- कृपया गरीब गरजूंच्या गरिबीची अशी क्रूर चेष्टा करू नका सामाजिक प्रतिक्रिया !!
बोरघर / माणगांव ( विश्वास गायकवाड )
संपूर्ण जगभरात आणि भारतात महामारीचे तांडव माजवून सर्वत्र हाहाकार माजवणार्या कोरोना व्हायरस या संसर्गजन्य महाभयंकर रोगाच्या पार्श्वभूमीवर कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी भारत सरकारने संपूर्ण देशात १४ एप्रिल पर्यंत लाॅकडाऊन घोषित केले आहे. त्यामुळे संपूर्ण देशात सर्वत्र संचारबंदी लागू केली आहे.
लाॅकडाऊन संचारबंदीच्या काळात संपूर्ण देशातील सर्व नागरिकांच्या संचार स्वातंत्र्यावर शासनाने कडक निर्बंध लावले आहेत. त्यामुळे कामधंदा, नोकरी, रोजीरोटी मिळवण्यासाठी आपल्या घरापासून, गावापासून, तालुक्यापासून, जिल्ह्यापासून आणि राज्यापासून व देशापासून दूर असलेल्या लोकांना कोरोना व्हायरसची संक्रमण साखळी आणि त्याचा संसर्ग होऊ नये म्हणून सुरक्षेच्या दृष्टीकोनातून जिथे आहेत तिथेच त्या त्या ठिकाणी शासनाने त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था त्याच ठिकाणी करून त्यांना स्थानबद्ध केले आले आहे. या साठी भारत सरकार आणि महाराष्ट्र शासन त्यांच्या आहाराची व आरोग्याची सर्वोतोपरी काळजी घेत आहे. त्याचप्रमाणे दुसरीकडे काही सामाजिक, धार्मिक संघटना आणि काही निस्वार्थी दानशूर मंडळी यांच्या कडून निस्वार्थी वृत्तीने मदतीचा ओघ सुरू झाला आहे. तर काही ठिकाणी या आपत्कालीन परिस्थितीचा व गरीब गरजूंच्या गरिबीचा गैरफायदा घेऊन त्यांना अत्यल्प स्वरूपाची मदत करून त्यांना मदत करताना आपल्याला हवे तसे त्यांचे फोटो आणि व्हिडिओ घेऊन ते सोशल मीडियावर आणि प्रसार माध्यमांकडे प्रसिद्धीस देऊन गरीब गरजू लोकांच्या भावनांशी खेळून त्यांच्या गरिबीची क्रुर चेष्टा करत आहेत हे अत्यंत चुकीचे आहे. ते त्यांनी थांबवले पाहिजे अशा प्रतिक्रिया समाजातून सर्वत्र उमटत आहेत.
देशावर आलेल्या या राष्ट्रीय आपत्तीचा सर्वार्थाने सामना करण्यासाठी आपल्या सामाजिक, धार्मिक आणि नैतिक मानवतावादी जबाबदारीची जाणीव ठेवून सरकारला या आपत्तीच्या काळात आपापल्या परीने सर्वोतोपरी मदत करण्यासाठी देशातील राष्ट्रप्रेमी छोटे मोठे उद्योजक, चित्रपट सृष्टीतील सिने कलाकार, आमदार,खासदार, मंत्री, दानशूर व्यक्ती आणि सामाजिक आणि धार्मिक संघटना व समाजातील काही दानशूर व्यक्ती अत्यंत निस्वार्थी भावनेने आपल्या नैतिक जबाबदारीची जाणीव ठेवून समाजातील गोरगरीब गरजूंना आर्थिक व इतर स्वरूपाची सर्व मदत करण्यासाठी पुढे सरसावल्या आहेत. त्या सर्वांचे मनापासून हार्दिक अभिनंदन व आभार. पण दुसरीकडे काही स्वार्थी दिखाऊ आणि सोशल मीडियाच्या व प्रसार माध्यमांच्या माध्यमातून कायम प्रसिद्धीची लालसा असलेले दांभिक लोक गरीब गरजूंना किलो दोन किलो वस्तू देऊन स्वतः च्या प्रसिद्धीसाठी या गरीब गरजूंच्या गरिबीचा फायदा घेऊन आपल्याला हवे तसे हवे तेवढे फोटो घेऊन ते वाॅट्सअप, फेसबुक सारख्या सोशल मीडियावर आणि प्रसिद्धी माध्यमांना प्रसिद्धीस देऊन त्या गरिबांच्या मजबूरीची व गरिबीची क्रूर चेष्टा करत आहेत अशा प्रतिक्रिया जनमानसातून सर्वत्र येताना दिसत आहेत.
संपूर्ण लाॅकडाऊन कालावधीत लोकांनी कोणत्याही परिस्थितीत अत्यावश्यक कामाशिवाय घरातून बाहेर पडू नये. शासनाच्या माध्यमातून आपल्याला जीथे आहात तिथे सर्व प्रकारची मदत केली जाईल. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या माध्यमातून ज्या ज्या सूचना देण्यात आल्या आहेत त्यांचे आपण सर्वांनी तंतोतंत व काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे. असे केले तरच आपण कोरोना व्हायरसच्या विरोधातील ही लढाई जिंकून कोरोना व्हायरसचे आपल्या देशातून समूळ उच्चाटन करू शकतो अन्यथा नाही.
समाजातील सर्व सामाजिक, धार्मिक संघटना, सामाजिक संस्था आणि दानशूर व्यक्ती यांनी गरीब गरजू लोकांना या राष्ट्रीय आपत्तीच्या काळात जरूर मदत करावी. आणि ते सद्य परिस्थितीतगरजेचे देखील आहे. मात्र काही स्वार्थांध प्रसिद्धीस हापापलेले दांभिक लोक स्वतः च्या प्रसिद्धीसाठी गरीब गरजू जनतेच्या मजबूरीचा गैरफायदा घेऊन त्यांना किलो दोन किलोची अत्यल्प मदत करून त्यांना मदत देतातानाचे आपल्याला हवे तसे फोटो, व्हिडिओ शूट करून ते सोशल मीडियावर व्हायरल करून त्यांच्या गरिबीची क्रूर चेष्टा करत आहेत हे अत्यंत चुकीचे आहे. त्यामुळे कृपया कोणीही असे करू नका हीच अपेक्षा.


