shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

दिल्ली कॅपिटल्सच्या अडचणी वाढल्या..!

मंगळवारी रात्री दुबईच्या दुबई इंटरनॅशनल स्टेडीयमवर सन रायझर्स हैद्राबाद व दिल्ली कॅपिटल्स या गुणतालिकेत ७ व्या व दुसऱ्या क्रमांकावरील संघात एक महत्वाचा सामना खेळविण्यात आला. या सामन्यातील विजय दिल्ली कॅपिटल्सला प्ले ऑफ मधील स्थान पक्कं करणार होता, तर हैद्राबादचे आव्हान टिकविणार होता. मागील दोन सामने गमावल्याने दिल्लीचा संघ मानसिक दृष्टया कमजोर होता. तर बर्थ डे बॉय डेव्हीड वॉर्नरचा संघही अस्थिर खेळामुळे चिंताक्रांत होता.

इंग्लिश खेळाडू जॉनी बॅरिअस्टोला आराम देऊन परदेशी खेळाडूंच्या कोटयातून केन विल्यमसन संघात आला तर यष्टीरक्षक व सलामीवीर म्हणून वृध्दीमान साहाला पसंती मिळाली. या सत्रातील पहिल्या टप्प्यात एक सामना खेळलेला साहा त्या डावातील संथ खेळीमुळे टिकाकारांचे लक्ष बनला होता. परंतु या सामन्यात कर्णधार वॉर्नरचा आक्रमकपणा बघून त्याच्यातही उत्साह संचारला व दोघांनी मिळून दिल्लीला सुरूवातीपासूनच बॅकफूटवर जायला भाग पाडले. वॉर्नर - साहा यांच्या जोरदार वारानंतर मनिष पांडेनेही आपले शक्तीप्रदर्शन केले.

चालू आयपीएल सत्रात सर्वाधीक बळी मिळवून पर्पल कॅपचा मानकरी ठरलेला दिल्लीचा कॅगिसो रबाडाची या सत्रात प्रथमच बळींची पाटी कोरी राहीली. सन २०१७ नंतर रबाडावर प्रथमच अशी वेळ आयपीएलमध्ये ओढावली. योगायोगाने तो सामनाही सन रायझर्स हैद्राबाद विरूध्दच झाला होता.

या सामन्यात स्पर्धेत सर्वात वेगाने मारा करणारा दिल्लीचा ऑनरीच नॉर्खिया देखील आपला प्रभाव पाडू शकला नाही, तर कर्णधार श्रेयस अय्यरसाठी हा सामना वाईट स्वप्नासारखाच ठरला. अय्यरने गोलंदाजीत केलेले बदल अनाकलनीय होते तर क्षेत्ररक्षण लावतानाही त्याचा नेहमीचा उत्साह नव्हता. हैद्राबादच्या मोठया धावसंख्येचा पाठलाग करताना त्याने फलंदाजांच्या क्रमवारीत केलेले बदल दिल्लीला सामन्यातून बाद करण्यात कारणीभूत ठरले. श्रेयस अय्यरचे नेतृत्व दर सामन्यागणिक सुधारण्याऐवजी बिघडत असल्याचेच चित्र सध्या दिसत आहे. शिवाय दिल्लीचे पुढील दोन सामने मुंबई इंडियन्स व आरसीबी या बलाढय संघाबरोबर होणार असल्याने असेच त्यांचे प्रदर्शन राहीले तर प्ले ऑफच्या जवळ जाऊनही प्लेऑफची दिल्ली त्यांच्यासाठी दूर राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

हैद्राबादच्या विजयात चमकदार खेळ करणाऱ्या विजयीविरांच्या कामगिरीवर एक दृष्टीक्षेप टाकूया.

आपला वाढदिवस धडाकेबाज खेळाने साजरा करणाऱ्या डेव्हीड वॉर्नरने शेवटही विजयाने केला. या चालू सत्रात पॉवर प्ले मध्येच अर्धशतक ठोकणारा पहिला फलंदाज बनलेल्या वॉर्नरने त्यासाठी केवळ २५ चेंडू खेळले होते. तर या डावातील ६६ धावांची खेळी केवळ ३४ चेंडूत आली, त्यामध्ये त्याने आठ चौकार व २ षटकार ठोकले. कर्णधार म्हणूनही वॉर्नर उजवा ठरला. 

या सत्रात प्रथमच सलामीला खेळणाऱ्या वृध्दीमान साहाने वॉर्नरराच कित्ताता गिरविताना दणकेबाज ८७ धावा ठोकल्या. वॉर्नरसह शतकी भागिदारी करताना साहाने ४५ चेंडू खेळताना १२ चौकार व दोन षटकार फटकविले. वॉर्नर व साहाइतकी जोरदार नसली तर संघासाठी महत्वाची खेळी करणाऱ्या मनिष पांडेने ३१ चेंडूत नाबाद ४४ धावा फटकविल्या. त्यात त्याने चार चौकार व एक षटकार मारला.

दिल्ली व हैद्राबाद या दोन संघातील मुख्य फरक होता हैद्राबादचा अफगाणी फिरकी गोलंदाज राशिदखान. आपल्या आयपीएल कारकिर्दीतील अविस्मरणीय कामगिरी करताना राशिदने चार षटकात ३ बळी मिळविताना केवळ ७ धावा दिल्या. अजिंक्य राहाणे, शिमरन हेटमायर व अक्षर पटेलला तर त्याने अक्षरशः मामा बनविले.

वेगवान गोलंदाज संदिप शर्माही प्रभावी ठरला. त्याने चार षटकात शिखर धवन व रिषभ पंतला कटवले व मात्र २७ धावा मोजल्या.

लेखक : -  
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक. 
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत. 
Email:  dattavighave@gmail.com
close