इंदापूर : प्रतिनिधी
अतिवृष्टीने इंदापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सोलापूर पेक्षाही इंदापूर तालुक्याचे नुकसान हे सर्वाधिक आहे. आज दि.२४ रोजी इंदापूर येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित करण्यात आलेल्या आढावा बैठकीदरम्यान राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी विचारलेल्या प्रश्नांना योग्य प्रकारे उत्तरे न दिल्याने, त्यांच्या असमाधानकारक कामावर नाराजी व्यक्त करत, कामात सुधारणा करण्याची तंबी देवून कामचुकार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करणार असल्याचा इशारा या बैठकीत दिला.
या आढावा बैठकीस उपविभागीय दंडाधिकारी दादासाहेब कांबळे,तहसीलदार सोनाली मेटकरी,गटविकास अधिकारी विजयकुमार परिट,मुख्याधिकारी डॉ.प्रदीप ठेंगल,वैद्यकिय अधिकारी डाॅ.सुहास शेळके,इंदापूरचे सहाय्यक पोलीस निरिक्षक गणेश लोकरे,वालचंदनगरचे दिलीप पवार,भिगवण चे रियाज शेख,तालुका कृषी अधिकारी रुपनवर, महावितरणचे रघुनाथ गोफणे,वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल काळे यावेळी उपस्थित होते.
इंदापूर तालुक्यात अॉक्टोंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पूरपरिस्थिती निर्माण होवून शेतीपिकांचे,घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.हे नुकसान सोलापूरपेक्षाही सर्वाधिक असल्याचे त्यांनी सांगितले. आढावा बैठकीत या झालेल्या नुकसानीविषयी संबंधित विभागाच्या प्रमुखांकडून माहिती घेत असताना आ. भरणे यांनी अधिकार्यांवर अनेक प्रश्नांची सरबत्ती केली परंतु अधिकारीवर्गांनी आ.भरणे त्यांच्या प्रश्नांना समाधान कारक उत्तरे न दिल्याने त्यांनी संतप्त होत परिस्थितीचा गांभिर्याने विचार करा, अॉफिसमध्ये बसून कागदे न रंगवता तळागाळात जावून कामे करा असे त्यांनी अधिकाऱ्यांना सुनावले.
राज्यमंत्री आ.भरणे पुढे म्हणाले की, सध्याचा काळ हा कसोटीचा आहे.अतिवृष्टीने शेतकरी वर्गाचे प्रचंड नुकसान झालेले आहे.अधिकारी वर्गाने गाफील न राहता व प्रत्यक्ष ग्राउंड वर जाऊन शेतकऱ्यांशी चर्चा करुन स्वतः खात्री करावी. अटी व शर्थीवर बोट न ठेवता थेट कागदावरती पंचनामा घ्यावा.यापासून कोणताही शेतकरी वंचित राहू नये अश्या सूचना आ.भरणे यांनी उपस्थित अधिकारीवर्गाला दिल्या.
पुढे म्हणाले की, तालुक्यातील प्रत्येक अधिकारीवर्गांनी केलेल्या कामाचा अहवाल स्वतः मला वेळोवेळी द्यावा. तालुक्यात झालेल्या नुकसानीचे कामकाज मार्गी लागेपर्यंत कोणीही आपापले मुख्यालय सोडू नये. जर
अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे एखादा व्यक्ती पंचनाम्याच्या प्रक्रियेतून वंचित राहिला तर त्यास संबंधित अधिकार्यांना जबाबदार धरुन त्यांच्यावर थेट कारवाई केली जाईल असा इशाराच आ.भरणे यांनी दिला.
सर्व अधिकारी वर्गांनी कोणतेही सबब न सांगता दोन दिवसांमध्ये तहसीलदार सोनाली मेटकरी व प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांच्यापुढे आपापल्या कामकाजाचे अहवाल सादर करावेत अशा स्पष्ट सूचना आ. दत्तात्रय भरणे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
====================================
तालुक्यातील प्रशासकीय यंत्रणेला माझ्या कुटुंबाचा विसर...
आढावा बैठकीत राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी तालुक्यातील कोरोना सद्यस्थितीची माहिती घेत असताना "माझे कुटुंब माझी जबाबदारी" या मोहिमचे इंदापूर शहरात चांगले काम आहे. याउलट ग्रामीण भागात या मोहिमेविषयी साशंकता व्यक्त करत. असमाधानकारक कामाविषयी त्यांनी नाराजी व्यक्त केली.
मी व माझे कुटुंब तालुक्यातील एक असून "माझे कुटुंब माझी जबाबदारी" या मोहीमेअंतर्गत माझ्या कुटुंबापर्यंत अद्याप पर्यंत कोणीही पोहोचलेलेच नाही. ज्या दिवशी माझ्या कुटुंबाची व माझी तपासणी संबंधित यंत्रणेमार्फत होईल त्या दिवशी मला विश्वास बसेल की कामकाज व्यवस्थित चालू आहे असे आ.भरणे यांनी सांगितले.
माझ्या कुटुंबाचा विसर हा येथील यंत्रणेला पडू न नये याकरीता तात्काळ तालुक्यातील उर्वरीत सर्वेक्षण करण्याच्या सूचना आ.भरणे यांनी प्रशासनाला दिल्या.
====================================
====================================


