लढणे हे शिवसैनिकांची ओळख आहे ती ओळख कधी सोडायची नाही.- संजय शिरोडकर
इंदापूर तालुका प्रतिनीधी :
इंदापूर येथे हिंदु हृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या ९५ व्या जयंतीनिमित्त इंदापूर शहर व तालुका शिवसेनेच्या आजी-माजी पदाधिकार्यांच्या वतीने विविध उपक्रमाद्वारे जयंती साजरी करण्यात आली. कोवीड काळात जीव धोक्यात घालून कर्तव्याची जबाबदारी पार पाडणाऱ्या कोवीड योद्ध्यांचा सन्मान, माजी सैनिकांचा सन्मान, तालुक्यात नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये निवडून आलेल्या शिवसेना ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार तसेच पराभूत झालेल्या उमेदवारांचा सन्मान करण्यात आला.
माऊली बालक आश्रम अनाथ मुलांना फळे व खाऊ वाटप, श्रावणबाळ आश्रम अनाथ मुलांना फळे व खाऊ वाटप करण्यात आला. इंदापूर शहराच्या सीमेवरील स्वागत फलकाचे अनावरण संपर्क कार्यालयाचे उद्घाटन स्व. बाळासाहेब ठाकरे जयंती निमित्त करण्यात आले.
या कार्यक्रमा प्रसंगी बारामती लोकसभा विधानसभा संपर्कप्रमुख संजय शिरोडकर, पुणे जिल्हा समन्वयक विशाल बोंद्रे व भिमराव भोसले, इंदापूर शिवसेना तालुकाप्रमुख नितीन शिंदे, इंदापूर शहर प्रमुख मेजर महादेव सोमवंशी, शिवसेना उपजिल्हा संघटिका शारदा सोनवणे, तालुका संघटिका पुष्पा घोरपडे ,योगेश कणसे,अरुण पवार, ,सुदर्शन रणवरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हा सरचिटणीस वसंत आरडे, दुर्वास शेवाळे, राजू शेवाळे, इंदापूर शहर समन्वयक ज्ञानेश्वर चौगुले, संदीप चौधरी, धोंडीराम सोनटक्के , सचिन मांढरे यासह आधी आजी माजी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.
या कार्यक्रमावेळी विधानसभा संपर्कप्रमुख संजय शिरोडकर म्हणाले की ,स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त वेळात वेळ देऊन सकाळपासून आपण मानवंदना देत आहोत या कार्यक्रमात सहभागी आपण झाला आहे, हे प्रेम क्वचितच एखाद्याला लाभते आहे .ते प्रेम स्व. बाळासाहेब यांना लाभले आहे त्यांनी आपल्या विचाराच्या माध्यमातून लोकांच्या मनामध्ये स्थान निर्माण केले. जिथे मराठी माणसाची कुचंबना होत होती, त्या काळात त्यांनी मराठी माणसासाठी ते पुढे आले आणि नोकरीला लाथ मारली गुलामगिरी न स्वीकारता त्यांनी ठोकशाही कशी राबवावी हे मराठी माणसाला शिकवले .तिथून इथपर्यंतचा प्रवास या पुढचा ही प्रवास त्यांच्या विचारातून प्रेरित होणार आहे.
स्व. बाळासाहेब यांचे नाव घेतले की, त्यांचे बाळकडू ज्या शिवसैनिकांनी अंगी आत्मसात केले आहे त्यांच्ये रक्त सळसळ करणारचं. त्यांच्याबद्दलचा आदर त्यांच्याबद्दल प्रेम, त्यांच्याबद्दलचा स्नेह त्यांच्या विचारांचा आदर आहे .तो फार महत्त्वाचा आहे . स्व .बाळासाहेब पुन्हा होणे नाही. आज बाळासाहेब आपल्यामध्ये नाही खंत वाटते पण त्यांचे विचार आपल्या मध्ये आहेत. त्या विचारांना साथ देत पक्ष वाढीचे काम करायचे आहे.
धाडसाने ग्रामपंचायत निवडणूक बाळासाहेबाचे शिवसैनिक म्हणून लढले त्यांचे मी खरोखर मनापासून आभार मानतो .जे जिंकून आले त्यांचे अभिनंदन. जे जिंकून आले त्यांनी आपल्या गावाचा विकास कसा होईल त्यांचा प्रयत्न करावा. शिवसैनिकाचे नाव पुढे येईल याची काळजी घ्यावी. जे निवडणुकीत हरले त्यांनी ही लढत रहा. लढणे हे शिवसैनिकाची ओळख आहे. ती ओळख कधी सोडायची नाही. असे त्यांनी आपले मत व्यक्त केल.
तसेच पुणे जिल्हा समन्वयक विशाल बोंद्रे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले, की मुंबई येथील स्व.बाळासाहेब ठाकरे यांची जयंतीचा कार्यक्रम सोडून संजय शिरोडकर आपण इंदापूर तालुक्यात काहीतरी उगवणार आहे म्हणुन इंदापूर तालुक्यावर भगवा फडकणार आहे यासाठी म्हणून संजय शिरोडकर तुम्ही आलात. तुम्ही ताकद दिली तर इंदापूर तालुक्यामध्ये शिवसेनेचा आमदार निवडून येणार पण तुमची ताकद आमच्या पाठीशी पाहिजेल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून फंड द्या. गेली ४० वर्षे २२ गावाचा पाण्याच्या प्रश्नासाठी लोक आंदोलन करून, रस्ता रोको करून मेली . गेली अनेक वर्षे २२ गावाचा प्रश्न सोडवतो म्हणून मतदान घेतले आणि वीस वर्ष लाल दिव्याच्या गाडीमधे फिरले पण त्यांनी लोकांनी प्रश्न सोडवला नाही अशी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे नाव न घेता जोरदार टीका केली.
बावीस गावाच्या पाणी प्रश्नासंदर्भात चा प्रश्न मिटवून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते नारळ फोडा मग बघा २२ गावाचा सर्व मतदान शिवसेनेचा धनुष्यबाण समोरच बटन दाबले शिवाय राहणार नाही. लाकडी निंबोडी तेथील गावांचा प्रश्न तसाच पडून आहे. इंदापूर तालुक्यातील हे दोन प्रश्न आहेत की त्या प्रश्न मार्गी लावले तर इंदापूरमध्ये शिवसेनेला उभारी मिळेल. या दोन मागण्या आमच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पर्यंत पोहोचवा अशी कार्यक्रमात बोंद्रे यांनी मागणी केली . तसेच इंदापूर तालुक्यात सर्व ठिकाणी शाखा उद्घाटन व जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले असून लवकरच इंदापूर तालुक्यात प्रत्येक गावांमध्ये शिवसेना कार्यान्वित होणार आहे असे मत बोंद्रे यांनी व्यक्त केले.
स्व. बाळासाहेब ठाकरे जयंती निमित्त कार्यक्रमात शिवसेनेचे पुणे जिल्हा समन्वयक भीमराव भोसले , तालुकाप्रमुख नितीन शिंदे यांनी आपल्या मनोगतात बाबासाहेब ठाकरे यांच्या कार्याची माहिती दिली.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक शहर प्रमुख मेजर महादेव सोमवंशी यांनी केले तर आभार सुदर्शन रणवरे यांनी मांडले.
--

