प्रतिनिधी । विद्याधर साळवे
राजगुरूनगर : कोरोना रिपोर्ट येणार असल्याने मानसिक तणावात येऊन राजगुरुनगर येथील साठ वर्षीय व्यक्तीने राहत्या घरात गळ्यावर वार करून आत्महत्या केल्याने राजगुरुनगर व परिसरात खळबळ उडाली आहे.याबाबत राजगुरुनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राजगुरुनगर (ता.खेड) येथील दिनकर ज्ञानेश्वर जुन्नरकर ( वय 60 वर्ष ) व त्यांच्या पत्नी या दोघाही पती-पत्नींना कोरोना चा संसर्ग झाला होता.ते दोघेही भोसरी येथील खासगी रुग्णालयात गेले पंधरा दिवस उपचार घेत होते.उपचारानंतर त्यांचा पहिला रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना चार दिवसापूर्वी घरी सोडण्यात आले होते.
एक अहवाल निगेटिव्ह आल्यावर ते घरी राहून काळजी घेत होते.मात्र तरीही त्रास जाणवत होता.त्यांचा दुसरा कोरोना रिपोर्ट करण्यासाठी स्वॅब घेण्यात आला होता. त्यांचा दुसरा कोरोना रिपोर्ट आज येणार होता. त्यामुळे आजाराच्या मानसिक तणावात असलेल्या दिनकर जुन्नरकर यांनी शुक्रवार दिनांक सात रोजी रात्री आपल्या खोलीत झोपण्यासाठी गेले असता बाथरूम मध्ये गळ्यावर कात्रीने व सुरीने वार करून आत्महत्या केली.
शनिवारी सकाळी त्यांचा मुलगा त्यांना उठविण्यासाठी गेला असता वडील दिनकर जुन्नरकर हे बाथरूम मध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे निदर्शनास आले व त्यांच्या शेजारी चाकू व कात्री पडल्याचे दिसले या घटनेने राजगुरुनगर बाजारपेठ परिसर व खेड तालुक्यात खळबळ उडाली असून राजगुरूनगर पोलीस पुढील तपास करत आहेत.

