shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

देशासाठी प्राणाची बाजी लावणारा शुरवीर निलेश नारायण तुणतुणे..!!

 रायगड । प्रतिनिधी :
(  विकास मेहेतर)
छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा आपला रायगड जिल्हा, दर्यासारंग कान्होजी आंग्रे यांनी स्वकर्तृत्वाने सागरी किनारपट्टीत दरारा निर्माण केलेला हा जिल्हा, तर अनेक शूरवीर निर्माण झालेला हा आपला रायगड जिल्हा. शिवरायांनी आपल्या सैनिकांना सांगितले ‘ज्याचे आरमार त्याचा समुद्र’, त्याप्रमाणे त्यांनी दर्यावर दरारा ठेवण्यासाठी अलिबागच्या समुद्रात एका खडकावर कुलाबा किल्ल्याची निर्मिती केली. मराठी आरमाराचे प्रमुख दर्यासारंग सरखेल कान्होजी आंग्रे झाल्यावर आपल्या शूर पराक्रमाने संपूर्ण किनारपट्टीत आपले वर्चस्व निर्माण करुन मोगलशिद्दी, पोर्तुगीज, डच, इंग्रज या शत्रुंना हतबल करुन सोडले. तो हा कान्होजींच्या शौर्यगाथेचा मूक साक्षीदार अलिबागचा जलदुर्ग कुलाबा. मराठा नौदलाचे मूळ संस्थापक असलेले कान्होजी आंग्रे या मराठा महायोध्याची अलिबाग पूर्वीचे रामनाथ ही राजधानी. या शौर्यभूमीवर कान्होजी राजे यांच्या पराक्रमाचा वसा घेऊन जन्माला आला तो अलिबाग तालुक्यांतील सहाणगोठीचा शूरवीर निलेश नारायण तुणतुणे.


अलिबाग रामराज मार्गावरील अलिबागपासून 5 ते 6 कि.मी. अंतरावरील सहाणगोठी गावांतील नारायण रामभाऊ तुणतुणे व मीराबाई तुणतुणे यांचा हा वीरपुत्र निलेश 2 जून 1975 रोजी जन्माला आला तो आपल्या आजोळी याच तालुक्यांतील खंडाळे गावी मामाच्या घरी. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात या उक्तीप्रमाणे निलेशही लहानपणापासून करारी महत्वाकांक्षी आणि जिद्दी. पराक्रम हा लहानपणापासूनच त्याच्या रक्तात सळसळत होता, म्हणूनच कबड्डीसारख्या रांगड्या आणि तगड्या खेळात त्यांने प्राविण्य मिळवले होते. भू-मातेची लालमाती त्याने त्याचवेळी आपल्या अंगाला लावली होती. प्राथमिक शिक्षण सहाणगोठी येथे घेतल्यानंतर माध्यमिक शाळेतील शिक्षण त्यांनी मामाच्या गावाजवळील को.ए.सो.च्या माध्यमिक विद्यालयात घेतले होते. त्यानंतरच्या पुढील शिक्षणासाठी सहाणगोठीचा हा छावा अलिबागच्या जे.एस.एम. महाविद्यालयात उच्च शिक्षणासाठी दाखल झाला.
निलेशचे सळसळते रक्त देशसेवेसाठी धडपड करीत होते. पराक्रमाची हाक मारीत होते. म्हणूनच तो पराक्रम गाजवण्याच्या जागा शोधू लागला होता. लष्करामध्ये भरती होण्याची त्याची इच्छा होती. अलिबागमध्ये झालेल्या लष्कर भरतीमध्ये तो लष्करांतील शिपाई पदासाठी निवडला गेला. प्रत्येकाच्या मनात इच्छा असते; आकांक्षा असते. ही आकांक्षाच इच्छा पूर्ण करते. ‘आकांक्षा पुढती जिथे गगन ठेंगणे’ अशीच अवस्था निलेशच्या मनाची झाली होती. लष्करात भरती झाल्यावर निलेशला हैद्राबाद येथे लष्करी प्रशिक्षणासाठी पाठविण्यात आले; तेथील प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर तो मराठा बटालियनचा तगडा लढाऊ शिपाई म्हणून देशसेवेस सज्ज झाला. लहानपणापासूनच खिलाडूवृत्ती नेतृत्वगुण त्याच्या अंगी कबड्डीच्या मैदानातच भिनले होते. ह्या गुणांनी त्याच्या व्यक्तिमत्वात मोलाची भर घातली होती. या नेतृत्वगुणाची पारख कडकशिस्तीच्या लक्षरी अधिकार्‍यांना आली. त्याचे नेतृत्व गुण उफाळून आले; त्याच्या कृतीतून व्यक्त झाले. म्हणूनच त्याचे कौशल्य कामगिरी पाहून एका तुकडीची जबाबदारी त्याच्यावर सोपविण्यात आली. त्याच्या कौशल्यपूर्ण नेतृत्वगुणाचा गौरव लष्काराने केला. उत्कृष्ट नेमबाज म्हणूनही तो लष्करात नावारुपाला आला.
सुहास्य, वदन असलेल्या निलेशला मैत्रीपूर्ण संबंध जोपासणे व ते वाढविण्याची अत्यंत हौस होती. दुसर्‍याच्या सुख दुःखाचा नेहमी सोबती बनणार्‍या निलेशने आपला मोठा मित्र परिवार लष्करातही तयार केला होता. एक चांगल्या मनाचा दिलखुलास मित्र म्हणून आपल्या मित्रपरिवाराचा तो लाडका नेता होता. 1995 सालची गोष्ट एका बाजूला भारत पाकिस्तान मैत्री करायचे राजकारणी चित्र पाकिस्तानने उभे केले होते; आणि दुसर्‍या बाजूला भारताच्या पवित्र भूमीचा इंच-इंच भाग बळकावण्याची कुटील कारस्थानेही पाकिस्तानने रचली; त्याचबरोबर अतिरेकी कारवायाही सुरु केल्या. पण या कारवायांना निघड्या छातीच्या भारतीय फौजांनी वेळोवेळी ठेचून काढले. भारतभूमींशी इमान राखतांना अनेक जवानांनी आपल्या प्राणांच्या आहुत्या दिल्या. प्राण गेला तरी बेहजर पण एक भूमीत पाय रोवू देणार नाही, ही पवित्र भूमी नापाक होऊ देणार नाही, या भावनेतून लढणारे सैनिक, जीवाची पर्वा न करता अतिरेक्यांशी मुकाबला करीत होते.

