श्रीरामपूर : - पिंपरी चिंडवड येथे राहणाऱ्या ॲड. डॉ. जया बाळकृष्ण उभे यांनी वेगवेगळ्या विषयांच्या व विविध विद्यापिठे व शासन मान्य शैक्षणिक संस्थाच्या एकूण ४८ पदव्या मिळवून एक आगळावेगळा विश्वविक्रम स्थापित केला आहे. डॉ. जया बाळकृष्ण उभे यांनी ४८ पदव्या मिळवून सर्वात जास्त पद्व्या मिळविणारी पहिली महिला म्हणून विश्वविक्रम केला आहे.
डॉ. जया उभे यांचा विश्वविक्रम झाल्याचे नोंदणीपत्र, मानपत्र, सन्मानचिन्ह, व इतर दस्तऐवज ओएमजी बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड तर्फे देण्यात आले आहे व त्या आशयाची नोंद ओएमजी बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्यात आली आहे.
डॉ. जया उभे ह्या पुणे येथील न्यायालयात वकीली करत असून अतिशय बिकट परिस्थितीतून त्यांनी आपले हे उच्च दर्जाचे शिक्षण घेतले आहे. जगातील सर्वात जास्त पदव्या घेण्याचा विश्वविक्रम नावे असलेले महाराष्ट्राचे माजी अर्थमंत्री व दिवंगत काँग्रेस नेते डॉ. श्रीकांत जिचकार यांचा ५० पदव्यांचा विक्रम मोडण्याचा त्यांचा मानस आहे.
डॉ. जया उभे या सामाजिक क्षेत्रातही अग्रेसर असून १५ निराधार महिलांचा सांभाळ करत आहेत. विविध सामाजिक उपक्रमही त्या राबवित असून गरजू लोकांना त्या मोफत कायदेशीर सल्ला देण्याचे समाज कार्यही करत आहेत.

