एकाच दिवशी ६० रुग्णांची नोंद : गोंदिया, तिरोडा तालुक्यात सर्वाधिक रुग्ण


गोंदिया /प्रतिनिधी-   प्रशांत  ऊके : कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल करणाºया गोंदिया जिल्ह्यात मागील तीन चार दिवसांपासून कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. रविवारी (दि.२) एकाच दिवशी तब्बल ६० कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. तर मागील तीन दिवसात एकूण १०७ कोरोना बाधित रुग्ण वाढल्याने जिल्ह्यात कोरोनाचा ब्लास्ट झाल्याचे चित्र आहे. जिल्ह्यातील एकूण कोरोना अ‍ॅक्टीव्ह रुग्णांची १५७ वर पोहचली आहे.




रविवारी जिल्ह्यात आढळलेल्या एकूण ६० कोरोना बाधितांमध्ये तिरोडा तालुक्यातील ३३, गोंदिया तालुक्यातील २०, देवरी ४, आमगाव २, गोरेगाव १, सडक अर्जुनी तालुक्यातील १ रुग्णाचा समावेश आहे.  शनिवारी सुध्दा गोंदिया, तिरोडा आणि देवरी तालुक्यात सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली होती. गेल्या तीन दिवसातील कोरोना बाधितांच्या आकडेवारी नजर टाकल्यास रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत आढळलेल्या रुग्णांमध्ये सर्वाधिक रुग्ण हे बाहेरील राज्य आणि जिल्ह्यातून आलेले आहेत. यांच्या संपर्कात आलेल्यांमुळे आता स्थानिकांमध्ये सुध्दा कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचे चित्र आहे. प्रशासनाने लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिल्याने नागरिकांकडून सुध्दा नियमांचे काटेकोरपणे पालन होत नसल्याचे चित्र आहे.शहरातील बाजारपेठ आणि दुकानांमध्ये सुध्दा गर्दी वाढली असून फिजिकल डिस्टन्सिंग आणि मास्कचा वापर करण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. शहरातील रस्त्यांवर सुध्दा लॉकडाऊन पूर्णपणे शिथिल झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात पुन्हा कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. विशेष म्हणजे मागील पाच महिन्यापासून कोरोनामुक्त असलेल्या देवरी तालुक्यात सुध्दा आता कोरोनाचा शिरकाव झाला आहे. हा परिसर आता कोरोनाचे हॉटस्पाट होत आहे. तिरोडा आणि गोंदिया शहरात सुध्दा मागील दोन कोरोना बांधितांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे तिरोडा नगर परिषदेने आता कडक लॉकडाऊन करण्याची तयारी सुरू केल्याची माहिती आहे. कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाला सुध्दा नियमांची कठोर अंमलबजावणी करण्याची गरज आहे.
...............

बाहेरुन येणाºयावर वॉच नाहीच

जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव होण्यास प्रतिबंध लावण्यासाठी सुरूवातीला जिल्हा प्रशासनाने जिल्ह्याच्या सीमा सील केल्या होत्या. जिल्ह्यात बाहेरुन येणाºयांची आरोग्य तपासणी केली जात होती. मात्र आता याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले आहे. त्यामुळे सुध्दा जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने चित्र आहे.
............

 नागरिकांनो नियमांचे पालन करा 

जिल्ह्यात तीन दिवसात कोरोना बाधितांचा आकडा १०७ वर पोहचला आहे. ही जिल्हावासीयांसाठी धोक्याची घंटा आहे. त्यामुळे नागरिकांनी आरोग्य विभाग आणि प्रशासनाने दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. अत्यावश्यक कामासाठी घराबाहेर पडावे, मास्कचा वापर करावा, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करावे,दिवसभरात हात वांरवार धुवावे तसेच आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहन सर्व वृत्त वाहिन्यांनी केले आहे.