सावळीविहीर( प्रतिनिधी) :
सेवा निवृत्ती वेतन व इतर लाभ मिळावेत आदी मागण्यांसंदर्भात वेळोवेळी अर्ज करूनही त्याचा उपयोग होत नाही. त्यामुळे आतातरी या माझ्या 80 वय वर्षाचा विचार करून तात्काळ मला सेवानिवृत्ती वेतन मिळावे व इतर लाभ मिळावेत .अन्यथा 2 ऑक्टोबर 20 20 या राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीच्या दिनापासून पंचायत समिती कार्यालय, कोपरगाव येथे आमरण उपोषणास करण्याचा इशारा सेवानिवृत्त ग्राम विकास अधिकारी चंद्रभान उमाजी भोसले यांनी एका निवेदनाद्वारे दिला असून हे निवेदन त्यांनी महाराष्ट्र राज्याचे लोकायुक्त मुंबई यांना पाठवले आहे.
या निवेदनात सेवानिवृत्त ग्राम विकास अधिकारी सी.यु.भोसले यांनी पुढे म्हटले आहे की, गेल्या दोन वर्षापासून माझ्या प्रलंबित मागणी साठी मी प्रयत्न करीत आहे .सेवानिवृत्ती वेतन व इतर लाभ मिळण्याकरीता जिल्हा परिषद अहमदनगर व पंचायत समिती कोपरगाव यांना अनेकदा लेखीअर्जा सह प्रत्यक्ष भेटून व विनंती करूनही माझ्या प्रलंबित प्रश्नाकडे कोणी लक्ष देत नाही. मला माझ्या मूलभूत हक्कापासून वंचित ठेवून माझ्यासह माझ्या कुटुंबाचे त्यामुळे उपासमार होत आहे .यामुळे मला नाविलाजाने 2 ऑक्टोबर पासून आमरण उपोषण करावे लागत आहे. मी सावळीविहीर बुद्रुक येथे ग्राम विकास अधिकारी असताना माझ्यावर 2,60,000 रुपयाची ग्रामपंचायतची वसुली तेंव्हा दाखविण्यात आली होती. वरील 2 लाख 60 हजार वसुली करता मला सेवा निलंबित केले होते.
त्यानंतर मला वयोमानानुसार सक्तीने सेवानिवृत्ती करून माझ्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा खटला न्यायालयात सुरू असताना दिनांक 31/ 8 /2018 रोजी या खटल्याचा निकाल लागून या आरोपातून माझी न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. त्यामुळे हा आरोप चुकीचा ठरला आहे. तरीपण आज रोजी माझ्याकडे 2 लाख 60 हजार रुपयांची वसुली दाखवून मला अनुकंपा खाली पेन्शन शिवाय इतर लाभ देता येत नाही, असे सांगितले जाते. त्याच प्रमाणे माझे मूळ सेवा पुस्तक पंचायत समिती कोपरगाव येथे अनेकदा शोधूनही आढळून येत नाही. ते नेमकी गेले कुठे असा प्रश्न पडतो?
यासंदर्भात मी स्वतः पंचायत समिती कोपरगांव येथे अनेकदा अर्ज व विनंती प्रत्यक्ष भेटून केली असतानाही त्यावर कुणीही चर्चा करत नाही. मुळ सेवा पुस्तक सापडत नाही. तसेच मला शासकीय सेवा निवृत्ती वेतन व इतर लाभ मिळत नाही. त्यामुळे माझी व माझ्या कुटुंबाची अतोनात हाल होत आहेत.माझे वय सध्या 80 वर्ष असून या माझ्या वयाचा विचार करून माझा प्रलंबित प्रश्न तात्काळ शासनाने सोडवावा व माझी सेवानिवृत्ती कायम करावी. सेवा निलंबित वेतन द्यावे .सेवानिवृत्ती पासून आजपर्यंत वेतन द्यावे. उपदान व इतर लाभ द्यावे व जी वसुली दाखवली जाते ती वसुली करू नये.
या सर्व माझ्या मागण्या तात्काळ मंजूर कराव्यात व माझ्या जिवंतपणीच मला उपभोग घेण्याकरता या सर्व नियमाने मला मिळणाऱ्या शासकीय सेवा-सुविधांचा मला लाभ मिळावा.आज पर्यंत मला शासकीय नोकरी करून काही फायदा मिळालेला नाही. जर माझ्या मागण्या तात्काळ मंजूर करण्यात आल्या नाहीत व माझे मूळ सेवा पुस्तक मिळाले नाही. तर 2 ऑक्टोबर 20 20 पासून मी पंचायत समिती कार्यालय, कोपरगाव,जि.अ.नगर येथे आमरण उपोषणास बसणार असून जर या उपोषणादरम्यान मला काही झाल्यास त्यास प्रशासन जबाबदार राहील.
माझ्या मागण्या मान्य कराव्यात अन्यथा नाविलाजाने घरी उपाशी मरण्यापेक्षा या पं, स, कार्यालया समोर आमरण उपोषण करणार असल्याचा असा इशारा चंद्रभान उमाजी भोसले (सेवानिवृत्ती ग्रामविकास अधिकारी ) हल्ली रा. कोपरगाव यांनी या निवेदनाद्वारे दिला असून हे निवेदन त्यांनी महाराष्ट्र राज्याचे लोकआयुक्त तसेच नाशिकचे महसूल आयुक्त,व विविध शासकीय अधिकाऱ्यांना हे निवेदन पाठविण्यात आले आहे.

