गडचिरोली(कोरची) ता.२४:- येथील एका कंवर समाजातील अल्पवयीन आदिवासी मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिला मातृत्व लादणाऱ्या अज्ञात आरोपीविरुद्ध अखेर कोरची पोलिसांनी पोस्को कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. आरोपीविरोधात भादंवि कलम ३७६ (२) (जे) तसेच पोस्को कलम ४ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला असून आरोपींचा शोध घेणे सुरू आहे.
अज्ञात आरोपीकडून पीडित अल्पवयीन मुलीवर आणि तिच्या आई-वडिलांवर प्रचंड दबाव आणला होता. मात्र प्रसार माध्यमांनी हे प्रकरण उघडकीस आणल्यानंतर शासनाच्या वतीने पोलीस उपनिरीक्षक आनंद श्रीमंगल यांनी फिर्याद नोंदवली आहे. त्यानुसार अज्ञात आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला. उपविभागीय पोलिस अधिकारी जयदत्त भंवर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक महेश कोंडूभैरी प्रकरणाचा तपास करीत आहे. दरम्यान आरोपीला अटक झाली नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आदिवासी कंवर समाजाने दिला आहे.

