shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

  रायगड-अलिबाग तुटपुंजी मदत जाहीर करून शासनाकडून बागायतदारांची चेष्टा..!!

 

 रायगड-अलिबाग
तुटपुंजी मदत जाहीर करून शासनाकडून बागायतदारांची चेष्टा..!!

रायगड। प्रतिनिधी : 
(विकास मेहेतर)

राज्य शासनाने निसर्ग चक्रीवादळात उध्वस्त झालेल्या नारळ फोफळीच्या झाडांना हेक्टरी ऐवजी प्रति झाडामागे जाहीर केलेली नारळाला 250 रुपये तर सुपारीला 50 रुपये मदत ही बागायतदारांची चेष्टा असून अशा प्रकारची फसवूणक रायगडकर कधीच सहन करणार नाहीत. आणि इथला बागायतदार अशा प्रकारची तुटपूंजी मदत स्विकारणार देखील नाही अशी टिका शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी केली आहे.

शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी केलेल्या सुरुवातीपासूनच्या मागणीनुसार आणि सततच्या पाठपुराव्यामुळे शासनाने चक्रीवादळात उध्वस्त झालेल्या बागायतदारांना हेक्टरी मदतीऐवजी प्रति झाडामागे मदत देण्यास तयार झाले. मात्र केलेली मदत अतिशय तुटपूंजी असून शासनाने ही मदत केली नसून बागायतदाराचीं एकप्रकारे फसवणूक आणि चेष्टाच केली असल्याचे मत आ. जयंत पाटील यांनी व्यक्त केली आहे. कोकणातील अनेक शेतकर्‍यांचा उदरनिर्वाह नारळी-पोफळीच्या झाडांवर अवलंबून असतो. नारळी-पोफळीतून मिळणार्‍या उत्पन्नातून वर्षाची बेगमी केली जाते. मात्र, यावर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीलाच निसर्ग चक्रीवादळाने थैमान घातले. या वादळात रायगडकरांच्या घराचे आणि नारळ-फोफळीच्या बागांचे अतोनात नुकसान झाले. राज्य शासनाने जिल्ह्यातील नारळ-सुपारी बागयतीसाठी हेक्टरी 50 हजार रुपये मदत जाहीर केली. मात्र, रायगडमधील बागा गुंठा आणि एकरात असल्याने जाहीर केलेली मदत अपुरी होती. शिवाय एक झाड पुन्हा उभे राहण्यासाठी किमान दहा ते पंधरा वर्षाचा कालावधी जाणार असल्याने दहा वर्षाचे एकत्रित नुकसान विचारात घेऊन त्याप्रमाणे प्रत्येक झाडामागे मदत मिळावी, अशी आग्रही भूमिका आपण सुरुवातीपासून घेतली होती. त्यासाठी वारंवार पाठपुरावा देखील केला. त्यानुसार राज्य शासनाच्या कॅबिनेट बैठकीत झाड निहाय मदत जाहीर केली खरी मात्र ती देताना नारळाला प्रती झाडामागे 250 रुपये तर सुपारी 50 रुपये मदत म्हणजे बायातदारांची चेष्टाच आहे. घराच्या परिसरात असलेली झाडे ही शेतीमध्ये येत नाहीत पण त्या झाडांमुळे वर्षाचा गुजारा त्या झाडांवर होत असतो. ते देखील नष्ट झालेले आहेत. एनए झालेल्या जागेमध्ये असल्याने त्याची नोंद सातबार्‍यामध्ये होणार नाही. 

शासन देत असलेले एका नारळाच्या झाडाचे अडीचशे रुपये, सुपारीचे पन्नास रुपये घेण्यापेक्षा आम्हीच तेवढे पैसे शासनाला देऊ. मुख्यमंत्र्यांच्या पहिल्याच दौर्‍यावेळी मी मुख्यमंत्र्यांना सांगितले की आम्हाला झाडनिहाय नुकसानभरपाई देताना दहा वर्षांच्या उत्पन्नाचा विचार करुन आम्हाला नुकसानभरपाई हवी आहे. त्यासाठी आम्ही रस्त्यावर देखील उतरु, असा इशाराही जयंत पाटील यांनी दिला आहे. आज संपूर्ण अष्टागर नष्ट झाले आहे. चौल, रेवदंडा, नागाव, आक्षी या भागातील वाडया पडलेल्या आहेत त्या उभ्या करण्यासाठी आम्हाला दहा ते पंधरा वर्षे तरी लागतील. आणि त्यांचे असलेले उत्पन्नदेखील गृहीत धरुन नुकसान भरपाई मिळाली पाहिजे ही आमची मागणी असल्याचा पुनरुच्चार आ. जयंत पाटील यांनी केला आहे.
close