निलेश तुणतुणे हा नेमबाज जवान आपल्या बंदुकीने घेतलेल्या वेधावर त्याचा गाढ विश्‍वास होता. गनमास्टर म्हणून त्याला सगळे सलाम करीत असत. 1 ऑगस्ट 1998 रोजी आपल्या तुकडीसह गनमास्टर निलेश तुणतुणे भारतीय सीमारेषेजवळ श्रीनगर बारामुल्ला भागात गस्त घालीत असतांना पाकिस्तानी घुसखोरांच्या हालचालींवर त्याचे व त्याच्या तुकडीचे बारीक लक्ष होते. पण अगोदर शांत असलेला परिसर अचानक ज्वालांच्या आगडोंबानी उजळून गेला. अतिरेक्यांनी अचानक तोफांचा भडीमार सुरु केला. निलेश तुणतुणे त्यास तेवढ्याच जोमाने प्रत्युत्तर देऊ लागला. तोफांचा भडीमार प्रचंड सुरु होता. त्यातच प्राणपणाने लढत असलेल्या निलेशला आपल्या प्राणाची आहुती द्यावी लागली.
देशाचे रक्षण करीत असतांना अलिबाग-सहाणगोठीचा हा पराक्रमी पुत्र वयाच्या 23 व्या वर्षी शहीद झाला. या रणसम्राट भूमीपुत्राने अखेरची चिरनिद्रा घेतली ती भारतमातेच्या कुशीत. देशाच्या रक्षणासाठी प्राणपणाने लढणार्‍या अमर जवान निलेश तुणतुणेची आठवण पुढील पिढीला रहावी या दृष्टीने अलिबाग-रोहा मार्गावर त्याच्याच गावच्या वेशीवर निलेशचा अर्धपुतळा उभारुन स्मारक तयार केले आहे. त्याच्या स्मारकासमोरच तेवणारी ज्योत रस्त्यावरुन जाणार्‍या येणार्‍याला निलेशच्या पराक्रमीच्या तेजाने पुलकीत करीत आहे. त्याच्या पराक्रमी स्मृती अजूनही इथल्या नागरिकांच्या मनात तरळत आहेत. या शुरवीराची आठवण म्हणून स्थापन केलेल्या विश्‍वस्त मंडळातर्फे दरवर्षी 1 ऑगस्टला स्मृतीदिन पाळण्यात येवून अभिवादन करण्यात येते. त्याला अभिवादन करण्यासाठी सर्वच स्तरांतील नागरिक, विद्यार्थी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित असतात. म्हणूनच जो शहीद हुए है उनकी, जरा याद करो कुर्बानी… हे आपले कर्तव्य आहे.
close