संगमनेर ( दि.२७, प्रतिनिधी )
१० हजार वृक्षारोपणाचा रोटरी व देवा ग्रुपचा संकल्प हा पर्यावरण संवर्धनासाठी दिशादर्शक असून आता केवळ ' झाडे नव्हे , तर जंगल लावा ' ही चळवळ राबविण्याची गरज आहे असे प्रतिपादन आर्ट ऑफ लिव्हिंगचे विश्वस्त व महाराष्ट्र समन्वयक विजय हाके यांनी केले .
येथील रोटरी क्लब , देवा ग्रुप व आर्ट ऑफ लिव्हिंगच्या संयुक्त विद्यमाने १० हजार वृक्षारोपणाचा संकल्प करण्यात आला. त्यातील ३५०० वृक्ष तालुक्यातील सायखिंडी येथील ज्येष्ठ सिनेअभिनेते सयाजी शिंदे यांच्या प्रेरणेने विकसित झालेल्या वृक्षप्रेमी सीताराम राऊत यांच्या सह्याद्री देवराई येथे लावण्यात आली त्या प्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी रोटरी क्लबचे अध्यक्ष पवन वर्मा , सचिव योगेश गाडे , सीताराम राऊत , सुनील कडलग , समीर शाह , दीपक मणियार , प्रकल्प प्रमुख अजित काकडे, विश्वनाथ मालानी, आनंद हासे , देवा ग्रुपचे मनोज भावसार उपस्थित होते.
यासंदर्भात सविस्तर वृत्त असे की सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असलेल्या रोटरी क्लब ऑफ संगमनेर, सिनेसृष्टीत कार्यरत असलेला देवा ग्रुप आणि श्री श्री रविशंकर यांच्या आशिर्वादाने अध्यात्मिक व ग्रामीण भागात कार्यरत असलेले आर्ट ऑफ लिव्हिंगचे सदस्य यांच्या संयुक्त विद्यमाने संगमनेर तालुक्यातील ग्रामीण भागात दहा हजार रोपांचे वृक्षारोपन करुन त्यांचे संवर्धन करण्याचे कार्य हाती घेण्यात आले आहे. याचाच एक भाग म्हणून तालुक्यातील सायखिंडी येथे दि. २५ ऑगस्ट रोजी साडेतीन हजार रोपांचे वृक्षारोपनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी संगमनेरमधील मालपाणी उद्योग समूहाचे वतीने मदतीचा हात म्हणून पाच हजार रोपांची उपलब्धता करुन देण्यात आली . जिल्हा परिषद सदस्य व सामाजिक कार्यकर्ते सिताराम राऊत यांनी सायखिंडी येथील सह्याद्री देवराई येथे वृक्षारोपनासाठी जागा उपलब्ध करुन दिली.
प्रकल्पाविषयी माहिती देतांना रोटरीचे अध्यक्ष पवनकुमार वर्मा यांनी सांगितले की, संगमनेर तालुक्यात अजुनही बऱ्याचशा गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे. कमी प्रमाणात होणारा पाऊस व उजाड माळरान हे या पाणीटंचाईचे प्रमुख कारण आहे. जर आपल्याला यावर मात करायची असेल तर मोठ्या प्रमाणात वृक्षारोपन करुन त्याचे संवर्धन करणे गरजेचे आहे, याची जाणीव झाल्यामुळे आम्ही हा प्रकल्प हाती घेतला आहे.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व आर्ट ऑफ लिव्हिंगचे ट्रस्टी विजय हाके यांनी वृक्षारोपनाबरोबरच परिसर हिरवागार ठेवण्याचे महत्व समजावून सांगितले. मनुष्याबरोबरच इतर प्राण्यांचे जीवनचक्र पाण्यावर कसे अवलंबून आहे व त्यावर काय उपाययोजना करता येईल, पावसाचे प्रमाण शास्त्रीयदृष्ट्या कसे वाढविता येईल याबाबत माहिती त्यांनी दिली.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन निलेश पर्बत यांनी केले तर आभार सिताराम राऊत यांनी मानले. याप्रसंगी सत्यम राऊत , पंकज देशमुख , नंदिनी बागुल , शितल बागुल ,अस्मा पठाण , उपस्थित होते. कार्यक्रमात सोशल डिस्टन्सींगच्या नियमांचे पालन करण्यात आले.

