इंदापूर । प्रतिनिधी (तात्याराम पवार)
इंदापूर (३० ऑक्टोबर) : जगाला शांती, समता आणि बंधुतेचा संदेश देणारे, अखिल मानवजातीचे उधारकर्ते प्रेषित मुहम्मद साहेब यांच्या जयंतीनिमित्त इंदापूर शहरातील H.K.G.N ग्रुप आणि बागवान जमात यांनी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. ही जयंती राज्य शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचना व विधायक पध्दतीने साजरी करण्यात आली. यावेळी कोरोना काळात समाजकार्याच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण कार्य करणाऱ्या विविध क्षेत्रातील कोरोना योध्याना सन्मानचिन्ह देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
खऱ्या अर्थाने जगाला शांती, समता आणि बंधुतेचा संदेश देणारे, अखिल मानवजातीचे उधारकर्ते प्रेषित मुहम्मद साहेब यांच्या शिकवणींना अनुसरून समाजोपयोगी कार्याच्या माध्यमातून ही जयंती पार पडावी या उद्देशाने आणि राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन करत H.K.G.N ग्रुप आणि बागवान जमात यांनी इंदापूर शहरातील दर्गाह मस्जिद चौकात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. तब्बल २६३ बाटल्यांचे रक्तसंकलन यावेळी करण्यात आले. या रक्तदान शिबिराचे उदघाटन नीरा भीमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी रक्तदात्यांना विविध भेटवस्तू देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. तर कोरोना काळात समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या डॉक्टर्स, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, नगरपालिका कर्मचारी आणि राजकीय क्षेत्रातील विविध कोरोना योद्यांचा सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.
इंदापूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षा सौ. अंकिता शहा यांनी आपल्या भाषणामध्ये, प्रेषित मुहम्मद साहेब संयमाचा महामेरू असल्याचे स्पष्ट करणाऱ्या प्रेषितांच्या जीवनातील एका प्रसंगाचा हवाला देताना, प्रेषितांची शिकवण केवळ एका जाती वा धर्मासाठी नसून ती अखिल मानवजातीसाठी मार्गदर्शन असल्याचे म्हटले. समाजाला योग्य दिशा देण्यासाठी प्रेषितांची शिकवण केवळ ऐकण्या वा बोलण्यापुरती मर्यादित न ठेवता ती आचरणात आणण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे नमूद केले. H.K.G.N ग्रुप आणि बागवान जमात अविरतपणे करत असलेल्या सामाजिक कार्याचा उल्लेख करताना त्यांचे हे कार्य इंदापूर शहरातील सर्व जाती धर्मांना जोडणारा दुवा ठरत असल्याचे सांगितले.
आतापर्यंत तब्बल ४२ वेळा निर्हेतु रक्तदान करून एक आगळा वेगळा विक्रम करणारे इम्रान जमादार यांनी सर्व जाती धर्मातील युवकांना रक्तदान करण्याचे आवाहन करताना आपण 'दिव्य कुरआनातील 'ज्याने एका माणसाचे प्राण वाचवले त्याने संपूर्ण मानवजातीचे प्राण वाचवले या श्लोकापासून प्रेरित होऊनच रक्तदानासारखे पवित्र कार्य ४२ वेळा करू शकल्याचे म्हटले. तर प्रेषितांचे अनुयायी या नात्याने प्रेषितांची शिकवण विधायक पद्धतीने समाजासमोर ठेवणे आणि त्यामाध्यमातून समाजात एकोपा निर्माण करणे हाच या रक्तदान शिबिराचा महत्वाचा असल्याचे ऍड. आसिफ बागवान यांनी म्हटले.

