shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

चार पराभवानंतर दिल्लीचा महत्वाच्या सामन्यात विजय..!!

सन २०२० हे वर्ष सर्वच बाबतीत चमत्कारीक सिद्ध झाले. वर्षाच्या सुरुवातीलाच कोविड-१९ ने संपूर्ण जगाला संकटात टाकल्यानंतर संपूर्ण जनजीवन अस्ताव्यस्त झाले. त्यातच क्रिकेटचा पोबारा उडाला. त्याचा मोठा फटका आयपीएलला बसला. मार्चच्या शेवटच्या आठवडयात ठरविलेले तेरावे सत्र कोरोना व्हायरसच्या संक्रमणामुळे भारतापेक्षा काही अंशी सुरक्षित असलेल्या युएईत हलविण्यात आले. सध्या युएईत सुरू असलेले आयपीएलचे तेरावे सत्र आता अगदी अंतिम टप्प्यात पोहोचले असून साखळी स्पर्धेच्या शेवटच्या दिवसापर्यंत प्ले ऑफ मध्ये खेळणाऱ्या चौथ्या संघाची निश्चिती झाली नव्हती.
तेराव्या आयपीएल सत्राच्या ५५ व्या सामन्याला उपांत्यपूर्व फेरीचे वलय प्राप्त झाले होते. या सामन्यातील विजेता थेट दुसऱ्या क्रमांकावर जाणार असल्याने दोन्ही संघांकडून जोरदार प्रतिकाराची अपेक्षा होती. मात्र दिल्ली कॅपिटल्सने रॉयल चॅलेंजर्स बंगलुरूला लिलया हरवून १६ गुणांसह गुणतालिकेत दुसरे स्थान पटकविले. त्यामुळे दिल्ली पहिल्या क्वॉलीफायर मध्ये पराभूत झाले तरी अंतिम फेरी गाठण्याची आणखी एक संधी उपलब्ध होणार आहे. दिल्ली कॅम्पिटल्स सलग चार सामने हरल्यानंतर काहीशा कठोर मानासिकतेने या सामन्यात उतरले. हीच कणखरता त्यांनी संपूर्ण सामन्यात राखल्याने कोहली आणि कंपनीचे सर्व प्रकारचे आक्रमणं परतवून लावत दिल्लीने दिमाखात बाद फेरीत प्रवेश केला. प्रस्तुत लेखात आपण दिल्ली कॅपिटल्सला आरसीबी वर सहा गडी व सहा चेंडू राखून विजय मिळवून देणाऱ्या धुरंधर खेळाडूंचा चमकदार कामगिरीविषयी जाणून घेऊ या.

या चालू सत्रातला सर्वात वेगवान गोलंदाज ठरलेल्या ऑनरीच नॉर्खिया या द. आफ्रिकन गोलंदाजाने चार षटकात अतिशय तिखट मारा करताना के वेळ ३३ धावांचे मोल मोजून देवदत्त पडीक्कल, खिस मॉरिस व इसरू उडाना यांचे बळी मिळविले. सामनावीर ठरलेला नॉर्खिया दिल्लीच्या विजयाचा खरा सूत्रधार होता.

सुरूवातीच्या काही सामन्यात अपयशी ठरला तरी संघ प्रबंधनाने विश्वास दाखविलेला अजिंक्य राहाणे आपल्यावरील विश्वासाला पूर्णपणे पात्र ठरला. राहाणेने ४६ चेंडूंचा सामना करताना ६० धावांची जिगरबाज खेळी केली. त्याने दुसरा सलामीवीर शिखर धवनसह ८८ धावांची सामन्याला कलाटणी देणारी भागीदारी केली.

डावखुरा सलामीवीर शिखर धवन मागील काही सामन्यातील नाबाद  १०१, नाबाद १०६, ६ , ०, ० अशा चमत्कारीक खेळानंतर या सामन्यात बऱ्यापैकी चमकला. धनवने आपल्या ४१ चेंडूतील ५४ धावांच्या खेळीत ६ चौकार ठोकले. धवनच्या या वेगवान खेळीमुळे दिल्लीच्या डावाला आकार मिळाला.

द. आफ्रिकेचा प्रमुख जलदगती गोलंदाज कागिसो रबाडा यंदा आयपीएलमध्ये जोरदार प्रदर्शन करत आहे. या सत्रात सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजाची मानाची पर्पल कॅप सध्या त्याच्याच डोक्यावर विराजमान आहे. या सत्रात प्रथमच पॉवर प्ले मध्ये बळी मिळविताना रबाडाने चार षटकात ३० धावा देत जोश फिलीपे व शिवम दुबे यांचे बळी महत्वाच्या क्षणी टिपून आरसीबीला मागे ढकलले.

अनुभवी फिरकी गोलंदाज रवीचंद्रन आश्विनने अतिशय कंजुष गोलंदाजी करताना आससीबीच्या मातब्बर फलंदाजांना उधळू दिले नाही. त्याने आपल्या चार षटकांच्या स्पेलमध्ये फक्त १८ धावा देताना आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीचा महत्वाचा बळी मिळविला.

लेखक : -  
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक. 
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत. 
Email:  dattavighave@gmail.com
close