प्रतिनिधी । मोहन शेगर :
चिंचवड, पुणे– आई-वडिलांना शिवीगाळ करून मारहाण केली. तसेच त्यांचा सांभाळ केला नाही. याबाबत मुलगा आणि सुनेवर ज्येष्ठ नागरिक आणि पालक यांचे पालन पोषण आणि कल्याण कायदा कलम 24, भारतीय दंड विधान कलम 324, 323, 504, 506, 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सचिन जगन्नाथ गीते (वय ४१), प्रियंका सचिन गीते (वय ३६, रा. बिजलीनगर, चिंचवड) अशी गुन्हा दाखल झालेल्या मुलगा आणि सुनेचे नाव आहे. याबाबत जगन्नाथ सोनुती गीते (वय ७५) यांनी काल चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गीते यांचा मुलगा सचिन आणि सून प्रियंका यांनी फिर्यादी आणि त्यांच्या पत्नीचे सन २०१६ पासून पालन पोषण केले नाही.
तसेच दरम्यानच्या कालावधीत मुलगा आणि सुनेने वृद्ध आई-वडिलांना शिवीगाळ, मारहाण करून धमकी दिली.मुलगा सचिन याने वडिलांना लाकडी बांबूने मारहाण केली. आई-वडिलांचा छळ केल्याची फिर्यादी वडिलांनी नोंदवली आहे.
चिंचवड पोलीस पुढील तपास करीत आहेत.

