बीड । जिल्हा प्रतिनिधी प्रकाश मुंडे :- बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील पारगाव येथे रविवारी सकाळी झालेल्या हल्ल्यामध्ये 54 वर्षीय महिला जखमी झाली होती. ही घटना होती न होती तो रविवारी संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास दुसऱ्या महिलेवर बिबट्याने हल्ला करून ठार मारल्याची घटना घडली असून सुरेखा नीळकंठ भोसले (45) असे मृत झालेल्या महिलेचे नाव आहे.
घटनेबाबत माहिती की पारगाव (जो) येथे असलेल्या बळे वस्ती या ठिकाणी आपल्या घराच्या शेजारी शेतांमध्ये सुरेखा बळे या कापूस वेचीत होत्या. कापसाच्या पिकामध्ये दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर अचानक हल्ला केला. हल्ला केलेल्या ठिकाणापासून महिलेस ओढत नेऊन तिला ठार मारले आहे. या घटनेने परिसरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून घटनेची माहिती समजताच वन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे .
वनविभागाच्या पथकाने शोध मोहीम सुरू केली आहे. पारगाव येथे एका दिवशी दोन घटना घडल्याने येथील नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे. सद्य परिस्थितीमध्ये या भागातील नागरिक प्रचंड दहशती खाली आहेत व आपला जीव मुठीत घेऊन जगत आहेत.

