shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

"सद्गुरु श्री देवेंद्रनाथ लघुकथा-१५" "दोन जति..!!"

आकाशात मेघांची गर्दी झाली!
विजा चमकू लागल्या!
वादळी वारे वाहू लागले!
मेघ गर्जना सुरू झाल्या.
सर्वत्र काळोख झाला.
आता पाऊस सुरू होण्याची लक्षणे दिसू लागली तेव्हा श्री मच्छिंद्रनाथ धावत धावत एका झाडाखाली येऊन उभे राहिले व ते आकाशाकडे पाहू लागले!
काही ठिकाणी पाऊस पडत होता.
कारण  वातावरणांत मातीचा भिजका वास येत होता.
मच्छिंद्रनाथांनी त्याच झाडाखाली उभे राहण्याचा निर्णय घेतला..!

झाडाखाली उभे असतांना त्यांचं लक्ष एका माकडाने वेधल!
ते माकड पाऊस पडणार म्हणून दगड बाजूला करून मातीत गुंफा करू पाहत होतं!
मच्छिंद्रनाथांना हसू आलं ते त्या माकडाला म्हणाले, 'अरे वेड्या आता पाऊस पडायला लागल्यावर  गुंफा करतोस ?
आता तुझी गुंफा होणार कधी ?
आणि तू राहणार कधी ?

अरे वा!
तू तर स्वतः फार मोठा हुशार समजतोस ?
माकड म्हणाले.

ह्यात कसली आलीय हुशारी!
पण तुझा हा आत्या वेळ्या प्रयत्न पाहून बोलावसं वाटलं म्हणून बोललो!
राग आला का ?
मच्छिंद्रनाथ विनयाने त्या माकडास म्हणाले.'

नाव काय तुझं ?

जति मच्छिंद्रनाथ!

जति ?

हो जति!
का ?

जति मला तर एकच माहित आहे दुसरा जति आजच पहातोय ?
माकड आश्चर्याने म्हणाले.

कोणता जति तुला माहित आहे ?
मच्छिंद्रनाथांनी विचारलं.

जति हनुमान!
अंजनीसूत जति हनुमान!
तसा प्रताप आहे का तुझ्या अंगात.
का उगाच म्हणवतोस स्वतःला जति ?

माझ्या प्रतापाची मी कशाला स्तुती करू.
प्रसंग आल्यावरच दिसेलच!

'मग ऐक नीट.
आता प्रतापच दाखव तुझा!
मी हनुमानाचा सेवक आहे.
त्याचा एक हजारावा अंश माझ्यात आहे.
आता दाखव तुझा प्रताप'
असे म्हणून ते माकड बाजूला झाले व त्याने उड्डाण करून विशाल रूप धारण केले!

मच्छिंद्रनाथांनी ते रूप पाहिल्यावरच ते त्या माकडाचा विचार करू लागले.
तोच त्या माकडाने सात पर्वत एकदम उचलून श्री मच्छिंद्रनाथांवर फेकले.
श्री मच्छिंद्रनाथांनी वात प्रेरक मंत्र म्हटला व त्या पर्वतांना स्थिर स्थिर असे म्हणाले!
त्याबरोबर ते पर्वत तिथल्या तिथेच थांबले!
माकड अधिकच चिडले व त्या विषाल देहाने शेकडो पर्वत मच्छिंद्रनाथांच्या अंगावर टाकण्यास सुरुवात केली.
पण सर्व पर्वतांना मच्छिंद्रनाथाने अस्त्र प्रयोगाने स्थिर केले!

एक प्रचंड पर्वत घेऊन ते विषाल देहाचे माकड धावत येवून मच्छिंद्रनाथांवर टाकणार तेवढ्यात मच्छिंद्रनाथाने समुद्राचे पाणी वायु आकर्षण मंत्र अभिमंत्रून जोराने अंगावर फेकले.
तत्क्षणी माकडाचा देह निकेतन झाला व तिथल्या तिथे तो खिळुन राहिला!
त्यावेळी वायुदेव समोर येऊन मच्छिंद्रनाथास म्हणाले, मच्छिंद्रनाथा! हा माझा पुत्र हनुमान आहे ह्याला मंत्रबंधनातून मुक्त कर!

वायुदेव! हा आपला पुत्र जति हनुमान आहे!

होय नाथा!

आश्चर्य!
माझ्याशी व्रुथा भांडण केले!
ठीक आहे!
असे म्हणून मच्छिंद्रनाथांनी  पुनः पाणी अभिमंत्रून मारुती रायाच्या शरीरावर टाकले.
थोड्या वेळाने मारुती शुद्धीवर आले व डोळे उघडून समोर पाहतात तो प्रत्यक्ष वायुदेव!

