shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

धोनी - गांगुली - कोहली वनडेत खेळले समान धावसंख्येची सर्वोच्च खेळी...!!

महेंद्रसिंग धोनी, सौरव गांगुली व विराट कोहली हे भारतीय क्रिकेटमध्ये मोठे वलय प्राप्त असलेले नावे आहेत. या तिघांनीही आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे नेतृत्व केले असून यातील फक्त महेंद्रसिंग धोनीच आयसीसीच्या स्पर्धा जिंकण्यात यशस्वी झाला आहे, त्याच्या या कर्तृत्वामुळे त्याला भारताचा यशस्वी कर्णधार म्हणून गणले जाते.

भारताचा संघ आज जागतिक क्रिकेटमध्ये एक प्रबळ संघ म्हणून गणला जातो. त्याची पायाभरणी सौरव गांगुली कर्णधार असताना झाली असे मानले जाते. गांगुलीने लावलेल्या त्या रोपट्याला एम. एस. धोनीने चांगल्या पैकी खतपाणी घालून यशस्वी संघाची जडणघडण केली. तर विद्यमान कर्णधार या दोघांची परंपरा पुढे नेण्याचा प्रयत्न करत असून त्यात तो अजून अपेक्षित प्राप्त करू शकला नाही.

या तिघांचाही खेळ आक्रमक पिंड असलेला असून सफेद चेंडूंच्या खेळासाठी तो पूरक आहे. सौरव गांगुलीच्या काळात टि -२० क्रिकेट खेळले जात नसल्याने सौरवला या झटपट क्रिकेटच्या छोटया प्रकारात आपले कौशल्य दाखविण्याची संधी मिळाली नाही. त्यामुळे या तिघांची तुलना करणे संयुक्तीक ठरणार नाही. मात्र हे तिघेही एक दिवसीय सामने मोठया संख्येने खेळले आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे वनडे क्रिकेटमधील तिघांचीही सर्वोच्च धावांची खेळी सारखीच आहे. तिघांनीही एकदिवसीय सामन्यात १८३ ही सर्वाच्च धावसंख्या नोंदविली असून हा अतिशय दुर्मिळ योगायोग आहे. 

विशेष म्हणजे तिघांकडूनही १८३ धावांची खेळी भारताचं नेतृत्व स्विकारण्या पूर्वीची असून कर्णधारपद स्विकारल्या नंतर ते सर्व जण १८३ धावसंख्येच्या आसपासही फिरकले नाही. १८३ धावांच्या या खेळीचे वैशिष्टये म्हणजे यातील दोन या धावसंख्येवर बाद झाले तर एक जण नाबाद राहीला. चला तर जाणून घेऊ या तिघांच्या त्या स्फ़ोटक खेळ्यांची रंगतदार कहाणी.

सन १९९९ साली इंग्लंडमध्ये एकदिवसीय सामन्यांची विश्वकरंडक स्पर्धा खेळविण्यात आली. याच स्पर्धेत श्रीलंकेेविरूद्धच्या सामन्यात सौरव गांगुलीनेेे १५८ चेंडूत १७ चौकार व ७ षटकारांच्या झंझावाती डावात १८३ धावांची खेळी साकारली. याच सामन्यात सौरव गांगुली व राहुल द्रविडने एक दिवसीय सामन्यातील विक्रमी भागीदारी नोंदविली. गांगुली त्याच्या दिर्घ कारकिर्दीत ३११ वनडे सामने खेळला. त्यामध्ये त्याच्या २२ शतके व ७२ अर्धशतकांचा समावेश होता. सन १९९९ ते २००५ या कालखंडात तो भारतीय संघाचा कर्णधार असताना त्याने नेतृत्व केलेल्या १४६ वनडेमध्ये भारताने ७६ सामने जिंकले ६५ हरले तर पाच सामन्यांचा निकाल लागू शकला नाही. गांगुलीच्या नेतृत्वात भारताने सन २००३ च्या विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना खेळला परंतु भारत विजयापासून दूरच राहीला.

सन २०१२ च्या बांगलादेशमध्ये झालेल्या आशिया चषक स्पर्धेत भारताचा सध्याचा कर्णधार विराट कोहलीने पाकिस्तान विरूध्द ढाका येथे खेळताना १४८ चेंडूचा सामना करताना १८३ धावा ठोकल्या. पाकिस्तानच्या ३३० धावांचा पाठलाग करताना कोहलीने भारताच्या विजयात महत्वाची भूमिका बजावली होती. विराट आतापर्यंत २४३ एकदिवसीय सामने खेळला असून त्यात ४३ शतके व ५८ अर्धशतकांचा समावेश आहे.

सन २००५ मध्ये दिवाळीच्या दिवशी जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडीयमवर श्रीलंकेविरूध्द खेळताना महेंद्रसिंग धोनीने नाबाद १८३ धावांची स्फोटक खेळी करताना कोणत्याही यष्टीरक्षक फलंदाजाने केलेली सर्वोच्च धावांची खेळी साकारली. तो विश्ववविक्रम अजूनही अबाधीत आहे. धोनी त्याच्या कारकिर्दीत ३०२ सामने खेळला त्यात १० शतके व ६६ अर्धशतके ठोकली. धोनीने भारताचे २०० एकदिवसीय सामन्यात नेतृत्व केले. धोनीच्या नेतृत्वात भारताने सन २००७ मध्ये टि - २०, सन २०११ मध्ये वनडे व सन २०१३ मध्ये चॅम्पीयन्स ट्रॉफी भारताला मिळवून दिली. शिवाय विश्व कसोटी अजिंक्यपदाची गदाही त्याच्याच नेतृत्वाच्या  कालखंडात भारताला मिळाली.
                
लेखक : -  
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक. 
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत. 
Email:  dattavighave@gmail.com
close