shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

चेतेश्वर पुजाराने ढाल बनून भारताला विजयी पथावर नेले..!!

क्रिकेटच्या असंख्य स्वयंघोषित पंडितांनी ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारत ४- ० असा पराभूत होईल अशी भविष्यवाणी वर्तवली होती. अशा सर्व तमाम लोकांच्या घशात त्यांचे दात घालून भारताने आश्चर्यकारकरित्या ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच भूमीत माती चारत मालिका खिशात घातली. कसोटी मालिका जशी सुरू झाली. 

तशी भारतीय संघाला खेळाडूंच्या दुखापतीची पणवती लागली. एका मागून एक भारताचे किंमती मोहरे जायबंदी होऊन संघाबाहेर गेले. ब्रिस्बेनच्या शेवटच्या कसोटीपूर्वी तर भारतीय संघासमोर अकरा तंदुरूस्त खेळाडूंचा संघ निवडण्याचे आव्हान उभे राहीले होते. टि नटराजन व वॉशिंगटन सुंदर या खेळाडूंनी नाट्यमयरित्या कसोटी पदार्पण केले. 

भारताच्या मुळ संघात नसलेल्या या दोन खेळाडूंनी संपूर्ण दौऱ्यात भारताच्या फलंदाजांना नेटमध्ये गोलंदाजी करण्याचं " नेट गोलंदाज " म्हणून काम केलं होतं. परंतु प्रमुख खेळाडूंच्या दुखापती त्यांच्या पथ्यावर पडल्या. त्यांनी या मिळालेल्या संधीचे सोने करत स्वतःला रातोरात प्रकाशझोत मिळवून दिला.

विराट कोहली पहिल्या कसोटीतील दारूण पराभवानंतरही आपल्या भूमिकेवर ठाम राहीला व कौटुंबिक कारणास्तव मायदेशी परतला. त्यानंतर अजिंक्य राहणेने संघाची धुरा हाती घेताच संघात नवीन चैतन्य आणलं. या मालिकेपूर्वी अजिंक्य राहाणेकडेही कसोटी नेतृत्वाचाही फारसा अनुभव नव्हता. मात्र त्याने यापूर्वी कर्णधारपद भूषविलेल्या दोनही कसोटया जिंकलेल्या असल्यामुळे त्याचा कर्णधारपदाचा रेकॉर्ड चांगला होता. त्याच आत्मविश्वासाने त्याने या दौऱ्यातील तीन कसोटयात नेतृत्व करत भारताला मालिकेत निर्भेळ यश मिळवून दिलं. अजिंक्य राहणेने स्वतःचे नाव सार्थकी करत भारताला अजिंक्य करून स्वतःही कर्णधार म्हणून अजिंक्य राहीला.

ब्रिस्बेन कसोटीच्या अगोदर ऑस्ट्रेलियाचा संघ गेली ३३ वर्ष अपराजित होता. त्यामुळे त्यांच्या डोक्यात अघोरी हवा शिरली होती. या अति आत्मविश्वासाच्या जोरावर तर ऑस्ट्रेलियन  संघासह  त्यांचे माजी खेळाडू, प्रसार मध्यमांनीही ऑस्ट्रेलियाचाच विजय गृहीत धरला होता. भारतीय खेळाडूंना ऑस्ट्रेलियाच्या विद्यमान संघातील बऱ्याच खेळाडूंनी भारतीय संघाला गाबावर बघून घ्यायचे खुले आव्हान दिले होते. 

गाबा कसोटीत भारताच्या या संघात कर्णधार अजिंक्य राहाणे व चेतेश्वर पुजारा हेच दोन कसोटीत संघात खेळलेले खेळाडू होते. तर संघातील पाच गोलंदाजांकडे केवळ चार कसोट्यांचा अनुभव होता. त्यामधील वॉशिंग्टन सुंदर व नटराजन हे तर पदार्पण करत होते तर यापूर्वी शार्दूल ठाकूरने केवळ तांत्रिकदृष्टया कसोटी पदार्पण केले असल्याने तोही नवोदितातच गणला जात होता.
प्रत्यक्ष कसोटी सामन्यात भारताच्या प्रत्येक खेळाडूने परिपक्वतेचे दर्शन घडवित ऑस्ट्रेलियाला चक्रव्यूहात टाकले. ऑस्ट्रेलियाला अखेरपर्यंत हे चक्रव्यूह भेदता आले नाही. सुंदर, ठाकूर, नटराजनने कांगारूंच्या प्रत्येकी तीन फलंदाजांना बाद करत आपली चुणुक दाखवून दिली तर फलंदाजी करताना पहिल्या डावात भारताचा डाव संकटात असताना वॉशिंग्टन सुंदर व शार्दूल ठाकूरने सामन्याला कलाटणी देणारी भागीदारी केली. यामुळे भारतीय संघाच्या देहबोलीत लक्षणीय बदल झाला.

कांगारूंच्या दुसऱ्या डावात मोहम्मद सिराजने पाच तर शार्दूल ठाकूरने चार बळी घेत कांगारूंच्या डावाला लगाम घालत विजयाचे स्वप्न दाखविले. ठाकूर व सुंदरने कसलेल्या फलंदाजांसारखी फलंदाजी करत तेही कोणापेक्षा कमी नसल्याचे दाखवून दिले. विशेष म्हणजे त्यांच्या अष्टपैलूत्वाची चमक सर्वांना भुरळ पाडून गेली.

भारताचे शुभमन गिल, सुंदर, नटराजन, ठाकूर, सिराज व पंतने या सामन्यात दृष्ट लागण्याजोगी कामगिरी केली. तर अनुभवी चेतेश्वर पुजाराने आपल्या धिरोदात्त खेळाचे दर्शन घडविले. एकेकाकी राहुल द्रविड भारताची अजोड भिंत म्हणजेच " वॉल " म्हणून प्रसिद्ध होता पण या सामन्यात आपल्या शरिराच्या प्रत्येक अवयवावर ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचे उसळते चेंडू झेलून तो संघाची " ढाल " बनला. त्याच्या कणखर बाण्यामुळेच पंत व गिलला लढण्याचे बळ मिळाले.

पहिल्या कसोटीत अवघ्या ३६ धावात झालेला बदल बघून समस्त क्रिकेट विश्व स्तंभित झाले असून कर्णधार अजिंक्य राहणे, प्रशिक्षक रवी शास्त्री व त्यांचा ताफा नक्कीच कौतुकास पात्र ठरला असून ही कसोटी मालिका जखमी वाघांनी घमंडखोर ऑस्ट्रेलियन्सला ताळ्यावर आणलेली मालिका म्हणूनच गणली जाईल. 

लेखक : -  
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक. 
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत. 
Email:  dattavighave@gmail.com
close