कोकणातली न्हाणी..!!
रायगड-मुरूड । प्रतिनिधी
(विकास मेहेतर)
लहानपण आठवलं की गाव आठवतं आणि गाव आठवलं की आठवते सकाळी सकाळी समरसून पेटणारी न्हाणी आणि त्यातलं वंत गरम पाणी.
‘यत्र धूमः तत्र वन्ही’ असं संस्कृतमध्ये एक वचन आहे. म्हणजे जिथे धूर आहे तिथे आग असणारच! न्हाणी म्हणजे मोठी चूल आणि तिच्यावर ठेवलेला तांब्यापितळेचा किंवा अॅल्युमिनिअमचा मोठा हंडा. या न्हाणीत विस्तव केल्यावर सुरुवातीला निळसर पांढरा धूर येतो आणि मग धुमसून आग पेटायला लागते. पावसाळ्यात थंडीत कौलातून वर येणारा हा उबदार धूर अद्भूत वाटतो आणि वातावरण एकदम स्वप्नवत वाटतं.
कोकणात बंबाचं फारसं प्रस्थ नाही.प्रत्येकाच्या घरी मागच्या पडवीत न्हाणीच असते. हंडा ऐपतीप्रमाणे तांब्यापितळेचा किंवा अगदी मातीचा असला तरी अग्नीदेवता मात्र सर्वांवर सारखीच प्रसन्न होणारी.
न्हाणीच्या बाजूला लाकडांचा ढीग चार मोठी लाकडं खाली टाकून नीट रचलेला असतो. पावसाळ्याच्या सुरुवातीला हा पैलवानासारखा दिसतो मग दिवाळीकडे हळूहळू रोडावत जातो. लाकडाच्या बाजूला शेणी असतात. त्या शेणीमुळेच विस्तव खूप काळ टिकतो. नाहीतर नुस्ती लाकडं भर्रकन पेटून जातात. सुरुवातीला शेणीवर थोडसं रॉकेल टाकून आजूबाजूने चार लाकडं रचली जातात. विस्तव हळूहळू फुलत जातो.
लहानपणी बाबा पहाटे पाच वाजताच न्हाणी पेटवायचे. आम्ही सहा वाजता उठल्यावर जर न्हाणीत आग दिसली नाही तर उजाडल्यासारखं वाटायचं नाही. पावसात बाहेर धोधो पाऊस, पावळ्या (पागोळ्या) सरसर गळायच्या आणि आपण न्हाणीकडे शेक घेत घेत गरम दाट ताज्या दुधाचा चहा घ्यायचा. केवढं सुखी आणि श्रीमंत वाटायचं.
पावसाळ्यात मग न्हाणीत उन्हाळ्यात वाळवून ठेवलेल्या काजी भाजायच्या. त्या काजी भाजताना जो काही वास वाडीभर दर्वळतो, अत्यंत खमंग चैतन्यदायी वास. या वासाची नशा प्रत्येकाला चढत असेल. (या अशा वासाचे स्प्रे व्हायला हवेत. म्हणजे मुंबईत राहून गावाचा अनुभव घ्यायला) मग त्या काजी फोडून आतले खमंग पांढरा किंचित बदामी कुरकुरीत काजूगर बाजूला काढायचे. त्याची चव आता तुम्हाला सांगत बसत नाही ती तुम्हीच अनुभवा. या काजी भाजतानाची गंमत म्हणजे त्या फोडताना हात काळेभोर होतात. तोपर्यंत कोण तुमच्याकडे ढुंकून बघत नाही. एकदा सगळ्या फोडून मूठभर खमंग गरम काजूगर तयार झाले की प्रत्येक जण येऊन हात पुढे करतं. (दुनियेची ही रितच आहे महाराजा) याचं न्हाणीत आठीळ्या (फणसाच्या बिया) रताळी, भरतासाठी वांगी भाजता येतात. (ही सोय तुमच्या गिझरात आहे का?)कोण आमटीसाठी कांदे आणि खोबर्याचं भक्कल भाजतात.
याच न्हाणीला लागून कुडलेलं बाथरूम असतं. झाडाच्या टाळांनी करडाच्या गवताच्या पेंड्यांनी शाकारलेलं! कोण कोण घरात बाथरूम असताना उन्हाळ्यात अजून एक साधारण दिवाळीनंतर बांधतात. त्या पानांचा, गवताचा सुगंध ऋतू बदलाची जाणीव करून देतो. त्या बाथरूममध्ये आंघोळ करताना मला राजकन्या असल्यासारखं वाटायचं.या न्हाणीत दिवाळीपर्यंत वेगवेगळ्या रंगांची पिवळी, तपकिरी, पांढरी, काळपट, गोरी, निमगोरी लाकडं पेटतात. कधी कधी त्यांच्या दुसर्या टोकातून उकळता रस बाहेर पडतो. लहानपणी मला तो लाव्हारस वाटायचा. दिवाळीनंतर परड्यात असलेल्या झाडांची पानं, फणसाची, सागाची काट्ट्या, माडाच्या झावळ्या, पोया, पिचुंद्र्या (चिचुंद्र्या नव्हे) आत ढकलत येतात. त्याचे वेगवेगळे वास मागच्या पडवीत घमघमत असतात. त्यामुळे तापलेलं पाणी धुरकट आणि वेगळ्या चवीचं वाटतं. एकाच न्हाणीत ऋतू बदलानुसार वेगवेगळ्या वासाचं, चवीचं पाणी तापतं आणि मनाला उल्हासित करतं.
सागाची मोठी पानं जाळल्यावर त्याची राख पण वेगळ्या आकाराची दिसायची. पान जाळून त्याची राख वेगवेगळ्या आकारात बघायला गंमत वाटायची (शेवटी सगळ्याची राखच होते म्हणा)
याच न्हाणीच्या पाण्यावर चारपाच केळी, अळू, कर्दळी फोफावायच्या. खायला, भाजीला केळी विकत घ्यावी लागत नव्हती. सणावाराला केळीच्या पानांनी पंगत शोभून दिसायची. घड काढल्यानंतर केळीच्या रसरशीत गाभ्यापासून सत्यनारायणाच्या पुजेचं मखर तयार व्हायचं. देव न मानणारेही त्या मखराला हात जोडतील इतकं ते सुंदर दिसायचं.
तुळस घराच्या पुढच्या बाजूची तर न्हाणी घराच्या मागच्या बाजूची वैभव असायची आणि आजही आहे. फक्त हे वैभव भोगण्यासाठी आपली पावलं अधूनमधून गावी वळायला हवीत.

