shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

माता न तू वैरिणी...! अनैतिक संबंधात अडसर, आई ने प्रियकराच्या मदतीने केली मुलाची हत्या..!!

टेंभुर्णी (  महेश देशमुख ) 
माढा तालुक्यातील परितेवाडी येथील तरूणाच्या निर्घृण खून प्रकरणामध्ये पोलीसांनी केलेल्या तपासामध्ये धक्कादायक माहिती उघड झाली असून मुलगा अनैतिक संबंधास अडथळा ठरू लागल्याने आई व तिचा प्रियकर या दोघांनी  मिळून  मुलाचा  निर्घृण खून केल्याचे निष्पन्न झाले आहे.   या खून प्रकरणी मयताच्या आईस टेंभुर्णी  पोलीसांनी अटक केली असून तिने गुन्ह्याची कबुली दिली आहे. माढा न्यायालयासमोर हजर केले असता मंगळवार ( ता. २९) पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश माढा न्यायालयाच्या न्यायदंडाधिकार्यांनी दिले आहेत. तिचा प्रियकर मात्र फरारी आहे. 


सिध्देश्वर सुभाष जाधव  ( वय-२१ ) असे खून झालेल्या तरूणाचे नाव असून त्याची आई मुक्ताबाई सुभाष जाधव ( वय- ४५ रा. परितेवाडी ता. माढा) हिला पोलिसांनी अटक केली असून तिचा प्रियकर तात्यासाहेब महादेव कदम ( रा. परितेवाडी ता. माढा) हा फरारी आहे. 

या विषयी पोलीसांकडूनसमजलेली अधिक माहिती अशी, परितेवाडी गावच्या हद्दीतील माळावर तरूणाचा  निर्घृण खून केल्याची माहिती परितेवाडीचे पोलीस पाटील जिंदास बाळू हराळे यांनी टेंभुर्णी पोलीस ठाण्यास कळविली. टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अमित शितोळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशील भोसले,  पोलीस हवालदार सलीम पठाण, पोलीस नाईक संजय भानवसे, बिरूदेव हजारे  हे तातडीने घटनास्थळी आले. दरम्यान करमाळा विभागाचे उपविभागीय पोलीस  अधिकारी डाॅ. विशाल हिरे यांनी घटना स्थळास भेट दिली. घटनास्थळी रक्त सांडल्याचे दिसले नाही. त्यामुळे  सिध्देश्वर जाधव याचा इतर ठिकाणी खून करून नंतर मृतदेह  माळावर आणून टाकल्याचे पोलीसांच्या निदर्शनास आले.मयत सिध्देश्वर जाधव याच्या घरी पोलीस गेले असता घरासमोर सारवल्याचे  तसेच तेथे रक्ताचे थेंब पडल्याचे दिसले. घराच्या बाहेर अंथरून पांगरून जाळल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे पोलीसांना संशय आल्याने मयत सिध्देश्वर जाधव याची आई मुक्ताबाई व लहान भाऊ बालाजी जाधव ( वय- 19) यास चौकशीसाठी टेंभुर्णी पोलीस ठाण्यात आणले. यावेळी बालाजी जाधव याने आई मुक्ताबाई व तात्या कदम यांच्या अनैतिक संबंधामध्ये भाऊ सिध्देश्वर हा अडकाठी ठरत होता.  तात्या कदम याच्या मेव्हुण्याकडील आमची जमीन आम्ही परत मागत होतो. जमीन परत न दिल्यास तात्या कदम यास मारहाण करणार आहोत याची कल्पना आईने तात्या कदम यांना दिली होती. त्यामुळे आई मुक्ताबाई व तात्या कदम या दोघांनी मिळून भाऊ सिध्देश्वर यास घरासमोर तो झोपलेल्या ठिकाणी मारून त्याचे प्रेत माळरानावरील चारीत नेऊन टाकले आहे असे बालाजी जाधव याने  पोलीसांना सांगितले. त्यामुळे मुक्ताबाई हिच्याकडे चौकशी  केली असता तिने व प्रियकराने मिळून खून केला असल्याची कबुली  पोलीसांना दिली. शनिवारी सकाळी आरोपी मुक्ताबाई जाधव हिला अटक केली. दुपारी माढा येथील न्यायालयात हजर केले असता न्यायदंडाधिरी एस. एस. सय्यद यांनी  मंगळवार ( ता. 29) पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश  दिले. या प्रकरणी पोलीस पाटील जिंदास हराळे यांनी फिर्याद दाखल केली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित शितोळे हे करीत आहेत. 

पोलीसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न
शुक्रवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास सिध्देश्वर जाधव याची आई मुक्ताबाई हिने टेंभुर्णी पोलीस ठाण्यात येऊन रात्रीपासून  मुलगा सिध्देश्वर हा गायब असून त्याचे दोन मित्र त्यास रात्री  घरातून घेऊन गेले आहेत. माझ्या मुलाचा शोध घ्या असा कांगावा करून आरोपी मुक्ताबाई जाधव हिने पोलीसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. 

सिध्देश्वर जाधव या तरूणाचा खून नेमका व कोणत्या कारणासाठी केला याचे गुढ उकलणे हे पोलीसांसमोर आव्हान असल्याने करमाळा उपविभागाचे  उपविभागीय पोलीस अधिकारी डाॅ विशाल हिरे हे रात्री उशीरापर्यंत टेंभुर्णी पोलीस ठाण्यात तळ ठोकून बसले होते. त्यांनी तपासाची सुत्रे वेगाने फिरवून खुनाचे गुढ उकलण्यात यश मिळविले. 

------------------------------------------

सिध्देश्वर जाधव याच्या खून प्रकरणी त्याची आरोपी आई  मुक्ताबाई जाधव हिला अटक केली असून गुन्ह्यातील दुसरा आरोपी तिचा प्रियकर तात्यासाहेब महादेव कदम हा फरारी आहे. त्याच्या शोधासाठी टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सुशील भोसले यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथक रवाना केले असून त्यास लवकरच अटक करण्यात येईल. 
 -  डाॅ. विशाल हिरे, 
       
उपविभागीय पोलीस अधिकारी
close