सावळीविहीर (प्रतिनिधी) :
महाराष्ट्र राज्यामध्ये ग्रामपंचायतींना स्थिरता यावी व विकास कामे करता यावीत. यासाठी पक्षांतर बंदी कायद्याप्रमाणेच ग्रा.पं.साठी पॅनल बंदी कायदा लागू करण्यात आला असून या निर्णयाचे महाराष्ट्र राज्य सरपंच परिषदेने स्वागत करत राज्याचे ग्रामविकास मंत्री नामदार हसन मुश्रीफ यांचे अभिनंदन केले आहे.
या नामदार हसन मुश्रीफ यांना पाठविलेल्या पत्रात महाराष्ट्र राज्य सरपंच परिषदेने म्हटले आहे कि, कोल्हापूर येथे महाराष्ट्र राज्य सरपंच परिषद घेण्यात आली होती. यावेळी महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री . हसन मुश्रीफ यांना सरपंच परिषदेच्या वतीने निवेदन देऊन मागणी करण्यात आली होती की, राज्यांमधील ग्रामपंचायतीमध्ये पॅनल केले जातात .मात्र पॅनल मध्ये निवडून आलेले ग्रामपंचायत सदस्य नंतर आपल्या गरजेप्रमाणे व आपल्या फायद्यासाठी ज्या पॅनल मधून निवडून आले त्यांना सोडून देऊन विरोधी पॅनल मध्ये समाविष्ट होतात.
त्यामुळे अनेकदा सरपंच उपसरपंच यांना पाय उतार व्हावे लागते किंवा अडचणी निर्माण होतात. त्यामुळे ग्रामपंचायतींना योजना राबवताना किंवा विकास करताना मोठ्या अडचणीला तोंड द्यावे लागते. म्हणून महाराष्ट्रातील ग्रामपंचायतीमध्ये स्थिरता यावी. विकास साधता यावा यासाठी जशी राज्यात पक्षांतर बंदी लागू आहे. तशीच पॅनल मध्ये हि बंदी म्हणजे एका पॅनल मधून निवडून येणाऱ्या व नंतर इतर पॅनल मध्ये गेल्यास त्याचे पद रद्द व्हावे किंवा पुढील निवडणुकीसाठी बंदी असावी.
अशी मागणी करण्यात आली होती. या मागणीचा विचार करून महाराष्ट्र राज्य शासन व ग्राम विकास मंत्री नामदार हसन मुश्रीफ यांनी त्यावेळी आश्वासन दिले होते, व या आश्वासनाचे रूपांतर आता पूर्ण करण्यात आले आहे. त्यामुळे येथून पुढे महाराष्ट्र राज्यातील ग्रामपंचायतीमध्ये एका पॅनल मधून निवडून आलेल्या ग्रामपंचायत सदस्याला आता आपला पॅनल किंवा आपली पार्टी सोडणे मुश्कील होणार आहे. जर ज्या पॅनेलमधून आपण निवडून आलो तो पॅनल सोडल्यास त्याचे सदस्यत्व रद्द होऊ शकते तसेच त्याला पुढील निवडणुकीत उभं राहण्याची अडचण निर्माण होऊ शकते .असे विविध निर्णय घेण्यात आले आहेत.
ग्रामपंचायतीसाठी पॅनल बंदी कायदा लागू केल्याबद्दल महाराष्ट्र राज्यातील सर्व सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व नागरिक व सरपंच परिषदे च्या वतीने समाधान व्यक्त करण्यात येत आहे. तसेच सरपंच परिषदेच्या वतीने राज्याचे ग्रामविकास मंत्री नामदार हसन मुश्रीफ यांनाही पत्र पाठवून त्यांचे अभिनंदन करण्यात आले आहे. या पत्रकावर सरपंच परिषदेचे प्रदेशाध्यक्ष दत्ता काकडे प्रदेश उपाध्यक्ष अनिल गीते प्रदेश राज्य सरचिटणीस एडवोकेट विकास जाधव यांची नावे व सह्या आहेत. तसेच महाराष्ट्रातील नागरिकांमधूनही या निर्णयाबद्दल समाधान व्यक्त होत आहे.

