एकंदरीत उजनी येथील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. उजनी येथील प्रगतिशील शेतकरी योगीराज पाटील यांनी जुलै व ऑगस्ट महिन्यात अवघ्या १३ एकरात एकूण ३० लाख ८० हजाराचे यशस्वी उत्पन्न मिळवले आहे.
तंत्रज्ञानाचा योग्य वापर त्याचवेळी पिकाला योग्य भाव व कमी उत्पादन खर्च यामुळे कोथिंबीर पिकातून त्यांना भरघोस उत्पन्न मिळाले आहे. गावरान शेणखत वापरलेल्या जमिनीवर जुलै महिन्याच्या मध्यंतरी कोथिंबीर पिकाच्या घरगुती बियाणांची ट्रॅक्टरद्वारे पेरणी त्यांनी केली.
घरगुतीबियाणे असल्याने त्यांना त्याचा अधिक फायदा झाला. दहा दिवसांत पिकाची उगवण झाली. २० व्या दिवशी त्यांनी खुरपणी केली. ज्यामुळे पिकाची योग्य वाढ झाली. तसेच पिकाला रोगापासून वाचवण्यासाठी त्यांनी एकूण ४ फवारण्या केल्या. त्याचा फायदा पिकाच्या वाढीसाठी आणि योग्य रंग येण्यासाठी झाला.
पाटील यांनी गावात एक नवा आदर्श निर्माण केला असून शेतामध्ये नवनवीन प्रयोग करण्याची त्यांची आवड आहे. नियमित रोज पहाटे पाच वाजता शेतात जाऊन ते पूर्ण दिवसाच्या कामाचे नियोजन करतात. राजकीय जीवनातून वेळ काढून त्यांनी एकदम तंत्रशुद्ध पद्धतीने शेती करण्यासाची कला त्यांच्या अंगात आहे. हेच त्यांच्या प्रगतीचे सिक्रेट आहे.

