shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

'उरलेले पैसे भरा, त्यानंतरच बाळाचा मृतदेह ताब्यात देऊ'...!

-मदरहूड हॉस्पिटलचे विषारी फुत्कार; 
कांतीलाल कडू यांनी शिकविला धडा
.................................................................
अलिबाग । प्रतिनिधी (राजेश बाष्टे):
तब्बल १२ वर्षांनंतर महत्प्रयासाने झालेले बाळ आणि पत्नीचा खुललेला चेहरा पाहून दोन दिवस त्याचे पाय जमिनीवर नव्हते! पण सिझरिन करुन जन्मलेले ते बाळ अनपेक्षितपणे निपचित पडले.. दगावले...आणि तो बाप कोसळून पडला. पत्नीने फोडलेला हंबरडा कानात शिरत नाही तोच डॉक्टर समोर उभा राहिला आणि म्हणाला, 'उरलेले पैसे भरा. त्यानंतरच बाळाचा मृतदेह ताब्यात देऊ.' कुणीतरी उंच पर्वतावरुन ढकलून द्यावं आणि खाली दरीत गाडले जावे तसे त्याला वाटले. निम्मे आयुष्य ज्याचे कायदा आणि सुव्यवस्था यासाठी झिजले, त्या पोलिसाला 
आपल्यासमोर न्यायदेवतेचे वस्त्रहरण होताना दिसत होते. 

                     मा.कांतीलाल कडू 

पण दुःखाच्या जबरदस्त प्रहाराने त्याच्यात बळच उरले नव्हते. खिशात दमडीही नव्हती. रुग्णालयाने अचानक वाढवलेले बिल भरायचे कसे?... अखेर सामाजिक कार्यकर्ते कांतीलाल कडू, तुकाराम कंठाले तसेच खारघर पोलिसच त्याच्या मदतीला धावले आणि त्यांनी हाती दिलेला तो इवलासा थंड मांसाचा गोळा त्या बापाने काळजावर दगड ठेवून मातीआड केला .

त्याचे असे झाले. मुंबई पोलिस दलात कार्यरत असलेले पोलिस दादा कळंबोलीत राहतात. त्यांना लग्नानंतर बारा वर्षाने बाळ होणार होते. गेल्या 16 महिन्यात ते आणि त्यांची पत्नी बाळाच्या आशेने वैद्यकीय क्षेत्रातील अनेक आव्हाने पेलत होते. त्या पोटी दहा लाख रूपयांचा चुराडाही त्यांनी केला. अखेर ते बाळाचे आई-बाबा होणार या संकेताने आनंदित झाले.तीन दिवसांपूर्वी खारघर येथील मदरहूड हॉस्पिटलमध्ये पत्नीला आठव्या महिन्यातच दाखल केले होते. डॉक्टरांनी सिझर करावे लागेल. बाळ-बाळंतीण सुखरूप राहतील. त्यासाठी एक लाख पाच हजार खर्च येईल असे डॉक्टरांनी सांगितले. आनंदाच्या लहरींना अंगावर घेत त्यांनी होकार दिला.

सिझर झाले. गोंडस बाळ जन्माला आले. बाळाला एनआयसीयूटी ठेवले. राजस सुकुमाराचे गुलाबी ओठ, गोड मुख पाहून आई-बाबा पुलकित झाले. तिसऱ्या दिवशी त्या मातेला घरी सोडण्यात आले. हॉस्पिटलने एक लाख अडतिस हजार रूपये बिल आकारले. बच्चूसाठी आगाऊ रक्कम म्हणून पन्नास हजार वेगळे आकाराले. तेही सहन केले.संध्याकाळी तेथील डॉक्टरांनी बाळ दगवल्याचे सांगितले आणि क्षणात त्यांच्या बारा वर्षाच्या स्वप्नांचा चुराडा झाला. डॉक्टरांनी निर्दयीपणे त्यांना सांगितले. 
उरलेले पैसे भरा, त्यानंतरच बाळाचा मृतदेह ताब्यात देऊ' हे शब्द त्यांच्या कानात तप्त लाव्हारस ओतावे तसे हॉस्पिटल प्रशासनाने ओतले आणि त्यांनी जीवाचा आकांत करून हंबरडा फोडला.

सदरक्षणाय खलनिग्रणाय हे ब्रीद जोपासत त्यांनी निम्मं आयुष्य मुंबई पोलिस दलात खर्ची केले, त्या पोलिसदादा समोर आज न्याय देवतेचे वस्त्रहरण होत होते. त्यांनी डॉक्टरांना विनंती केली. माझं बाळ द्या, त्याचा मृतदेह माझ्या ताब्यात द्या. पण हॉस्पिटल प्रशासनाला पाझर फुटेना. त्या पोलिस दादाच्या मदतीला आणखी काही त्याचे पोलिस दलातील मित्र धावून आले. त्यांनी हात जोडले. परंतु मदरहूड हॉस्पिटल प्रशासन ढिम्मपणे त्यांच्या चेहऱ्याकडे पाहत होते.त्यांच्यातील सुनील इंगोले यांनी खारघर येथील सामाजिक कार्यकर्ते तुकाराम कंठाले यांना फोन करताच त्यांनी हॉस्पिटलला धाव घेतली. त्यांनी विनंती केली पण हॉस्पिटलने उरलेले पैसे भरा, त्यानंतरच बाळाचा मृतदेह ताब्यात देऊ' असा धोशा सुरूच ठेवला.कंठाले यांनी अखेर ब्रह्मास्त्र भात्यातून काढले. त्यांनी पनवेल संघर्ष समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांच्याकडे ही कैफियत मांडली.


कडू यांनी मदरहूड हॉस्पिटल प्रशासनाला विनंती केली. पण त्यांनी उर्वरित 77 हजार रुपये भरण्याचा सल्ला दिला. बाळासाठी त्यांनी तीन दिवसाचे वेगळे एक लाख सत्तावीस हजाराचे बिल आकारले होते. म्हणजे तीन दिवसात दोघांचे बिल जवळपास दोन लाख पासष्ठ हजार रूपये झाले होते. त्यातील एक लाख अठ्याऐंशी हजार भरले होते. तरीही हॉस्पिटल ऐकायला तयार नव्हते. आता रात्रही अंगावर येत होती. कडू यांनी डॉ. बिराजदार यांना फोन केला. त्यांनी प्रतिसाद दिला नाही. मेसेज पाठविला. पण काहीच उत्तर दिले नाही. मग कडू यांची सटकली. आता कायद्याची भाषा शिकवायला लागेल म्हणत पोलिसांत तक्रार केली. 
सामान्य माणसांना नडणारे डॉ. बिराजदार आता कोविड योद्धा असणाऱ्या पोलिसदादाला नाहक छळत होते. कडू यांनी वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रदीप तिदार यांना हकिगत सांगितली. कंठाले, इंगोले आणि मित्रांना पोलिस ठाण्यात पाठविले. 

त्या नंतर पोलिस उपनिरीक्षक जगताप यांनी ताबडतोब हॉस्पिटलमध्ये धाव घेतली. पैशांसाठी अडवणूक केलेल्या हॉस्पिटल प्रशासनाला बाळाचा मृतदेह देण्यास सुचविले. त्यानंतर हा तिढा सुटला. निपचित पडलेला कोवळ्या मांसाचा देह दोन्ही हाताने कुरवाळत बापाने पुन्हा हंबरडा फोडला. त्याला घरी नेले. आईच्या स्वाधीन केले. घरात एकच टाहो फुटला. त्यानंतर काळजावर दगड ठेवत मूठमाती दिली.
close