शिर्डी प्रतिनिधी:
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील काही महिन्यांपासून बंद असलेली राज्यातील मंदिरे पुन्हा खुली करण्यासाठी राज्यभरातून मागणी होत आहे. मंदिरे खुला करण्यासाठी विरोधकांकडून देखील मागणी होत असून आज राज्यात घंटानाद आंदोलन करण्यात येत आहे. दार उघड उद्धवा दार उघड… अशा प्रकारची आरोळी देत आज साईबाबांच्या शिर्डीत भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली गावकऱ्यांनी घंटानाद आंदोलन केलं.
मुख्यमंत्र्यांनी ऐकले नाही तर त्यांच्या बंगल्यासमोर घंटानाद आंदोलन करण्याचा इशारा विखे पाटील यांनी यावेळी दिला.
राज्यात अनलॉक होत असताना दारु दुकानं खुली केली जात असतील तर मंदिरे का बंद ? असा खोचक सवाल देखील विखे पाटील यांनी उद्धव ठाकरे सरकारला दिला आहे. राज्यातील बंद असलेली मंदिरे खुली करण्यासाठी आणि राज्य सरकारचे लक्ष्य वेधण्यासाठी राज्यात घंटानाद आंदोलन करण्यात येत आहे.
शिर्डी येथे झालेल्या आंदोलनात राधाकृष्ण विखे पाटील आणि खासदार विखे पाटील हे उपस्थित होते. यावेळी शिर्डीचे व्यावसायिक व गावकरी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते.
मार्चपासून साईबाबा मंदिर बंद असल्याने परिसरातील शेतकरी आणि व्यावसायिक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. साईबाबा संस्थानचीही आर्थिक घडी विस्कटली आहे. आज राज्यात सगळं अनलॉक होत असताना दारु दुकाने जर खुली केली जात असतील तर मंदिरे का बंद ? असा सवाल राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे.
तर आम्ही स्वत: मंदिर उघडू...!
आज राज्यभरातील गावे अनलॉक झाली आहेत. उद्योग व्यवसाय सुरु झालेत. शिर्डीत मात्र जोवर साई मंदिर सुरु होत नाही तोपर्यंत कोणताही व्यवसाय सुरू होवू शकत नाही. आजही शिर्डी पूर्णपणे बंद असल्याने व्यावसायिक हतबल झाले आहेत. सरकारने लवकर मंदिर सुरु करण्याची परवानगी द्यावी, अन्यथा आम्ही परवानगी नसताना मंदिर सुरु करु, असा इशारा खासदार सुजय विखे यांनी दिला आहे.

