shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

सन २०२० मधील टि-२० मध्ये सर्वाधिक धावा ठोकणारे फलंदाज..!!



               सन २०२० च्या सुरूतीलाच कोविड-१९ ने सर्व जगाला आपल्या विळख्यात घेऊन कित्येक दिवस स्वतःच्याच घरात जेरबंद व्हायला मजबूर केले. लॉक डाऊनच्या या भल्या मोठ्या काळात सर्व उद्योग व्यवहारांबरोबर क्रिडा क्षेत्रातील घडामोडीही बंद होत्या. त्याचाच एक भाग असलेले क्रिकेटही पूर्णपणे बंद होते. मात्र त्यांनतर जसजसा कोरोना व्हायरसचा प्रभाव कमी कमी होत गेला. त्यामुळे जगभरातील क्रिकेट हळूहळू सुरू व्हायला लागले. सुरक्षित अशा बायो बबलमध्ये प्रेक्षकांविना रिकाम्या स्टेडीयममध्ये सामने खेळविण्यास सुरुवात झाली. त्यामुळे क्रिकेट बऱ्याच अंशी पूर्वपदावर आले. 

या सर्व धामधुमीत क्रिकेटच्या तीनही प्रारूपांतील क्रिकेट खेळले. प्रस्तुत लेखात आपण सन २०२० मध्ये खेळलेल्या टि २० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा बनविणाऱ्या फलंदाजांच्या कामगिरीवर एक नजर टाकणार आहोत.
 या अनोख्या क्लबमध्ये एक गोष्ट आपणास प्रकर्षाने जाणवेल की, यामध्ये यष्टीरक्षक फलंदाजांचा मोठा भरणा आहे.
                
पाकिस्तानचा ४० वर्षीय अष्टपैलू खेळाडू मोहम्मद हाफीज सन २०२० मध्ये टि-२० च्या आंतरराष्ट्रीय सामन्यात सर्वाधिक धावा बनविणारा फलंदाज बनला आहे. यंदाच्या सत्रात त्याने १० सामन्यांच्या ८ डावात फलंदाज करताना ८३.५ च्या सरासरीने ४१५ धावा बनविल्या. यामध्ये नुकत्याच न्यूझिलंडविरुद्ध केलेल्या नाबाद ९९ धावांचा समावेश आहे.

भारताचा यष्टीरक्षक फलंदाज के.एल राहुलला यंदाचं वर्ष अतिशय चांगलं गेलं. या वर्षी गुप्त ११ टि-२० सामने खेळला, त्यातील डावात फलंदाजी करताना ४ अर्धशतकांच्या मदतीने ४५च्या सरासरीसह एकूण ४o४ धावा जमविल्या.

इंग्लंडचा डावखुरा तेहतीस वर्षीय फलंदाज डेव्हीड मलान सध्या आयसीसीच्या टि- २० रँकिंग मधील अव्वल क्रमांकाचा फलंदाज असून त्याने या वर्षी शानदार खेळ केला. या वर्षाच्या छोटयाशा कालखंडात झालेल्या क्रिकेटमध्ये त्याने १० सामन्यात ४९ च्या सरासरीने ३९७ धावा फटकविल्या.

न्यूझिलंडचा २६ वर्षीय यष्टीरक्षक फलंदाज टिमसेफर्टसाठी यंदाचं वर्ष चांगलं ठरलं. यंदा त्याने ११ सामन्यांच्या १० डावात फलंदाजी करताना ५० च्या सरासरीने ३५२ धावा न्यूझिलंडसाठी जमविल्या.

कामरान खान या कतारच्या ३२ वर्षीय फलंदाजाने याच वर्षी फेब्रुवारी महिन्यात १२ दिवसात ३ अर्धशतके ठोकली. कामरानच्या एकंदर कामगिरीचा विचार केला तर या वर्षी त्याने केवळ ७ सामन्यात ४८ च्या सरासरीने ३३५ धावा फटकविल्या.

इंग्लंडचा ३१ वर्षीय यष्टीरक्षक फलंदाज जॉनी बॅरिअस्टोला देखील हे वर्ष चांगल्यापैकी गेलं. जॉनी इंग्लंडसाठी या वर्षात १२ सामने खेळला त्यातील ११ डावात फलंदाजी करताना ३३ च्या सरासरीने ३२९ धावा त्याच्या बॅटमधून निघाल्या.

भारताचा कर्णधार विराट कोहली या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक ठोकण्यात जरी अपयशी ठरला असला तरी यंदा १० टि सामन्यातील ९ डावात त्याने ३७ च्या सरासरीने २९५ धावा बनविल्या.इंग्लंडचा यष्टीरक्षक फलंदाज जोश बटलरलाही हे वर्ष बऱ्यापैकी गेले. त्याने या वर्षी ८ सामने खेळले. त्यामध्ये ४९ च्या सरासरीने त्याने २९१ धावा ठोकल्या.

दक्षिण आफ्रिकेचा रॅसी व्हॅन डर ड्युसेनच्या वाटयाला या वर्षी केवळ ९ सामने आले. त्यामध्ये त्याने ४८ च्या सरासरी २८८ धावा फटकविल्या.

दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार व यष्टीरक्षक फलंदाज क्विंटन डी कॉकचा देखील या वर्षात सर्वाधिक धावा बनविणाऱ्या फलंदाजात समावेश आहे. त्याने या वर्षात खेळलेल्या ९ सामन्यात ३२ च्या सरासरीने २८५ धावा बनविल्या.

लेखक : -  
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक. 
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत. 
Email:  dattavighave@gmail.com
close