तेरावे आयपीएल सत्र आता उत्तरार्धात पोहोचले असून या स्पर्धेत होणाऱ्या एकूण ६० सामन्यांपैकी ४१ वा सामना सहा दिवसांच्या विश्रांतीनंतर शारजाच्या मैदानावर मुंबई इंडियन्स व चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात खेळविण्यात आला. स्पर्धेच्या सुरूवातीला गोलंदाजांसाठी कब्रस्तान सिध्द झालेली शारजाची खेळपट्टी सहा दिवसात मशागत करून चकचकीत बनविण्यात आली होती. त्यामुळे या खेळपट्टीवर फलंदाजांना चांगले खेळल्यास धावा मिळणार होत्याच शिवाय गोलंदाजांनाही ती सहाय्य करणार हे उघड होते. त्यामुळे या सामन्यात महत्वाची असलेली नाणेफेक तंदुरुस्त नसलेल्या मुंबई इंडियन्सच्या कर्णधार रोहीत शर्मा ऐवजी हंमागी नेतृत्व करणाऱ्या किरॉन पोलार्डने जिंकली व सर्वांना चक्रावून टाकणारा प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
या सत्रातला उदघाटनाचा सामना या दोन पारंपारीक प्रतिस्पर्ध्यातच खेळविण्यात आला होता. तेंव्हा चेन्नईने बाजी मारली होती. परंतु ३५ दिवसात पुलाखालून बरेच काही वाहून गेले. त्यामध्ये चेन्नईचे जुने वैभव निघून गेल्याने त्यांच्या या स्पर्धेतील अस्तित्वाचाच प्रश्न निर्माण झाला आहे. त्याच पार्श्वभूमिवर हा सामना सुरू झाला.प्रथम फलंदाजीला आलेल्या चेन्नईची पहिल्या षटकातच पडझड सुरू झाली. ट्रेंट बोल्ट व जसप्रित बुमराहाच्या वादळी माऱ्यापुढे त्यांचा निम्मा संघ पॉवर प्ले संपायच्या आधीच डग आऊटमध्ये परतला होता. जुना थकलेला कांगारू शेन वॉटसनला आराम दिल्यानंतर त्याच्या जागी आलेला नव्या दमाचा ऋतूराज गायकवाड ट्रेंट बोल्टच्या हाय व्होल्ट पुढे कोलमडला आणि मग चेन्नईचा डाव पत्त्याच्या बंगल्या प्रमाणे कोसळला. जणू त्यांच्या फलंदाजात माघारी परतायची शर्यतच लागली होती.
सेवानिवृत्तीनंतरही खेळण्याचा मोह न आवरणाऱ्या अंबाती रायडूला जसप्रित बुमराहाने आवरलं व त्याच षटकात नवा नारायण जगदिशनही आल्या पावली परतला. फॉर्मातला ड्यू फ्लेसीस फेल गेला तर डावखुरा रविंद्र जडेजा आपलं काही देणं घेणं नसल्यासारखा क्षेत्ररक्षकाला दसऱ्याची गिफ्ट म्हणून झेल देऊन निघून गेला.एकेकाळचा ढाण्या वाघ कर्णधार महेंद्रसिंह धोनी दात व नख्या काढलेल्या सिंहासारखा भासला. नेहमी ओसंडून वाहणारा त्याचा आत्मविश्वास त्याच्या खेळातच नाही तर सामन्यापूर्वी व नंतर झालेल्या संभाषणातही जाणवला नाही. त्याचा जुना बडेजाव या सत्रात बिलकुल जाणवला नाही. तसेच संकटाच्या वेळी या सामन्यातही त्याने निराशा केली.
गोलंदाज दिपक चाहर आपला चुलत भाऊ राहुलच्या फसव्या चेंडूवर चकला तर शार्दूलची ठाकूरी फिकी पडली. परंतु या सगळ्या पडझडीत इंग्रज शिपाई सॅम करण अर्जुनासारखा खेळला. त्याला पाकिस्तानी वंशाच्या आफ्रिकन इम्रान ताहीरने मोलाची साथ दिल्याने चेन्नईला किमान लाज राखणारी शंभरी ओलांडता आली. परंतु ट्रेंट बोल्टने डावाच्या शेवटच्या चेंडूवर करणची भंबेरी उडविली.
सन २०१० मध्ये ११६ धावांचं रक्षण करताना विजयी पराक्रम करणाऱ्या चेन्नईकडून यावेळीही चमत्काराची अपेक्षा होती. परंतु गोलंदाजीत ज्याप्रमाणे बोल्ट, बुमराहा,चाहर, कृणाल, कुल्टर नाईलने चेन्नईला लगाम घातला. अगदी त्याच्या उलट मुंबईचे सलामीवीर क्विंटन डिकॉक व प्रथमच या सत्रात सलामीला खेळणाऱ्या इशान किशनने नाबाद राहात विजयाचे लक्ष पार केले व मुंबईला आपला सर्वाधिक चेंडू राखून दुसरा मोठा विजय मिळवून दिला.चेन्नईने आतापर्यंत खेळलेल्या १३ पैकी ११ सत्रातला हा पहिला दहा गडी राखून झालेला पराभव चाखला. या पराभवाने चेन्नईचे या स्पर्धेतील आव्हान संपल्यात जमा असून केवळ जर तरचे गणित त्यांना पुढे घेऊन जाईल. परंतु त्याची यंत्कींचितही शक्यता दिसत नाही.
या एकतर्फी विजयाने सरस धावगतीसह मुंबई इंडियन्स गुणतालिकेत आघाडीवर पोहोचले असून त्यांनी मात्र या सत्रातील पहिल्या पराभवाचा चेन्नईवर सडकून बदला घेतला.
लेखक : -
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत.
Email: dattavighave@gmail.com

