इंदापूर:दि.३०/०९/२०२०
शहाजीनगर (ता.इंदापूर) येथे नीरा भीमा सहकारी साखर कारखान्यावरती बुधवारी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची इंदापूर तालुका मंडप व्यावसायिक संघटनेचे अध्यक्ष रविंद्र कासार, उपाध्यक्ष टिंकू ढवळकर, बंडू मुलाणी, चिमा ढोले, गणेश भिंगारदिवे आदी पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली.यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन त्यांना सादर केले.त्यानंतर हर्षवर्धन पाटील यांनी संघटनेच्या शिष्टमंडळाबरोबर चर्चा केली. यावेळी हर्षवर्धन पाटील म्हणाले की,सध्या जनजनजीवन पूर्ववतपणे सुरु झालेल्या आहेत. शासनानेही बहुतेक सर्व व्यवसाय सुरू करण्यास नियम व अटी घालून परवानगी दिलेली आहे. सर्व व्यवहार सुरळीतपणे चालू असताना गावोगावच्या मंडप व्यावसायिकांवरच बंदी का ? आणखी किती दिवस मंडप व्यवसाय बंद ठेवणार ? असा परखड सवाल भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी बुधवारी (दि.30) उपस्थित केला.
शासनाने नवरात्रोत्सवापासून मंडप व्यवसायिकांना आपला व्यवसाय सुरू करण्यास नियम व अटी घालून परवानगी द्यावी,अशी मागणी यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी केली. मंडप व्यवसायिकांना तातडीने मंडप व्यवसाय सुरू करण्यास परवानगी द्यावी, या मागणीचे पत्र जिल्हाधिकारी व इतर संबंधित अधिकाऱ्यांना आजच पाठविण्यात येईल,असे पाटील यांनी सांगितले.
गेली 7 -8 महिन्यांपासून मंडप व्यवसायिक हे कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे व्यवसाय सुरू करण्यास परवानगी नसल्याने आर्थिक अडचणीत सापडले आहेत, सध्या त्यांच्यापुढे कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झालेला आहे. गावोगावच्या मंडप व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आल्याचे या पदाधिकाऱ्यांनी यावेळी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.

