ख्रिसमस नंतरचा दुसरा दिवस बॉक्सिंग डे म्हणून ओळखला जातो. या दिवशी खेळल्या जाणाऱ्या कसोटीला बॉक्सिंग डे टेस्ट म्हणून संबोधले जाते. याच वलयांकित दिवशी भारताची ऑस्ट्रेलिया विरूध्दची दुसरी कसोटी २६ डिसेंबर रोजी भारतीय प्रमाणवेळेनुसार भल्या पहाटे सुरू झाली. ॲडलेडला झालेल्या पहिल्या दिवसरात्र कसोटीतील लाजिरवाण्या पराभवाच्या पार्श्वभूमीवर भारताची कसोटीत कामगिरी कशी होते याकडे समस्त क्रिकेट जगताचे लक्ष लागून होते.
बॉक्सिंग डे टेस्टच्या आदल्या दिवशीच भारताने आपला अंतिम संघ जाहीर करून आपले पत्ते आधीच खोलले होते. त्यामुळे प्रत्यक्ष सामन्यातील भारताचा खेळ उत्कंठतेचा विषय होता. भारताने आपल्या संघात चार बदल करून सकारात्मक पाऊल टाकले खरे, पण भारत या कसोटीत मानसिक दृष्टया सक्षम असेल का ? हा लाख मोलाचा विषय होता. नियमीत कर्णधार कोहलीच्या गैरहजेरीत हंगामी कर्णधार अजिंक्य राहाणे नाणेफेकीची पहिलीच लढाई हरला. परंतु राहाणेच्या शिलेदारांनी मागच्या चुकांतून चांगलाच बोध घेतल्याचे दिवसभरातील भारतीय खेळाडूंच्या मैदानातील कामगिरीवरून दिसून आले.
नाणेफेक जिंकून कांगारूंनी प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र तो त्यांना रास आला नाही. सुरुवातीला मोठी धावसंख्या उभारून भारताला दबावात आणायचे हे ऑस्ट्रेलियाचे मनसुबे भारताचा हंमागी कर्णधार अजिंक्य राहाणे व त्याच्या प्रत्येक गोलंदाज व क्षेत्ररक्षकांनी उधळून लावले .
ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या सुरुवातीपासूनच भारताचे क्षेत्ररक्षण अतिशय गलिच्छा दर्जाचे झाले होते. वनडे मालिकेत व टि-२० मालिकेत १९ आणि पहिल्या कसोटीत ५ असे एकूण २४ झेल भारतीय क्षेत्ररक्षकांनी सोडले होते. त्यामुळे भारतीय संघाला जिंकता येणारे सामने गमवावे लागले होते. त्यात खास करून पहिला कसोटी सामना भारताला खराब क्षेत्ररक्षणामुळे गमवावा लागला हे उघड सत्य आहे.
घर के शेर ऑस्ट्रेलियन फलंदाज बॉक्सिंग डे टेस्टच्या पहिल्या डावात तरी ढेर झाले. भारताकडून हुकमी गोलंदाज जसप्रित बुमराहा ४ बळी, फिरकीपटू रवीचंद्रन आश्विन ३ बळी, पदार्पणवीर मोहमद सिराज २ बळी व अष्टपैलू रविंद्र जडेजा १ बळी यांनी शानदार कामगिरी केली. वेगवान गोलंदाज उमेश यादवने धारदार गोलंदाजी केली खरी मात्र बळी मिळविण्यात तो कमनशिबी ठरला. या सामन्याचे खास वैशिष्टये म्हणजे ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी उडविलेला प्रत्येक झेल भारतीय क्षेत्ररक्षकांनी आरामात टिपला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला दोनशेचा आकडाही ओलांडता आला नाही. मागच्या कसोटीच्या पहिल्या डावातही त्यांनी जेमतेम १९१ धावाच जमविल्या होत्या. मात्र भारताचा दुसरा डाव किरकोळीत आटोपल्यामुळे त्यांना विजय मिळाला.
मेलबोर्न कसोटीचा पहिला दिवस खास करून भारताच्याच नावे राहीला असे म्हंटले तर वावगे ठरू नये. दिवस अखेर भारताने मयंक अग्रवालला गमावून ३६ धावा फलकावर लावल्या असून पदार्पण करणारा सलामीवीर शुभमन गिल आश्वासक खेळ करत दिवसअखेर अनुभवी चेतेश्वर पुजारासह नाबाद असून सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारत ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना कशा प्रकारे सामोरे जातो यावरच भारताचे या कसोटीतील भवितव्य अवलंबून आहे.
अॅडलेडच्या पहिल्या कसोटीत पहिल्या डावात ३ बाद १८८ या सदृढ परिस्थितीतून भारताने शेवटचे ७ गडी अवघ्या ५६ धावांत गमावले. त्यानंतर दुसऱ्या डावात ९ बाद ३६ या परिस्थितीत भारताचा डाव संपला होता. त्यानंतर या सामन्यात भारताचा पहिला गडी संघाच्या खात्यात एकही धाव नसताना शुन्यावर बाद झाला. म्हणजे भारताने मागील १७ बळी केवळ ९२ धावांत गमावले आहे. त्यामुळे या कसोटीत भारतीय फलंदाज कसा खेळ करतात यावरच भारताचे मालिकेतील भवितव्य अवलंबून आहे.
सध्याची भारतीय संघाची देहबोली बघता भारत ऑस्ट्रेलियावर पलटवार करेल असेच चिन्हे आहे. शिवाय कर्णधार म्हणून अजिंक्य राहाणे परदेशात प्रथमच नेतृत्व करत असला तरी त्याच्या नेतृत्वात कुठलाही गलथाणपण न झाल्याने भारताचे या कसोटीतील भवितव्य अतिशय उज्वल दिसत आहे.
लेखक : -
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत.
Email: dattavighave@gmail.com

