shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

सिडनी कसोटीत भारत दुसऱ्या दिवशी मुसंडी मारेल ?



                     मेलबोर्नचा बॉक्सिंग डे कसोटी सामना जिंकून पाहुण्या भारतीय संघाने मालिकेत बरोबरी साधली. या अनपेक्षीत धक्क्याक्याने ऑस्ट्रेलियन संघ खडबडून जागा झाला व आपल्या संघात आवश्यक ते बदल करून सिडनीच्या तिसऱ्या कसोटीत उतरला. जांघेत झालेल्या दुखापतीपणे टि-२० मालिका व पहिल्या दोन कसोट्यांना मुकलेल्या डावखुऱ्या डेव्हीड वॉर्नरला कांगारूंनी पूर्णपणे फिट नसतानाही संघात स्थान दिले. या वरून ऑस्ट्रेलियन संघ प्रबंधन किती गोंधळले होते हे लक्षात येते. 

                      पहिल्या दोनही कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियन संघ दोनशेपेक्षा अधिक धावा करण्यात असफल ठरल्यामुळे त्यांना अॅडलेड कसोटी जिंकल्यानंतरही मेलबोर्न कसोटीत पराभव पत्करावा लागला होता. तो केवळ फलंदाजीतील अपयशामुळे. त्यात खास करून त्यांना मायदेशात खेळण्याचा लाभ घेत न येणे हे प्रमुख कारण होते.

                      पहिल्या दोनही कसोटयात खेळलेले सलामीवीर त्यांना अपेक्षीत सुरूवात करून देण्यास अपयशी ठरले होते. शिवाय महत्वाचे फलंदाज मार्नस लाबुशने व स्टीव्हन स्मिथ आपल्या लौकीकाला न्याय न देऊ शकल्याने कांगारूंची मोठी पंचाईत झाली होती. शिवाय ट्रेव्हीस हेड मधल्या फळीत आपले योगदान देण्यात असमर्थ ठरला. या बाबी कांगारूंना झोपेतून जागे करण्यात पुरेशा ठरल्या होत्या.

                      त्यामुळे तिसऱ्या कसोटीसाठी चांगला गृहपाठ करून ते आले.  अपयशी सलामीवीर ज्यो बर्न्सला आधीच घरचा रस्ता दाखविल्यानंतर देशातंर्गत क्रिकेटमध्ये नेत्रदिपक कामगिरी करणाऱ्या विल पुकोवस्कीला पदार्पणाची संधी दिली तर डेव्हीड वॉर्नरला पुन्हा बोलावले शिवाय हेडच्या ऐवजी मॅथ्यू वेडचं मधल्या फळीत पुनर्वसन केलं. नाणेफेक जिंकल्यानंतर फलंदाजांना मदत करणाऱ्या सिडनीच्या खेळपट्टीवर कांगारूंनी प्रथम फलंदाजी करणं पसंद केलं.

                      भारतानेही आपल्या संघात दोन बदल केले. पहिल्या दोन कसोटयात अपयशी ठरलेला सलामीचा मयंक अग्रवाल ऐवजी रोहीत शर्मा तर जखमी वेगवान गोलंदाज उमेश यादवच्या जागेवर नवदिप सैनी संघात आला. डावाच्या सुरूवातीलाच मोठया कौतुकाने संघात घेतलेला डेव्हीड वॉर्नर मोहम्मद सिराजच्या चेंडूवर चेतेश्वर पुजाराच्या हाती झेल देऊन केवळ पाच धावा काढून माघारी परतल्या नंतर भारताच्या गोटात उत्साहाचे वातावरण संचारले. परंतु त्यानंतर पावसाने मोठा व्यत्यय आणल्याने जवळ जवळ तीन तासांचा खेळ वाया गेला.

                       उपहारानंतर खेळ सुरू झाल्यानंतर काही वेळाने आश्विन गोलंदाजीला आला. त्याच्या चेंडूवर दुसरा सलामीवीर पुकोवस्कीच्या बॅटला चाटून चेंडू यष्टीरक्षक रिषभ पंतच्या हातात गेला परंतु त्याला तो झेल पकडता आला नाही. त्यानंतर पुन्हा एकदा पुकोवस्कीचा झेल मोहम्मद सिराजच्या चेंडूवर पंतने सोडला. त्यानंतर पुकोवस्कीने पदार्पणातच अर्धशतक ठोकून संघाला सुस्थितीत नेले. पुकोवस्की नवदिप सैनीच्या चेंडूवर पायचित झाला तेंव्हा त्याने डिआरएसचा वापर केला नाही. याचे कारण तो बाद असल्याचा त्याला पूर्ण अंदाज होता.


                    पुकोवस्कीच्या पतनानंतर मागील दोन कसोट्यात केवळ दहा धावा करणाऱ्या स्टीव्हन स्मिथने आक्रमक खेळ करत नाबाद ३१ धावा काढल्या तर त्याचा जोडीदार मार्नस लाबुशने ६७ धावांवर खेळत आहे. उद्या सकाळी ही जोडी लवकर फोडणे भारतीय गोलंदाजांचं पहिलं काम असून स्मिथ व लाबुशने लवकर बाद झाले नाही तर भारताचं या सामन्यातील काम कठीण बनू शकतंं. भारताने क्षेत्ररक्षणात सुधारणा करणे गरजेचे आहे. खास करून रिषभ पंतने. पंतने फलंदाजीत कितीही धावा केल्या आणि असे महत्वाच्या फलंदाजांचे झेल सोडले तर त्या धावा काहीही उपयोगाच्या नाहीत. त्याचे काम निष्णात यष्टीरक्षकाचेे आहे. ते त्याने जबाबदारीने करणे गरजेचे आहे. पंतच्या चुकांमुळे भारताने ऑस्ट्रेलियाला दबावात आणण्याची संधी गमावली.

  रिध्दीमान साहा कमी धावा काढत असला तरी झेल घेण्यात तो पंत पेक्षा उजवा आहे. या सामन्याचा निकाल जर भारताच्या विरूद्ध लागला तर पुढच्या कसोटीत पंत दिसणार नाही. हे पंतला ध्यानात ठेवावे लागेल.

                      मोहम्मद शमी व उमेश यादव यांच्या अनुभवी गोलंदाजीची उणीव पहिल्या दिवशी भारताला प्रकर्षाने जाणवली हे नाकारून चालणार नाही.

 लेखक : -  
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक. 
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत. 
Email:  dattavighave@gmail.com
close