शिर्डी प्रतिनिधी:
कु.किरण जाधव
चोवीस तास सुरू असलेले गाव अशी विश्वात ओळख असलेल्या साईनगरीत रविवारी आणि सोमवारी (दि.२२ मार्च, दि.२३ मार्च) जनता संचारबंदीच्या निमित्ताने अभुतपूर्व सन्नाटा अनुभवायला मिळाला. सतत गजबजलेला परिसर बघण्याची सवय झालेल्या नेत्रांना आजची शिर्डी स्वप्नवत व अविश्वसनीय भासत होती.
वर्षाकाठी तीन कोटी तर रोज लाखभर भाविकांची वर्दळ असलेल्या शिर्डीतील रस्ते दोन दिवस निर्मनुष्य झाले.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला शिर्डीत " ना भुतो, ना भविष्यती.." असा प्रतिसाद मिळाला. कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी गेल्या चार दिवसांपासून शिर्डीतील साईमंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले आहे. त्यानंतर जिल्हा प्रशासनानेही दोन दिवसांपासून शहरातील उद्योग, व्यवसायही बंद ठेवण्याचे आदेश दिलेले आहेत. त्यामुळे शिर्डीतील रस्त्यांनी, गल्ली-बोळांनी अगोदरच मोकळा श्वास घेतला होता. आजच्या जनता कर्फ्यूने मात्र चोवीस तास जीवंतपणा अनुभवणा-या संपूर्ण शहराचा श्वासच थांबलेला दिसला.
दिवस-रात्र भाविकांच्या व वाहनांच्या गर्दीने ओसंडून वाहणा-या रस्त्यावर चक्क भयाण शुकशुकाट झाला होता. मंदिर परिसरच नव्हे तर महामार्गावरही अभुतपूर्व शांतता अनुभवायला मिळाली. साईमंदिरातही केवळ पुजा-यांनी बाबांची आरती केली. एरव्ही भाविकांनी फुललेला मंदिर परिसर, साईनामाचा जयघोष करणारे अनेक भाविक, भाविकांच्या मागे लागलेले कमिशन एजंट, भिकारी, मंदिराच्या स्पीकरवरून गर्दीत हरवलेल्या व्यक्तींच्या नावांचा पुकारा, वाहनांचे हॉर्न, हातविक्री करणा-या मुलांची आरडाओरड, दुकानातील रेकॉर्ड, गर्दीतुनही प्रवासी गोळा करीत फिरणारी खासगी वाहने, पाण्याचे टँकर हे सर्व आज शिर्डीच्या कॅनव्हास वरून नाहीसे झालेले होत़े.