बाबा! कोणी हा प्रताप केला ?

मच्छिंद्रनाथांनी हनुमंता!
कलियुगांत ही नाथ पंथ प्रबळ शक्ती आहे त्यांच्याशी रळी करणं योग्य नाही!
भक्तिभावाने व हठयोगाने ते प्रबळ आहेत!

मला माहित आहे वायुदेवा!
चला मच्छिंद्रनाथांकडे जाऊ!

असे म्हणून वायुदेव व वायुसुत हनुमान दोघेही मच्छिंद्रनाथाकडे आले.
वायुदेवास व हनुमानास मच्छिंद्रनाथाने नमस्कार केला.
त्यांचा विनय पाहिल्यावर हनुमान हसत म्हणाले की, एका जति ऐवजी आता दोन जति झाले हे दोन्ही जतींना कळले!
मच्छिंद्रनाथा तुझा प्रतापच असा आहे की तू जति म्हणवून घेतल तर ते जति शब्दालाहि सार्थक आहे!

हनुमंता कशाला एवढी स्तुती करता.
ही रळी तुम्ही मुद्दाम केलीत.
नाग अश्वत्थ वृक्षाच्या खाली आपली भेट झाली असताहि माकडाचं रूप घेऊन मला युद्धप्रवृत्त केलत!
का असं केलत ?

नाथा तुझ्या शक्तिचा प्रभाव पाहिला!
नाग अश्वत्थ वृक्षाच्या झाडाखाली भेट झाल्यावर आपण प्रथमच भेटलो.
आज तुला पाहिल्यावर वाटलं किती साबरी तेज मिळविल आहे ते पहावं म्हणून ही रळी झाली!

हनुमंतराया, तसं नाही.
तुमच्या मनांत काही संकल्प होता म्हणूनच तुम्ही माहित असूनही हे असं केलंत!

मच्छिंद्रनाथ! अंतर्ज्ञानहि चांगलं आहे!
तुला एका कामावर पाठवायचे आहे.
त्यासाठी किती तू पक्का झाला आहेस ते आधी पाहिलं!

कोणत्या कामावर!
आदेश द्या.
तुमच्यासाठी वाटेल तिथं जाऊ हनुमंता!

मच्छिंद्रनाथ!
इतकं सोपं काम नाही.
सद्गुरु कोणतहि काम सोप करीतात!

मच्छिंद्रनाथा, तुला बंगाल देशात स्त्रीराज्यात जावं लागेल!

स्त्री राज्यात मी कशाला जाऊ ?

कवि नारायणा, आपण अंतरज्ञानी.
आपल्याला त्रिकालज्ञान आहे.
आपणास सर्व काही पुनः पुनः सांगावयास हवे का ?

माझ्या काहीच लक्षात येत नाही, मारुतीराया!
मच्छिंद्रनाथ शांतपणे म्हणाले.

मच्छिंद्रनाथा, मी मैनाकिनीला वचन दिलं आहे की, कवी नारायणाला-मच्छिंद्रनाथाला मी स्त्री राज्यात आणीन व तुझ्याशी तो विधि युक्त विवाह करून तुला सांसासारिक सुखाचा भोग देईल!

हनुमंता!
हा काय विनोद करीता का ?
मी आणि विवाह ?
हनुमंता मी योगी जति.
मी विवाह केला तर पंथाचं काय होईल ?
-मच्छिंद्रनाथ आश्चर्याने म्हणाले.

नाथा! पंथाचं काय होणार ?
पंथ वाढतच राहील!

पण आदर्शांचं काय ?

आदर्श जतिचाच राहील!

तो कसा ?
मच्छिंद्रनाथ पुनः आश्चर्याने म्हणाले.

नाथा! मी ही जति आहे!
माझ्या भुः भुः काराने स्त्री राज्यांतील स्त्रिया गर्भधारण करीतात!
तरीही मी ब्रह्मचारी आहेच!
समजावीत हनुमंतराया म्हणाले.

तुम्ही उर्ध्वरेते आहात!
मच्छिंद्रनाथ म्हणाले.

आणि तू ?
तू ऊर्ध्वरेता नाहीस का ?
स्वतःला जति म्हणवतोस ना ?
-शब्दांत पकडत मारुती म्हणाला.

होय हनुमाना, मी जति आहे व उर्ध्वरेताहि आहे.
पण हे न समजणारे मला काय म्हणतील ?
खोचक प्रश्न मच्छिंद्रनाथांनी विचारला.

काय म्हणणार ?
संसारात, मायेत गुंतला असंच म्हणतील खरं ना ?

होय हनुमंता.
मी कौलाचारी आहे.
तंत्राचा सूक्ष्म अभ्यास करून हठयोगात पारंगत आहे.
१४ विद्येत प्रवीण असून अस्त्रविद्येतील नैपुण्य देवादिकांनी मान्य केलं आहे!
लोहांगुष्ठी तप केल आहे.

