ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील पहिला कसोटी सामना गुलाबी चेंडूवर दिवस रात्र पद्धतीने खेळविण्यात आला. सामना जेमतेम सव्वादोन दिवस चालला. कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवसाचे सत्र सोडल्यास दुसऱ्या दिवसअखेर पाहुण्या भारतीय संघाचेच कसोटीवर वर्चस्व होते. तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरू झाला तेंव्हा भारत किती धावा करूऩ ऑस्ट्रेलियाला कोपऱ्यात ढकलतो या कडे सर्वांचे लक्ष होते. परंतु शनिवार १९ डिसेंबर २०२० हा दिवस वेगळंच काही घेऊन आला होता. हा दिवस भारतीय क्रिकेट इतिहासातील सर्वात काळा दिवस ठरला. या सामन्यात भारताचा जितका दारूण पराभव झाला त्यापेक्षा अतिशय शर्मनाक कामगिरी कागदी वाघ असलेल्या भारतीय फलंदाजांनी केली.
सन १९७४ मध्ये लिड्स कसोटीत इंग्लंडविरूध्द अजित वाडेकरांच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ केवळ ४२ धावात सर्वबाद झाला होता. तोच आतापर्यंतचा भारताचा कसोटीतील निच्चांक होता. परंतु या सामन्यात मोठमोठे धेंडं असलेल्या भारतीय फलंदाजांनी नालायकपणाचा कळस गाठताना सगळ्यांनी मिळून जेमतेम ३६ धावाच काढल्या. त्यामुळे खुणावत असलेला कसोटी विजय तर हुकलाच पण एक अतिशय किळसवाणा पराभव बघावा लागला. यामुळे भारतीय क्रिकेट समर्थकच नव्हे तर समस्त क्रिकेट जगताला हादरा बसला.
आश्चर्याची बाब म्हणजे भारताचे खेळाडू केवळ १२९ चेंडूच खेळले. त्यात फक्त १५ चेंडूवर धावा निघाल्या. या ३६ धावात चार चौकारांचा समावेश असून एकही फलंदाज दुहेरी धावसंख्या करू शकले नाही. भारताचे २६ धावांवर आठ गडी बाद झाले होते तेंव्हा असं वाटायला लागलं होतं की न्यूझिलंडच्या नावे असलेला सर्वात कमी ( २६ ) धावांच्या विक्रमाची भारत बरोबरी साधतो की काय ?
या सामन्यातील एक महत्त्वाची बाब म्हणजे भारताचा कर्णधार विराट कोहली २६ सामन्यानंतर नाणेफेक जिंकला मात्र सामना हरला. भारताचा संघ जसा ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेला तसा वनडे, टि-२० व या पहिल्या कसोटीत झेल सोडण्याचा रपाटाच लावला. गल्ली बोळातल्या पोरांना लाजवेल इतके गलिच्छ दर्जाचे क्षेत्ररक्षण हाय प्रोफाईल भारतीय खेळाडू करतात. कोटयावधी रुपये मानधन देऊन नेमलेले फलंदाजी कोच, क्षेत्ररक्षण कोच नेमकं काय प्रशिक्षण देतात ? झालेल्या चुकांतून हे अतीलाडके मुजोर खेळाडू शिकायलाही तयार नाहीत. उलट झेल सुटल्यावर शरमेने मान खाली घालण्या ऐवजी थोबाड वासून दात विचकतात. जराशी लाज सुध्द वाटत नाही त्यांना. कोटयावधी लोक आपला मौल्यवान वेळ, पैसा खर्च करून सामने बघतात ते काय मुर्ख आहेत ?देशवासीयांच्या भावनांची जराही कदर नाही त्यांना.
कोट्यावधी रुपये मानधन घेणारे हे खेळाडू वरून सांगतात आम्ही खूप देशप्रेमी आहे, आम्ही देशासाठी खूप काही केले. संघाला संकटात टाकून बायकोच्या बाळंतपणाला दौरा सोडून जाणं कोणतं देशप्रेम आलं ? असंच जर सिमे वरच्या सैनिकांनी केलं तर ? मग त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा लागेल, कोर्ट मार्शल होईल. अतिलाडाने डोक्यावर घेतलेल्या अशा क्रिकेटपटूंना देशाचे सर्वोच्च नागरी पुरस्कारही देतात मग त्यांनी देशासाठी स्वतःचे काही कामं त्यागले तर बिघडले कुठे ? सन १९७४ मध्ये ४२ धावांत संघ गारद झाल्यावर तत्कालिन कर्णधार अजित वाडेकरांनी कर्णधार पदाचा राजीनामा दिला होता, तेवढी नैतिकता सध्याच्या कर्णधारात आहे का ? उलट गव्हर्नमेंट जॉबला असल्यासारखं संघाला पराभवाच्या खाईत सोडून जाणे योग्य आहे का ? अशा मतलबी क्रिकेटपटूंना बीसीसीआयनेही धारेवर धरायला हवं. परंतु तसे होण्याची सुतरामही शक्यता नाही.
याच कोहली महाशयांना जगातला सर्वोत्तम फलंदाज गणले जाते. पण या बहाद्दरांने महत्वाच्या सामन्यात काय तिर मारले हे एकदा रेकॉर्ड बुक उघडून बघा. संघातील इतर जण बेजबाबदारपणे खेळत असताना एक कर्णधार म्हणून त्याने गंभिरपणे खेळणे गरजेचे असताना इमर्जन्सीमध्ये तोच हात हलवत माघारी फिरतो. असा व्यक्ती एक खेळाडू म्हणून कितीही ग्रेट असला तरी कर्णधार म्हणून पदावर राहाण्याच्या अजिबात लायकीचा नाही.
हा पराभव भारताच्या प्रत्येक समर्थकाला जिव्हारी लागला असून याचे खापर केवळ पृथ्वी शॉवर न फोडता कर्णधार म्हणून सगळे फायदे, मानसन्मान मिळविणाऱ्या कर्णधार कोहलीवरही फोडले पाहीजे.
लेखक : -
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत.
Email: dattavighave@gmail.com

