shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पुण्यतिथीनिमित्त वृक्षारोपणातून नानांच्या स्मृतींना अनोखी आदरांजली..

शरद उद्धव दरंदले यांच्या पाचव्या पुण्यतिथीनिमित्त महेश दरंदले व मित्रपरिवाराचा स्तुत्य उपक्रम; लावलेली झाडे जगविण्याचाही संकल्प

प्रतिनिधी मोहन शेगर 
सोनई : आयुष्यात माणूस अनेक गोष्टी कमावतो; मात्र आपल्या यशाच्या प्रवासात आपली माणसं सोबत नसल्याची उणीव कायम मनाला जाणवत राहते. अशाच भावनिक वातावरणात शरद उद्धव दरंदले यांच्या पाचव्या पुण्यतिथीनिमित्त त्यांचे स्मरण करत महेश शरद दरंदले व मित्रपरिवाराने वृक्षारोपणाचा सामाजिक उपक्रम राबवून नानांच्या स्मृतींना अनोखी आदरांजली अर्पण केली.

आज नानांना आपल्यातून जाऊन पाच वर्षे झाली. त्यांच्या आठवणी आजही कुटुंबीयांच्या आणि मित्रपरिवाराच्या मनात जिवंत आहेत. नाना नेहमी सांगायचे की, 'आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो. त्यामुळे समाजासाठी आपण काहीतरी केले पाहिजे.' नानांनी दिलेल्या याच सामाजिक विचारांचा वारसा पुढे नेत महेश दरंदले यांनी मित्रपरिवाराच्या सहकार्याने वृक्षारोपणाचा संकल्प केला.
या उपक्रमांतर्गत रामझिरा मंदिर व महादेव मंदिर परिसरात पिंपळ, वड, उंबर, कळंब, पळस, खैर, अर्जुन, साताड, बेल आदी विविध आयुर्वेदिक व पर्यावरणपूरक वृक्षांची लागवड करण्यात आली.
विशेष म्हणजे केवळ वृक्षारोपण करून न थांबता लावलेली सर्व झाडे मित्रपरिवाराच्या माध्यमातून नियमित देखभाल करून जगविण्याचाही संकल्प करण्यात आला आहे.
नानांच्या पाचव्या पुण्यतिथीनिमित्त राबविण्यात आलेला हा उपक्रम केवळ श्रद्धांजली नसून त्यांच्या सामाजिक विचारांना कृतीतून दिलेली खरी मानवंदना ठरत आहे. एखाद्या व्यक्तीच्या स्मृती जपताना समाज आणि पर्यावरणासाठी विधायक कार्य करण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला आहे.
०००
close