ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघाने भरगच्च दौऱ्याच्या सुरुवातीलाच एक दिवसीय सामन्यांची मालिका गमावल्यानंतर टि-२० मालिकेत काय होईल ? या विषयी सर्वांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली होती. परंतु तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने कांगारूंना चारीमुंडया चित केले. त्यानंतर रविवारी झालेल्या दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करून भारतापुढे १९५ धावांचं अवघड आव्हान ठेवलं.
भारताच्या सलामीवीरांनी दणक्यात सुरूवात करून कांगारूंना सुरुवातीलाच धोक्याचा इशारा दिला. पुढे जात अंतिम टप्प्यात हा धोका सत्यात उतरवत भारतीय संघाने हवेत वावरणाऱ्या ऑस्ट्रेलियन चमूला जमीनीवर आदळवले व टि २० मालिकेत २- ० अशी विजयी आघाडी घेतली. त्याच बरोबर एकदिवसीय मालिकेत झालेल्या पराभवाची परतफेड केली.
भारताचा हा ऑस्ट्रेलियाच्या भूमीवरील ऐतिहासीक विजय ठरला. यापूर्वी भारताने सन २०१८ मध्ये ऑस्ट्रेलियाच्या १९८ धावांच्या आव्हानाचा यशस्वी पाठललाग केला होता.
हा सामना जिंकताच भारताने सलगपणे जिंकलेल्या टि-२० सामन्यांची संख्या १० झाली. भारताची ही टि-२० सामन्यातील सर्वोत्तम कामगिरी ठरली.भारताने या दहाव्या सलग विजयांसह पाकिस्तानचा सलग नऊ टि -२० जिंकण्याचा पराक्रम मागे टाकला. पाकिस्तानने जुलै २०१८ ते नोव्हेंबर २०१८ पर्यंत ९ सलग विजय मिळविले होते. त्या काळात पाकने तिरंगी मालिकेत एकदा झिंबाब्वे व दोनदा ऑस्ट्रेलियाला लोळविले होते. त्यानंतर पाकने युएईत ऑस्ट्रेलिया व न्यूझिलंडला प्रत्येकी तीनदा सलग हरविले होते. तो विक्रम भारताने हा सामना जिंकून मागे टाकला.
भारताने डिसेंबर २०१९ मध्ये हैद्राबाद येथे विंडीजला सहा गडी राखून हरवित आपल्या विजयी रथाची सुरुवात केली होती. त्यानंतर भारताने जानेवारी २०२० मध्ये श्रीलंकेला २-०, न्यूझिलंडला त्यांच्या घरात ५-० असे हरविले व या चालू मालिकेत कांगारूंना २-० असे मागे टाकले असून मालिकेतील तिसरा सामना अजून बाकी आहे.
आश्चर्याची बाब म्हणजे टि-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात सलग विजय मिळविण्याचा विक्रम अफगाणिस्तानच्या नावावर आहे. सन २०१८ ते १९ या काळात अफगाणिस्तानने सलग १२ सामने जिंकले होते. तर दुसऱ्या क्रमांकाचा पराक्रमही अफगाणिस्तानच्याच नावावर असून सन २०१६ ते १७ च्या दरम्यान त्यांनी सला ११ सामने जिंकले होते. भारताने जर तिसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला हरविले तर भारत सलग सामने जिंकणाऱ्या संघाच्या क्रमवारीत संयुक्तरित्या दुसऱ्या स्थानी येऊ शकतो.
लेखक : -
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत.
Email: dattavighave@gmail.com