हे सारं विसरून जातील व समाज व योगीजन मला मायेत फसला म्हणतील!
माझ्या शिष्यालाहि हा मायावी विदेही अवस्थेचा जति सामर्थ्याची जाणीव नसेल व तोहि मला दुराचारी म्हणेल.
मारुतीराया ह्या विषयांत मला गुंतवू नकोस.

मच्छिंद्रनाथा, ऊर्ध्वरेता तू इतका घाबरतोस ?
तुला तुझ्यावर विश्वास नाही ?
तू जति!
तुला पाप आणि पुण्य, प्रसिद्धी-कुप्रसिद्धी, लोभ- माया, माया-योग ह्याचा काय विचार ?
आचार वामाचाराचा तू कोण वाचार करणारा ?
एका जतिवर दुसऱ्या जातिचा विश्वास नाही का ?

हनुमंता! ठीक आहे पण असा हा वास मी किती वर्षे तिथं ठेऊ!

फक्त बारा वर्षेss!

का ?
'फार वाटतात का का थोडी वाटतात'
हंसत हनुमानजी म्हणाले!

हा काळ कमी नाही का करता येणार ?

मच्छिंद्रनाथ, बारा वर्षात तुझा एक ग्रंथ पुरा होईल तिथं!

मच्छिंद्रनाथा, बारा वर्षात तुझा एक ग्रंथ होईल तिथं!

कोणता ?

कौल ज्ञानाचा!

त्यांची रचना तिथं कशाला करू ?

तिथं स्त्रियांच्या सानिध्यात करावयाच्या साऱ्या तंत्र साधना तुला प्रत्यक्ष आजमाविता येतील व स्वानुभवावर आधारलेली ग्रंथरचना सिद्धांताच्या स्वरूपात तुला करता येईल.

हाच बारा वर्षातील स्त्री राज्यांतील खरा प्रसाद तुझ्या नाथपंथीयांना असेल ते याचा अभ्यास केल्यावर तुला मायावी म्हणतील पण भोगी नाही म्हणणार!

हनुमंता, आपण जति, गोड वाणीनं मला मोहून टाकलत.
आपल्या इच्छेप्रमाणे मी करीन!

हीच उमेद होती तुझ्याकडून, तुझ्या ह्या साधन काळात तुला कोणी त्रास देणार नाही ह्याची काळजी मी घेईन व तुझा यथा विधी मैनाकिनीशी विवाह लावून देईन!
हसत हनुमानजी म्हणाले.

ठीक आहे!
आता वायुसूताच्या इच्छेप्रमाणे करायचं ठरविलंच आहे.
तर जे जे करावे व भोगावे लागेल ते भोगू!
मच्छिंद्रनाथहि हसत मारुतीला म्हणाले.

छान! आता माझी एक जबाबदारी कमी झाली.
मैनाकिनीची इच्छा पुर्ण करण्याचं एका जतिने दिलेलं वचन दुसरा जति पूर्ण करील!

पण ताबडतोब नव्हे!

मग केव्हा!

माझी जेवढी तिर्थे राहिली आहेत ती सारी पुरी झाल्यावर मग मी स्त्री राज्यात जाईन!

मच्छिंद्रनाथ निग्रहाने म्हणाले.

ठीक आहे!
पण नंतर तरी जाणार ना ?

'एका जतिने दुसऱ्या जातिस वचनातून मुक्त करण्यासाठी दिलेला शब्द आहे हा'
हसत मच्छिंद्रनाथ म्हणाले
व नंतरही दोघेही मन मोकळेपणाने हसले.

दोघांनी एकमेकांना नमस्कार केला व पुढे जाऊ लागले.
मच्छिंद्रनाथ पुढे त्याच जंगलातून जाऊ लागले!
पाऊस पडतच होता कोठे निवारा मिळेल का म्हणून नजर इकडे-तिकडे सारखी फिरत होती तोच रामेश्वराचे मंदिर दिसू लागले!
घंटा-नाद ऐकू येऊ लागला!

मच्छिंद्रनाथही झप झप पावलं टाकत घुंगुराच्या नादात श्रीरामाचे स्मरण करीत रामेश्वर मंदिराकडे जाऊ लागले.........!!

 लेखक- सद्गुरु श्री देवेंद्रनाथ

 संदर्भ- सद्गुरु श्री देवेंद्रनाथ यांच्या "अलख निरंजन १९७७ " मधून

श्री देवेंद्रनाथ शिष्य- ९८२२२५४१९०

 जय सद्गुरू श्री देवेंद्रनाथ💐🙏🏻
close