shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

प्रहार अपंग क्रांती संघटनेच्या मागण्या मान्य; इंदापूर नागरपालिकेने दिले लेखी आश्वासन..!!

इंदापूर: प्रतिनिधी  

इंदापूर (५ नोव्हेंबर) : घरपट्टीमध्ये ५० टक्के सवलत, विनाशर्त घरकुल, अपंगांना ५ टक्के निधी, गाळे, लोखंडी स्टॉल किंवा टपरीसाठी जागा, अशा विविध मागण्यांसाठी गेले तीन महिने अनेक निवेदनानंतरही नगरपरिषद प्रशासनाकडून दाद न मिळाल्याने अखेर इंदापूर प्रहार अपंग क्रांती संघटनेने आपल्या विविध मागण्यांसाठी इंदापूर नगरपरिषदेसमोर आज (५ नोव्हेंबर) आंदोलन छेडले. या आंदोलनाची नगरपरिषद प्रशासनाने तातडीने दखल घेत आंदोलनकर्त्यांचा मागण्या मान्य करत आंदोलनकर्त्यांना लेखी आश्वासन दिले.




सविस्तर माहिती अशी की, लॉकडाऊनमुळे आधीच हतबल झालेल्या अपंग बांधवांना उदरनिर्वाहासाठी व्यवसाय करण्यासाठी येत असलेल्या मर्यादांमुळे जगणे असह्य होत असल्याच्या कारणास्तव मागील तीन महिन्यांपासून वारंवार लेखी निवेदने देऊन देखील नगरपरिषद प्रशासनाने मागण्यांची कोणतीही दखल न घेतल्याने प्रहार अपंग क्रांती संस्थेच्या वतीने इंदापूर नगरपरिषद कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले. शासन निर्णयानुसार सर्व अपंगांना विनाशर्त घरकुल देण्यात यावे, घरपट्टीमध्ये ५०% सवलत देण्यात यावी, ५ टक्के निधी उपलब्ध करून देण्यात यावा, अपंगांना स्वतःच्या पायावर उभे राहता यावे याकरिता गाळ्यासाठी अथवा टपरी किंवा लोखंडी स्टॉल उभा करण्यासाठी जागा उपलब्ध करुन देण्यात यावी अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या होत्या.

या आंदोलनाची तातडीने दखल घेत इंदापूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ. अंकिता शहा, मुख्याधिकारी डाॅ. प्रदीप ठेंगल यांनी आंदोलकांशी सविस्तर चर्चा करित त्यांच्या मागण्याची पुर्तता केली जाईल असे लेखी आश्वासन दिले. तदनंतर आंदोलकांनी आंदोलन मागे घेत मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद दिल्याने नगराध्यक्षा, मुख्याधिकारी व इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मुकुंद शहा यांचा गुलाबपुष्प देऊन त्यांचा सत्कार केला.

सदर आंदोलनात आंदोलनस्थळी येऊन भटक्या विमुक्त संघटनेचे नेते तानाजी धोत्रे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र हजारे, क्रांतीसुर्य विचार मंचचे संस्थापक पांडुरंग शिंदे, वडार पॅंथरचे अध्यक्ष अनिल पवार उपाध्यक्ष, सुंदर कुसाळकर आदींनी पाठिंबा दिला.

close