shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

🤼‍♀ आज या कुस्तीला ९२ वर्ष पूर्ण होत आहेत.

कोल्हापूर: (सुनिल  चौगले)
३ मे, १९२८ साली एक ऐतिहासिक कुस्ती कोल्हापुरच्या खासबाग मैदानात ठरली. उत्तरेतील एक महान मल्ल पै.चिराग गुजर कोल्हापुरातील मल्लाना आव्हान द्यायला उत्तर जिंकून आला होता. 6 फुट ८ इंच उंचीचा आणि १३० किलो वजनाचा चिराग गुजर इतका देखणा मल्ल होता कि त्याला खास पहायला लोकांची वर्दळ उडायची.
एका दमात १० हजार जोर मारण्याचा त्याचा विक्रम होता..!



चिराग गुजर विषयी कितीतरी आख्यायिका बोलल्या जातात. कोण म्हणत असे कि रात्री १ ला उठून सकाळी ७ पर्यंत हा व्यायाम करे तर कोण म्हणे की बाभळीचे झाड केवळ बाहुबलावर उपटून काढत असे. असा चिराग कोल्हापुरात आला आणि राजर्षी राजाराम महाराज यांच्या खासगीत उतरला. राजांनी तात्काळ साऱ्या मल्लांची बैठक घेऊन चिरागशी कोण लढणार असा प्रश्न केला. सर्व मल्ल व वस्ताद एकामेकाच्या तोंडाकडे पाहू लागले. एक काळारोंब पहाड हत्तीच्या चालीने सामोरा झाला आणि राजाराम महाराजाना मुजरा करत बोलला कि ”मी लढतो!"

तो होता व्यंकाप्पा बुरुड! सर्वजन टाळ्या वाजवू लागले. आणि ही ऐतिहासिक लढत ठरली ३ मे, १९२८ साली राजर्षी शाहू खासबाग मैदानात. व्यंकाप्पाने चिरागशी चार हात करायचे आव्हान स्वीकारले. मात्र ही लढत एवढी सोपी नव्हती. उत्तरेतील जगज्जेत्या गामाच्या कितीतरी पठ्ठ्याना या चिरागने कडवे आव्हान दिले होते. इकडे कोल्हापुरात मात्र व्यंकाप्पांचा सराव सुरु झाला. व्यंकाप्पांची मेहनत मोजायला राजाराम छत्रपती महाराजानी एक वयोवृध्द ब्राम्हण कारभारी ठेवला. त्याचे एवढेच काम की सकाळी आणि संध्याकाळी एका वहीत व्यंकाप्पांची मेहनत मोजून लिहून ठेवायची आणि व्यंकाप्पांला दररोज मालिशवाले, खुराक, दूध, विश्रांती किंवा जे जे काही लागेल ते पुरवायचे.

व्यंकाप्पा पहाटे ३ वाजता उठून अंघोळ आटोपून लंगोट लावून पळून यायचे. साधारण १ तास धावणे झाले की लाल आखाड्यात येऊन ३ हजार जोर, ३ हजार सपाटे आणि ३ हजार बैठका इतका व्यायाम करायचे. व्यायाम संपायला सकाळचे ८ वाजत असत. ८ नंतर न्याहरी, ज्यामध्ये तुपातला शिरा, गव्हाची चिक्की, फळे आणि २ लिटर थंडाई असायची! १० वाजले की झोपायला लागायचे.

दुपारी १२ वाजता उठून तुपातले जेवण आणि २ लिटर दुध पिऊन १.३० वाजता पुन्हा झोप. बरोब्बर ३.३० वाजता उठून लढतीला प्रारंभ व्हायचा. १०० किलोच्या वर वजने असलेली धिप्पाड पैलवान मंडळी साऱ्या हिंदुस्थानातून लढतीला आणली होती. सायंकाळी ७ पर्यंत लढती संपायच्या. आंघोळी आवरल्या जायच्या. ७ ते ८ पर्यंत २ लिटर थंडाई. ८ ला महाराज साहेब स्वतः आखाड्यात येत. सोबत आहार, व्यायाम यात पारंगत असणारी दिग्गज माणसं सोबत आणंत. त्याबरोबर कुस्तीतील जाणती मंडळीही असायची.

