इंदापूर । प्रतिनिधी (तात्याराम पवार)
दि. २५ शहाजीनगर (ता. इंदापूर, पुणे )
आगामी पाच वर्षासाठी केंद्र सरकारने इथेनॉलचे चांगले धोरण जाहीर केलेले आहे, त्यामुळे आगामी काळात इथेनॉलचा साखर कारखानदारीला मोठा आधार मिळणार आहे. इथेनॉलचे केंद्र सरकारने २५ वर्षासाठी धोरण जाहीर करावे,अशी मागणी केंद्रीय मंत्री गटाचे अध्यक्ष अमित शाह यांचेकडे करण्यात आली आहे, अशी माहिती कारखान्याचे संस्थापक व माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी मंगळवारी (दि.२५) दिली.
शहाजीनगर (ता.इंदापूर) येथे नीरा-भीमा सहकारी साखर कारखान्याच्या १२ हजार मे.टन क्षमतेच्या मोलॅसेस टँकचे (टाकीचे) भूमिपूजन हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक व कृषी उत्पन्न बाजार समिती इंदापूरचे सभापती आप्पासाहेब जगदाळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना हर्षवर्धन पाटील यांनी देशातील साखर उद्योगाचा आढावा घेतला.ते पुढे म्हणाले,पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल मिसळण्याचे धोरण राबविण्यास केंद्र सरकार सकारात्मक आहे. नीरा-भीमा कारखान्याच्या आसवानी प्रकल्पातून आगामी गळीत हंगामापासून प्रतिदिनी ६० हजार लिटर इथेनॉलचे उत्पादन होणार आहे.कारखाना आगामी गळीत हंगामात ७ लाख मे.टन उसाचे गाळप पुर्ण करणार आहे.नवीन १२ हजार मे.टन क्षमतेच्या मोलॅसेस टँकच्या( टाकीचे ) उभारणीमुळे मोलॅसेस साठवणूकीची अडचण आता राहणार नाही.
हर्षवर्धन पाटील पुढे म्हणाले,सध्या साखर कारखानदारी आर्थिक अडचणीत आहे. त्यामुळे केंद्र सरकारने साखरेचा विक्री दर क्विंटलला किमान रू.३५०० ते ३६०० करावा, बेल आऊट पॅकेजच्या माध्यमातून दोन वर्षे गाळप झालेल्या ऊसास प्रति टन रू.६५० प्रमाणे सुमारे २० हजार कोटी रुपयांचे अनुदान द्यावे,अशी मागणी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने केंद्रीय मंत्री गटाचे अध्यक्ष अमित शाह यांचेकडे केली आहे.
या कार्यक्रमात इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आप्पासाहेब जगदाळे, कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार यांची भाषणे झाली. यावेळी कारखान्याचे संचालक विलासराव वाघमोडे, उदयसिंह पाटील, राजवर्धन पाटील, कृष्णाजी यादव, दत्तात्रय शिर्के, प्रतापराव पाटील, दादासो घोगरे, संजय बोडके, प्रकाश मोहिते, दत्तू सवासे, हरिदास घोगरे, मच्छिंद्र वीर, बबनराव देवकर, भागवत गोरे, चंद्रकांत भोसले, संगिता पोळ, जबीन जामदार, कार्यकारी संचालक सुधीर गेंगे पाटील उपस्थित होते.आभार कारखान्याचे उपाध्यक्ष कांतीलाल झगडे यांनी मानले.

