नीरा नदीमध्ये भाटघर धरणातून पाणी सोडावे; हर्षवर्धन पाटील यांची मागणी
नीरा डावा व खडकवासला कालव्यातून ‘टेल टू हेड’ पद्धतीने आवर्तन सोडण्याची मागणी; शेटफळ तलावातूनही तातडीने पाणी सोडण्याची अपेक्षा
इंदापूर : प्रतिनिधी | दि. २६ ऑक्टोबर २०२६
इंदापूर तालुक्यासह नीरा नदीकाठच्या गावांमध्ये निर्माण झालेली पाणीटंचाई लक्षात घेऊन भाटघर धरणातून नीरा नदीपात्रात पाणी सोडावे, तसेच नीरा डावा कालवा व खडकवासला कालव्यातून ‘टेल टू हेड’ पद्धतीने आवर्तन सुरू करावे. याशिवाय शेटफळ हवेली तलावातूनही तातडीने आवर्तन सोडण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष तथा माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केली आहे. कालवा सल्लागार समितीच्या आगामी बैठकीत या मागण्यांवर सकारात्मक निर्णय होण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
यासंदर्भात हर्षवर्धन पाटील यांनी उपमुख्यमंत्री व पालकमंत्री सुनेत्राताई पवार, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, पुणे पाटबंधारे मंडळाचे मुख्य अभियंता संजीव चोपडे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, अधीक्षक अभियंता प्रवीण कोल्हे आणि कार्यकारी अभियंता दिगंबर डुबल यांच्यासह संबंधित अधिकाऱ्यांना पत्र पाठविले आहे. चालू महिन्याच्या अखेरीस होणाऱ्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत या मागण्यांवर चर्चा होऊन निर्णय होण्याची अपेक्षा असून, या बैठकीला हर्षवर्धन पाटील हेही उपस्थित राहणार आहेत.
नीरा नदीपात्रात तीन टीएमसी पाणी सोडण्याची मागणी
सध्याच्या दुष्काळी परिस्थितीत पाण्याचे काटेकोर नियोजन करणे आवश्यक आहे. नीरा नदीपात्र कोरडे पडल्यामुळे नदीकाठच्या गावांमधील नळ पाणीपुरवठा योजनांवर परिणाम झाला असून, जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा आणि चाऱ्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे.
या पार्श्वभूमीवर भाटघर धरणातून नीरा नदीपात्रात सुमारे तीन टीएमसी पाणी सोडण्यात यावे. तसेच नदीवरील बंधाऱ्यांचे तीन ढापे अडविण्यात यावेत, अशी मागणी हर्षवर्धन पाटील यांनी केली आहे. या निर्णयामुळे फलटण, बारामती, इंदापूर आणि माळशिरस तालुक्यांतील नदीकाठच्या गावांमधील नागरिकांना तसेच पशुधनाला पिण्याच्या पाण्यासाठी दिलासा मिळेल. त्याचबरोबर चारा उपलब्ध होण्यासही मदत होईल, असे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.
कालव्यांमधून टेल टू हेड पद्धतीने आवर्तन सोडावे
नीरा डावा कालवा आणि खडकवासला कालव्यातून इंदापूर तालुक्यापासून ‘टेल टू हेड’ पद्धतीने तातडीने आवर्तन सोडण्यात यावे, अशी मागणीही करण्यात आली आहे. या पद्धतीने पाणी सोडल्यास कालव्याच्या लाभक्षेत्रातील गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची उपलब्धता वाढण्यास आणि जनावरांसाठी चारा निर्मितीस मदत होऊ शकते.
शेटफळ तलावाच्या लाभक्षेत्रातील दहा गावांना दिलासा द्यावा
इंदापूर तालुक्यातील शेटफळ हवेली तलावामध्ये सध्या पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. मात्र, या तलावाच्या लाभक्षेत्रातील दहा गावांमध्ये गेल्या पाच महिन्यांपासून आवर्तन सोडण्यात आलेले नाही. त्यामुळे या गावांमधील नागरिक आणि पशुधनाच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे.
या पार्श्वभूमीवर शेटफळ हवेली तलावातून तातडीने आवर्तन सुरू करून नागरिकांना आणि जनावरांना पिण्याच्या पाण्याची उपलब्धता करून द्यावी, तसेच चारा निर्मितीसाठी आवश्यक पाणी द्यावे, अशी मागणी हर्षवर्धन पाटील यांनी केली आहे.
पाणीटंचाईची तीव्रता लक्षात घेता या सर्व मागण्यांवर कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत सकारात्मक निर्णय होऊन नदीकाठच्या आणि कालव्याच्या लाभक्षेत्रातील गावांना दिलासा मिळेल, अशी अपेक्षा हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केली आहे.

