कसोटी क्रिकेट हे क्रिकेटचं मुळ स्वरूप असून कालपरत्वे कसोटीतील निकाल लागण्याचे कमी झालेले प्रमाण बघता कसोटी सामना प्रत्यक्ष मैदानात जाऊन बघणाऱ्यांचे प्रमाण कमी होऊ लागले. त्यातच वनडे व टि -२० च्या आगमनानंतर कसोटी सामन्यांकडे प्रेक्षक पाठ फिरवू लागले. त्यामुळे कसोटी क्रिकेट वाचविण्यासाठी आयसीसीनेही कंबर कसली. त्याचाच भाग म्हणून आयसीसीने कसोटीच्या नियमात अनेक केले. त्यापैकी एक बदल म्हणजे कसोटी सामनाही वनडे, टि -२० प्रमाणे दिवस रात्र ( डे -नाईट ) पध्द्तीने खेळविणे होय. की जेणे करून लोक याकडे आकर्षित व्हावे.
कसोटी क्रिकेटचे खास वैशिष्टये म्हणजे कसोटी सामना त्याच्या पारंपारीक अशा सफेद पोशाखातच खेळला जातो. फक्त दिवसा खेळण्यासाठी लाल चेंडूचा उपयोग केला जातो. मात्र डे नाईट सामन्यांसाठी लाल रंगाचा चेंडू खेळून खेळून काळसर होत असल्याने तो वापरणे गैर सोयीचे असल्याचे लक्षात आल्याने लाल चेंडूला पर्याय म्हणून वेगळा रंग शोधायची वेळ आली.
दिवस रात्र खेळले जाणारे वनडे, टि-२० रंगीत कपडे व सफेद चेंडूने खेळले जाते. मात्र दिवसरात्र कसोटीही सफेद पोशाखातच खेळण्याचे पक्के ठरल्याने गुलाबी रंगाचा चेंडू मोठया परिक्षणानंतर निश्चित करण्यात आला. चेंडूचा रंग नेमका गुलाबी का निवडला गेला ? हा प्रश्न पडणं साहजिकच आहे. डे नाईट कसोटीची संकल्पना आकार घेऊ लागल्यानंतर सुरुवातीला पिवळ्या व नारंगी रंगाच्या चेंडूचा वापर केला जाऊ लागला. इतकेच नाही तर इतर अनेकही रंगांचे चेंडू प्रायोगिक तत्वावर वापरण्यात आले. परंतु चेंडूचे ते रंग सामन्याचे प्रक्षेपण करणाऱ्या कॅमेरामन्सला अडचणीचे ठरू लागल्याने गुलाबी रंगाच्या चेंडूवर शिक्कामोर्तब करण्यात आले.
दिवस रात्र कसोटी सामन्यांसाठी गुुलाबी रंगाच्या चेंडूवर शिक्काकामोर्तब झाल्यानंतर मोठा प्रश्न निर्माण झाला की गुलाबी रंगातही कोणती छटा निवडावी ? त्यासाठी गुलाबी रंगाच्या एकूण १६ छटांची परीक्षा घेण्यात आली. प्रत्येक छटेच्या चाचणीनंतर त्यात बदल जाणवायचा. त्यानंतर एक गुलाबी छटा सर्व सहमतीनेेेे निवडण्यात आली. आता त्याच निवड केलेल्या गुलाबी छटेच्या चेंडूूचा डे नाईट कसोटी सामन्यांसाठी वापर केला जात आहे.
हे सर्व सोपस्कार पार पाडले जात असताना गुलाबी चेंडू बनविताना तो शिवण्यासाठी कोणत्या रंगाचा धागाा वापरायचा ? हा प्रश्न उपस्थित झाला. सुरुवातीला कुकाबुरा कंपनीने शिलाईसाठी काळ्या रंगाची निवड केली. त्यानंतर हिरव्या रंगाच्या धाग्याचाही उपयोग करण्यात आला. मग पांढऱ्या रंगाच्या धाग्याचाही वापर करण्यात आला. सर्व परीक्षणानंतर हिरव्या रंगाचा धागा गुलाबी चेंडू शिवण्यासाठी फायनल करण्यात आला. परंतु भारताने बांगलादेशविरूध्द कोलकात्याच्या ईडन गार्डनवर खेळलेल्या डे नाईट कसोटीत काळ्या रंगाच्या धाग्याने शिवलेला चेंडू वापरला.
लाल व गुलाबी चेंडूच्या निर्माण कार्यात विशेष असा काहीच फरक नाही. आतल्या बाजूनेे दोन्ही रंगांच्या चेंडूत काहीच फरक नाही. फरक आहे तो फक्त वरच्या कलर कोटींग मध्ये. कडकपणा, उसळी व टिकाऊपणात दोन्ही रंगांचे चेंडूू सारखेच आहेत. लाल चेंडूचे कातडे लाल रंगाने रंगवून घासले जाते तर गुलाबी चेंडूच्या कातडयाला गुलाबी रंगाने रंगविले जाते. पंरतु अंतिम टप्प्यातील फिनिशिंगमध्ये गुलाबी चेंडूवर गुलाबी रंगाचा आणखी एक स्तर चढविला जातो, जेणेकरून चेंडूची चमक जास्त काळ टिकते.
जगातला पहिला गुलाबी चेंडू ऑस्ट्रेलियातील सुप्रसिद्ध कंपनीने कुकाबुराने बनविला. कुकाबुरा कंपनी वाल्यांनी गुलाबी चेंडूच्या अनेक चाचण्या घेतल्या. तब्बल १० वर्षांच्या अथक परिश्रमानंतर कुकाबुरा एक योग्य गुलाबी चेंडू बनविण्यात यशस्वी झाली. शेवटी सन २०१५ मध्ये अॅडलेड येथे ऑस्ट्रेलिया व न्यूझिलंड दरम्यान जगातला पहिला डे नाईट कसोटी सामना गुलाबी चेंडूवर खेळविला गेला. त्यानंतर दिवसरात्र कसोटींंचे प्रमाण वाढत गेले व गुलाबी रंगांच्या चेंडूंच्या मागणीतही वाढ होत गेली.
लेखक : -
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत.
Email: dattavighave@gmail.com

