गुरूवारी १७ डिसेंबर २०२० रोजी ऑस्ट्रेलियातील अॅडलेड ओव्हलवर भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना सुरू झाला. गुलाबी चेंडूने खेळल्या जाणाऱ्या या सामन्यात भारताने गचाळ सुरुवातीनंतर चेतेश्वर पुजाराच्या धैर्यवान, कर्णधार विराट कोहलीच्या जबाबदार व उपकर्णधार अजिंक्य राहणेच्या उपयुक्त खेळाच्या जोरावर पहिल्या ६ बाद २३३ धावांपर्यंत मजल मारली होती. त्यावेळी यष्टीरक्षक वृद्धीमान साहा फिरकी बहाद्दर रवीचंद्रन आश्वीन दिवसाच्या शेवटी आश्वासक खेळ करून तंबूत परतले.
सामन्याच्या दुसऱ्या दिवशी साहा- आश्वीन संघासाठी काहीतरी भरीव योगदान देतील अशी तमाम क्रिकेट पंडित व रसिकांची अपेक्षा होती. परंतु दुसऱ्या दिवशी या दोघांनाही आपल्या खात्यात एकाही धावेची भर घालता आली नाही. या दोघांच्या पतनानंतर उमेश यादवने एक षटकार खेचून स्वत:विषयीच्या आशा वाढविल्या परंतु पुढच्याच षटकात असाच मोठा फटका मारण्याच्या नादात त्याच्या संयमाचा बांध फुटला व हवेतच उंच चेंडू टोलवून त्याने निरोप घेतला. उमेश नंतर आला तो जसप्रित बुमराहा. ऑस्ट्रेलिया अ संघा सोबतच्या सराव सामन्यात कारकीर्दीतील पहिले अर्धशतक टोलविल्यानंतर बुमराहाचा फलंदाजीतील आत्मविश्वास वाढला. या वेळेस तो त्याच्या नियमित ११ व्या नाही तर १० व्या क्रमांकावर मोहम्मद शमीच्या अगोदर खेळायला आला. त्यानेही एक चौकार मारला. परंतु शेवटचा फलंदाज शमी बाद झाल्याने त्याचाही डाव थांबला.
जेमतेम २४४ धावा फलकावर लावून भारत त्यांच्या बचावासाठी मैदानात उतरला. पहिल्या तासाभरात कांगारूंच्या सलामीवीरांनी सांभाळून खेळ केला. धावा ही फार केल्या नसल्या तरी स्वतःचा जीव वाचवून मैदानात तग धरून राहीले होते. त्यानंतर जसप्रित बुमराहाने दोन्ही सलामीवीरांचा काटा काढून कांगारुंना मागच्या पायावर जाण्यास भाग पाडले. तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या मार्नस लॅबूशनेला १२ धावांवर शमीच्या गोलंदाजीवर जसप्रित बुमराहाने जीवदान दिले. लॅबूशने २१ धावांवर असताना परत एकदा नशिबवान ठरला. यावेळी त्याला या सामन्यातील भारताचा सर्वात अपयशी खेळाडू पृथ्वी शॉने जीवदान दिले. भारताच्या क्षेत्ररक्षकांनी आणखी दोन झेल सोडले. त्यातील वृद्धीमान साहाने सोडलेला मिचेल स्टार्कचा झेल खूप अवघड होता. दोन स्लीप मधूनही चेंडूने क्षेत्ररक्षकांना गुंगारा दिला. कांगारूंचा मुख्य योद्धा स्टिव्हन स्मिथ २९ चेंडू खेळला मात्र केवळ धाव काढून परतला आणि तेथेच ऑस्ट्रेलियाच्या उलटया गिणतीला सुरूवात झाली.
भारताकडून फिरकीपटू आर.आश्वीन ने स्मिथ, ग्रीन, लियॉन व हेडचे मुंडके छाटून ऑस्ट्रेलियाचा कर्दनकाळ बनला. त्याच्या खालोखाल उमेश यादवने ३ बळी घेत स्वतःचा दमखम दाखविला. तर बुमराहाने दोन बळी घेतले. या सामन्यात साफ अपयशी ठरलेल्या पृथ्वी शॉने केलेल्या अचूक थ्रो वर मिचेल स्टार्क धावबाद झाला. एवढीच काय ती समाधानाची बाब शॉच्या बाबतीत या सामन्यात घडली. मोहम्मद शमीने उत्कृष्ठ मारा केला परंतु बळी मिळविण्यात तो कमनशिबी ठरला.
ऑस्ट्रेलियाची ७ बाद १११ अशी स्थिती असताना भारत मोठी आघाडी घेईल असे वाटत असताना भारताच्या आजवरच्या सर्वच संघांची डोकेदुखी असलेल्या शेपटाने भारताला पुन्हा एकदा फार वेदना दिल्या. यावेळी या वेदनामय नाटयाचा शिल्पकार होता ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टिम पेन. त्याने तळाच्या चार फलंदाजांना सोबत घेऊन अनमोल ८० धावा जोडल्या. तर भारताच्या शेवटच्या ४ फलंदाजांनी केवळ ११ धावा काढल्या या वरून भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाच्या तळाच्या फलंदाजांनी दिलेल्या वेदनांची जाणीव होते.
भारताला ५३ धावांची आघाडी मिळाल्यानंतर या डावात सलामीवीरांकडून मोठी अपेक्षा होती, परंतु दुःखद स्वप्नासारखी ही कसोटी ठरलेल्या पृथ्वी शॉला पुन्हा एकदा नशिबाने दगा दिला. पृथ्वीच्या अपयशाने त्याच्यासह त्याची पाठराखण करणाऱ्या संघप्रबंधनाचेही मोठे हसू झाले. पृथ्वीने या सामन्यात केलेल्या केवळ ४ धावा त्याला पुढील कसोटीत स्थान मिळवून देण्यास पुरेशा ठरणार नाहीत. शॉच्या जागी राहिलेला थोडासा वेळ धकवून नेण्यासाठी आलेल्या नाईट वॉचमन जसप्रित बुमराहाने एखाद्या कसलेल्या फलंदाजासारखी फलंदाजी केल्याने पृथ्वी शॉ नेटकऱ्यांच्या व टिकाकारांच्या टिकेचे जोरदार लक्ष्य बनला. दिवसअखेर भारत ६२ धावांनी आघाडीवर आहे.
सामन्याचा तिसरा दिवस निकालाच्या दृष्टीने महत्वाचा ठरणार असून भारताने दुसऱ्या डावात संयमी खेळ करून चांगली धावसंख्या केल्यास भारताला ऑस्ट्रेलियाला कोपऱ्यात घेऊन हल्ला करता येईल. बघू या तिसऱ्या दिवशी सामना काय रंग दाखवितो ?
लेखक : -
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत.
Email: dattavighave@gmail.com

