shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

सन २०२० मधील भारतीय क्रिकेट..!


सन २०२० हे वर्ष " कोरोना वर्ष " म्हणूनच सर्वांच्या कायम स्वरूपी स्मरणात राहील. या वर्षात कोविड-१९ ने मोठया प्रमाणात खळबळ उविल्यानंतर संपूर्ण जग हतबल झाले होते. कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भाने क्रिकेटही बाधीत झाले होते. कोविड-१९ मुळे निव्वळ क्रिकेटच बंद नव्हते तर अनेक क्रिकेटपटूही या जीवघेण्या व्हायरसच्या विळख्यात सापडले होते. कोरोनामुळे क्रिकेटच्या नियमात अनेक बदल करण्यात आले. बायो बबलसारख्या जैविक बंदोबस्तात खेळाडूंना वावरावे लागले. नेहमी प्रेक्षकांनी खचाखच भरलेल्या स्टेडीयममध्ये खेळलेले जाणारे क्रिकेट कोरोना व्हायरसमुळे मोकळ्या स्टेडियममध्ये खेळविले जात आहे.

                भारताला टि-२०, वनडे, चॅम्पियन्स करंडक व कसोटीचे विजेतेपद मिळवून देणारा भारताचा आजवरचा सर्वात यशस्वी कर्णधार एम एस धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला. त्याच्या निवृत्तीमुळे भारतीय क्रिकेटमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली. कोहलीचे जगभरातील असंख्य चाहते धोनी पुन्हा मैदानात दिसणार नसल्याने निराश झाले.

                   सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या भारतीय क्रिकेट संघ दिवस रात्र कसोटीत केवळ ३६ धावात गुंडाळला गेला व त्यानंतर संघाला एका निराशाजनक पराभवाला सामोरे जावे लागले. त्या अनपेक्षीत पराभवानंतर झालेल्या बॉक्सिंग डे कसोटीत भारताने जबरदस्त पलटवार करत दुय्यम संघ व नवखा कर्णधार अजिंक्य राहाणेच्या नेतृत्वात कांगारूंवर अविश्वसनीय विजय मिळवून समस्त क्रिकेट जगताला आश्चर्याचा धक्का दिला व मागील अपयशाने खचून न जाता एक अविस्मरणीय विजय नोंदविला.

                 जगातील सर्वात मोठी लिग स्पर्धा असलेली इंडियन प्रिमीयर लिग ( आयपीएल ) स्पर्धा कोरोना व्हायरसच्या संक्रमणामुळे तिच्या निर्धारीत वेळापत्रकामुळे भारतात होऊ न शकल्याने सहा महिने उशीरा युएईत संपन्न झाली. कोविड १९ च्या प्रादुर्भावामुळे खेळाडूंना बायो बबलमध्ये ठेवण्यात आले. त्याची तुलना खेळाडूंनीच " पंचतारांकीत कारागृह " अशी केली होती. आयपीएल निर्विघ्नपणे पार पडल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. मुंबई इंडियन्सने आपले विजेतेपद राखताना विक्रमी पाचव्यांदा विजेतेपद मिळविले.

                 भारताचा कर्णधार विराट कोहली यंदाही कर्णधार म्हणून आरसीबीला आयपीएलचे विजेतेपद मिळवून देण्यात अपयशी ठरला. इतकेच नाही तर त्याच्या नेतृत्वात भारताला कसोटी इतिहासातील निच्चांकी धावसंख्येवर बाद होण्याची नामुष्की स्विकारावी लागली. त्याच्या नेतृत्वात भारताला आयसीसीची एकही मोठी स्पर्धा जिंकता आली नाही तरी आयसीसीने त्याला दशकातील सर्वोत्तम कर्णधार म्हणून निवडले. हे जरा आश्चर्याचेच आहे. कदाचित त्याच्यापेक्षा कोणी चांगला कर्णधार जागतिक क्रिकेटमध्ये नसावा म्हणून आयसीसीने त्याला निवडले असावे.

                १५ ऑगस्ट या भारताच्या स्वातंत्रदिनी भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी व अष्टपैलू खेळाडू सुरेश रैनाच्या निवृत्तीने सर्वांना आश्चर्यचकित केले. आयपीएलचा बादशहा असलेला चेन्नई सुपर किंग्जचा संघ यंदा क्वॉलिफायरसाठी पात्र न होणे हा सर्वात धक्कादायक प्रसंग होता.

                  भारताचे माजी सलामीवीर व उत्तर प्रदेश सरकारमधील मंत्री चेतन चौहान व ऑस्ट्रेलियाचा माजी धडाकेबाज फलंदाज डिन जोन्स यांचे जगाचा निरोप घेणेही क्रिकेट जगतासाठी दुर्देवी व दुःखद क्षण होता. 

लेखक : -  
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक. 
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत. 
Email:  dattavighave@gmail.com
close