shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

गोलंदाजांचं कब्रस्तान ठरतंय शारजाचं मैदान...?


श्रीरामपूर:- सन २०२० ची आयपीएल स्पर्धा कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळे भारतात न होता युएई मध्ये खेळवली जात आहे. अर्थात तेथे कोविड-१९ चा संसर्ग नाही असे नाही परंतु तेथे भारताच्या तुलनेत हा प्रादुर्भाव कमी असून आयपीएलमध्ये सहभागी लोकांच्या सुरक्षिततेसाठी तेथील वातावरण काहीसं पोषक असल्याने सध्या तेथे गेल्या १६ दिवसांपासून आयपीएलचे आयोजन निर्विघ्नपणे चालू आहे. परंतु या स्पर्धेत फलंदाजांकडून जीवघेणी टोलेबाजी चालू आहे तिच्यामुळे समस्त सहभागी संघातील गोलंदाजांचे मरण होत आहे, आणि केंद्रबिंदू ठरत आहे शारजाचं " शारजा इंटरनॅशनल स्टेडियम ! "

संयुक्त अरब अमिरात म्हणजे युएईत सध्या अबुधाबी, दुबई व शारजा या तिन स्टेडीयममध्ये आयपीएल सामन्यांचे आयोजन सुरू असून अबुधाबी व दुबईच्या तुलनेत शारजाचं मैदान आकाराने छोटे असून फलंदाजांसाठी नंदनवन ठरत आहे तर गोलंदाजांचे कब्रस्तान बनले आहे.

सन १९८४ पासून शारजात अधिकृत क्रिकेट खेळले जात असून त्या काळी पाकिस्तानचे यॉर्कर किंग वासिम अक्रम, वकार युनुस, अकिब जावेद व इतरही वेगवान गोलंदाजांची गोलंदाजी खेळणे भल्याभल्या फलंदाजांना कठीण जायचे. याचा अर्थ असा की त्या काळचे शारजाचे मैदान गोलंदाज धार्जिणे होते. परंतु आता परिस्थिती पूर्णपणे बदलली असून आजच्या स्थितीला फलंदाजच तेथे गोलंदाजांंचे कर्दनकाळ बनले आहेे.                
        
सध्या सुरू असलेल्या तेराव्या आयपीएल सत्रात शारजाच्या मैदानावर केवळ चार सामने खेळले गेले असून त्यातील पहिल्या सात डावात प्रत्येक संघाने दोनशेचा आकडा पार केला आहेे. यावरून एक लक्षात येत आहे की या छोटया मैदानात गोलंदाजांना किती मार पडत असेल ?

दुबई व अबुधाबी मध्ये शारजाच्या तुलनेत जास्त सामने खेळले गेले असून तेथे गोलंदाजांना शारजा इतका त्रास झाला नाही. शारजाच्या या मैदानात वरील दोन मैदानांपेक्षा षटकारांचा पाऊस मोठया प्रमाणात पडला आहे. शारजात रविवार अखेर १११ षटकार बरसले असून दुबईत पंजाब व चेन्नई यांच्यातील सामन्यापूर्वी ८१ तर अबुधाबीत फक्त ६६ षटकार टोलविण्यात फलंदाज यशस्वी झाले आहेत. थोडंस अंकगणिताच्या भाषेत बघायचं ठरलं तर शारजात दर आठव्या चेंडूवर षटकार मारला गेला आहे, तर दुबईत दर २० व्या चेंडूवर व अबुधाबीत दर २२ चेंडू नंतर षटकार बघायला मिळाला आहे.

अबुधाबीत आतापर्यंत सहा बारा डावात एकदाही कोणताही संघ २०० चा आकडा पार करू शकला नाही. तेथे बारा डावात १९११ धावा निघाल्या आहेत तर शारजात केवळ चार सामन्यातील आठ डावात १६८५ धावा ठोकल्या गेल्या आहेत तर दुबईत ८ सामन्यांच्या १६ डावात २६३४ धावा निघाल्या आहेत.

आयपीएलच्या चालू सत्रात धावांचा पाठलाग करताना सर्वाधिक धावा शारजातच बनल्या आहेत. किंग्ज इलेव्हन पंजाबने बनविलेल्या २२३ धावा राजस्थान रॉयल्सने ४ गडी व ३ चेंडू राखून २२६ धावा करत लिलया टोलविल्या. याच मैदानावर एका षटकात पाच षटकार मारण्याचा पराक्रमही राजस्थानच्या राहुल तेवतीयाने करून दाखविला. तर वैयक्तिक १६ षटकार दोन सामन्यात राजस्थानच्याच संजू सॅमसनच्या नावे आहे. यावरून आपल्या सहज लक्षात येईल की शारजात गोलंदाजांना किती घाम गाळावा लागत असेल ? शिवाय एवढं करूनही यशस्वी होण्याची हमी नाहीच.

लेखक : -
डॉ.दत्ता विघावे
 क्रिकेट समिक्षक. 
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत. 
Email:  dattavighave@gmail.com
close