सर्वांगीण विकास होऊन त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात स्थान मिळावे, यासाठी शासनाच्या माध्यमातून प्रयत्न करण्याची भूमिका भरणे यांनी यावेळी व्यक्त केली.

समाजाच्या विविध प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आणि त्यांच्या हक्कांच्या मागण्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या या राज्यस्तरीय महामेळाव्याला समाजबांधवांचा मोठा प्रतिसाद लाभला.

यावेळी वाघ्या-मुरळी परिषदेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. मार्तंड साठे सर, परिषदेचे पदाधिकारी, समाजातील ज्येष्ठ मंडळी, कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने वाघ्या-मुरळी समाजबांधव उपस्थित होते.
close