shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

वृध्द महिलेला मारहाण करून सव्वा ४ लाखांचा ऐवज लुटणाऱ्या ‘केअर टेकर’सह दोघांना अटक, निगडी पोलीसांची कामगिरी..!!

पिंपरी :- दोन महिन्यांपूर्वी केअर टेकर म्हणून काम करणाऱ्या नोकराने आपल्या मित्राच्या मदतीने वृध्द महिलेला मारहाण करुन सव्वा चार लाखांचा ऐवज लुटून नेल्याची घटना घडली होती. यातील दोन चोरट्यांना निगडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून त्यांच्याकडून दुचाकी आणि चोरीचा माल असा १ लाख २४ हजाराचा ऐवज हस्तगत केला आहे.


दीपक उर्फ दिप्या अंकुश सुगावे (वय २०, रा. कल्पना सोसायटी, तळेगाव दाभाडे) आणि संदीप उर्फ गुरु भगवान हांडे (वय २४, रा. चिंचवडगाव) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जवादवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, वाल्हेकरवाडी येथील एका केअर टेकर सेंटरमध्ये दोन्ही आरोपींची एकमेकांशी ओळख झाली. दीपक हा दोन महिन्यांपूर्वी संबंधित ज्येष्ठ महिलेच्या घरी केअर टेकर म्हणून कामाला होता. त्यानुसार घरातील सर्व साहित्य व वेळेची माहिती त्याने घेतली. जून महिन्यात त्याने संबंधित महिलेच्या घरचे काम सोडले.

मात्र, संबंधित महिला घरी एकटी असते व घरात मौल्यवान वस्तू कुठे आहेत ते त्याने हेरले होते. १० ऑगस्टला रात्री दोघेजण घराशेजारील उद्यानाच्या संरक्षक भिंतीवरून उड्या मारून ज्येष्ठ महिलेच्या घरात आले. महिलेला चाकूचा धाक दाखवून तसेच हातावर काठीने मारहाण करत त्या दोघांनी ४ लाख ३० हजारांचा ऐवज चोरुन नेला होता.

उच्चभ्रू वस्तीमध्ये हा प्रकार घडल्याने एकच खळबळ उडाली होती. यामुळे ज्येष्ठ नागरिकांच्या एकटे राहण्याचाही प्रश्‍न ऐरणीवर आला. दरम्यान, या घटनेनंतर निगडीचे पोलीस सर्व दृष्टिने तपास करीत होते. तपास पथकाचे कर्मचारी पोलीस नाईक सतिश ढोले यांना दीपक याने तेथे काम केल्याची माहिती मिळाली. या गुन्ह्यातील आरोपी थरमॅक्‍स चौक येथे चोरीचा माल विक्रीला घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. त्या दोघांकडे विचारपूस केली असता, सुगावे याने तळेगाव येथे लपून ठेवलेले साहित्य व इतर वस्तू पोलिसांना काढून दिल्या. तसेच, त्या गुन्हयात वापरलेली दुचाकीही हस्तगत करण्यात आली आहे.

पोलीस आयुक्‍त संदीप बिष्णोई, अपर आयुक्‍त रामनाथ पोकळे, उपायुक्‍त स्मिता पाटील, सहायक आयुक्‍त राम जाधव,यांच्या मार्गदर्शनाखली वरिष्ठ निरीक्षक गणेश जवादवाड, सहायक निरीक्षक लक्ष्मण सोनवणे, उपनिरीक्षक ज्ञानेश्वर कोकाटे, कर्मचारी किशोर पढेर, मच्छिंद्र घनवट, सतीश ढोले, रमेश मावसकर, आत्मलिंग निंबाळकर, विजय बोडके, दीपक जाधवर, सोपान बोधवड आणि राजेंद्र जाधव यांच्या पथकाने ही कामगिरी केली.
close