गडचिरोली ता.४:- जिल्ह्यातील पूरग्रस्त भागात शिरलेल्या पुराच्या पाण्यामुळे विविध आजार पसरू न देण्यासाठी आरोग्य विभागाकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. पुढील सात दिवस प्रत्येक पूरग्रस्त भागात गावस्तरावर आरोग्य तपासणी केली जाणार आहे. पुराच्या पाण्यामुळे अनेक ठिकाणी चिखल पसरले आहे. तसेच मृत जनावरे इतर मृत प्राण्यांपासून रोगराई पसरण्याची शक्यता असल्याने प्रशासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहे.
पूरग्रस्त भागात निर्जंतुकीकरण फवारणी, ब्लिचिंग पावडर टाकणे, नालीमध्ये औषधी टाकणे, आरोग्य कॅम्प लावणे तसेच आजार प्रतिबंधात्मक औषधांचे वाटप करणे अशी कामे सुरू करण्यात आली आहेत. सावंगी आमगाव, हनुमान नगर, वाघाळा डोंगरसावंगी, चुरमुरासह नजीकच्या गावांमध्ये याबाबत उपाययोजना राबविल्या जात आहेत.
पूर भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांनी आपल्या परिसरातील नागरिकांना पश्चात उद्भवणार्या रोगाबाबत तसेच घ्यावयाच्या काळजीबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करणे आवश्यक आहे. यासाठी दवंडी देणे सूचनाफलकावर माहिती देणे तसेच ग्रामपंचायत कर्मचारी, पदाधिकारी यांनी प्रत्यक्ष पूरबाधितांना त्यांना भेटून माहिती घ्यावी. त्यांना मार्गदर्शन करावे असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
आजार नियंत्रणाचे आव्हान
पाण्यामुळे होणारे रोग आटोक्यात आणण्यासाठी सार्वजनिक पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत स्वच्छ करावे, त्याचे क्लोरिनेशन करावे, घरातील पिण्याचे पाणी उकळून थंड करून प्यावे, डासांवर नियंत्रण मिळवण्यासाठी उघड्यावरील साचलेल्या पाण्याची विल्हेवाट लावणे, डास चावू नये म्हणून मच्छरदाणीचा उपयोग करावा तसेच पूर परिस्थितीमुळे मोठ्या प्रमाणात साप किंवा अन्य सरपटणाऱ्या प्राण्यांचे स्थलांतर झाल्यामुळे त्यांच्यापासून बचाव करावा, शौचालयाचा वापर करवा.
आरोग्य विभागाचे तपासणी कॅम्प
गावस्तरावर तपासणी कॅम्प लावली आहेत. त्या ठिकाणी दैनंदिन तपासणी करावी असे आव्हान आरोग्य विभागाने केली आहे. ज्या ठिकाणी कॅम्प नसतील त्या ठिकाणच्या नागरिकांनीही जवळील आरोग्य केंद्रात जाऊन तपासणी करावी. कोरोना परिस्थिती आणि पूरपरिस्थितीमुळे प्रत्येकाने स्वतःची आरोग्य तपासणी करणे आवश्यक आहे. स्वपरीक्षण करत असताना ताप,खोकला, पोट दुखणे असेल तर लगेच तपासणी करण्याचे आव्हान करण्यात आले.