८ ते ९ पर्यंत व्यंकाप्पांशी आहार, कुस्ती यावर चर्चा होत असे. चिरागच्या कुस्तीचे बारकावे आणि तोडी यावर सखोल अभ्यास होत असे. काय हवे नको ते विचारपूस करत व्यंकाप्पांना प्रोत्साहन देऊन महाराज साहेब निघून जात. तद्नंतर जेवण होई. कधी कधी महाराज साहेब जातीने जेवायला थांबत असत. असा जवळपास ३ महिने अविश्रांत घाम गाळून व्यंकाप्पा पहाडी ताकतीचे बनले आणि तो दिवस उजाडला!

३ मे १९२८. वैशाखातील सूर्य कोल्हापूरावर आग ओकत होता. मात्र या आगीलाही फिके वाटावे असे तेज व्यंकाप्पांच्या चेहऱ्यावर तळपत होते. एक आठवडा आधी उत्तरेतील तो महान मल्ल आपल्या लवाजम्यासह कोल्हापूर नगरीत आला होता. महाराज साहेबानी त्याची चोख व्यवस्था केली होती. त्याचीही तयारी पूर्ण झाली होती. हिंदुस्थानच्या सर्व संस्थांचे राजे, ब्रिटीश अधिकारी आणि लाखो कुस्ती शौकीन सकाळपासून खासबागच्या वाटेला लागले होते. त्याकाळी तिकीट असावे असा अंदाज आहे मात्र नेमकी माहिती नाही.

लहानमोठ्या कुस्त्यांना सकाळपासून प्रारंभ झाला. मुख्य कुस्ती अंदाजे ५ च्या दरम्यान मैदानात आली. शिंग-तुताऱ्यांच्या ललकारीत व्यंकाप्पांसह चिरागचे आगमन झाले. टाळ्यांच्या कडकडाटीने खासबाग दणाणून गेले होते. महाराज साहेबाना मुजरा करून व्यंकाप्पांनी शड्डू ठोकला आणि ते दोन पहाड एकमेकावर तुटून पडले. ६ फुट ८ इंच अशी प्रचंड उंची आणि लोखंडी काम्बासारखे दंड असलेला चिराग एक देखणा मल्ल होता.

चिरागाप्रमानेच त्याची देहकांती लखलखत होती. कुस्तीच्या प्रारंभी दोन्हीही मल्लांनी एकमेकांच्या ताकतीचा अंदाज घेतला. पहिली ५ मिनिटे भूतकाळात जमा झाली आणि व्यंकाप्पानी श्वास धरून चिरागच्या पटावर हल्ला चढवत पट काढला! पाहता पाहता आपल्या केवळ बाहुबलावर सारे बाभळीचे झाड उपटून काढणारा चिराग आभाळ कोसळावे असा जमिनीवर पडला आणि क्षणात सावरून हातावर शरीर पेलत उलटा झाला.

व्यंकाप्पानी त्याची कंबर धरत संपूर्ण कब्जा घेतला आणि खासबाग मधील उपस्थित जनतेने एकच जल्लोष केला. राजाराम महाराज खूप खुश झाले! बघता बघता १० मिनिटे उलटून गेली आणि व्यंकाप्पानी घुटना डावाची पक्कड धरली आणि संपूर्ण ताकतीनिशी आपला गुडघा चिरागच्या मानेवर ठेवून त्याला असमान दाखवले.

मैदानात प्रेक्षकांनी खूप टाळ्या वाजवल्या!
उत्तरेतील महान मल्लाचा एका महाराष्ट्रीयन मल्लाने पाडाव केला होता आणि इतिहासाचे एक नवीन पान लिहिले जात होते.
----------------------------------------------------------------------------------------
close