विद्याधर साळवे । राजगुरूनगर प्रतिनिधी दि.२3
पुरंदर तालुक्यातील नागरिकांचा विमानतळाला विरोध असेल तर विमानतळ खेड तालुक्यातील सेझ (विशेष आर्थिक क्षेत्र) मध्ये करावे अशी मागणी राज्य शासनाकडे खेड तालुक्यातील जनतेच्या वतीने आहे.अशी माहिती खेडचे आमदार दिलीप राव मोहिते पाटील यांनी आज (दि. 23 ) रोजी पत्रकारांशी बोलताना दिली.
शनिवार (दि.23) जानेवारी रोजी खेड पंचायत समितीत पार पडलेल्या एका कार्यक्रमानंतर आमदार दिलीपराव मोहिते पाटील पत्रकारांशी वार्तालाप करताना बोलत होते.यावेळी पुणे जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे, राष्ट्रवादी खेड तालुका अध्यक्ष कैलासराव सांडभोर पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य अरुण चांभारे व इतर मान्यवर उपस्थित होते.खेड तालुक्यातून विमानतळ गेल्यामुळे तालुक्यातील जनतेमध्ये निराशेचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु पुरंदर तालुक्यात विमानतळास विरोध होत असल्यास ते विमानतळ पुन्हा खेड तालुक्यात झाल्यास तालुक्यात आशादायक वातावरण निर्माण होईल या विमानतळाचा फायदा चाकण , रांजणगाव , भोसरी एमआयडीसी मधील उद्योजकांना व नागरिकांना मोठ्या प्रमाणावर होईल.आमच्या खेड तालुक्यातून नेलेले विमानतळ आम्हाला परत द्या अशी राज्यशासनाकडे आमची आग्रही मागणी असून विमानतळास खेड तालुक्यातील सेज विशेष आर्थिक क्षेत्रांमध्ये कोणतीच तांत्रिक अडचण नाही.
यावेळी पत्रकारांशी बोलताना आमदार दिलीपराव मोहिते-पाटील म्हणाले, खेड तालुक्यात औद्योगिक व कृषी क्षेत्र मोठ्या प्रमाणात असून खेड तालुक्याच्या प्रगतीसाठी विमानतळाची नितांत गरज आहे. सध्या पुरंदर तालुक्यातील प्रस्तावित मंजूर विमानतळाला तेथील स्थानिक लोकांचा तीव्र विरोध होत आहे. त्यामुळे प्रत्यक्ष भूसंपादन प्रक्रिया पार पडून विमानतळ उभारणीस अनिश्चित कालावधी लागू शकतो परंतु खेड तालुक्यात विमानतळाबाबत काही तांत्रिक अडचणी असल्यास नवीन तंत्रज्ञानाच्या आधारे या तांत्रिक गोष्टींवर मात करून खेड तालुक्यात विमानतळ उभे राहू शकते असा विश्वास यावेळी आमदार मोहिते पाटील यांनी बोलून दाखविला.
--------------------------------------------------------------------------------

