shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

संगमनेर येथे कोरोना प्रतिबंध लसीकरणाला सुरुवात..!!

घुलेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात लसीकरणाचे नियोजन

शिर्डी । प्रतिनिधी :
केंद्र, राज्य शासन आणि आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या निर्देशानुसार संगमनेर येथील घुलेवाडी ग्रामीण रुग्‍णालय येथे आज कोरोना प्रतिबंध लसीकरणाला उत्साहात सुरुवात झाली. आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना यावेळी लस देण्यात आली. शासनासह कोरोना योध्दे, पोलीस कर्मचारी, स्वयंसेवी संस्था, नागरिक कोरोना प्रादूर्भावावर मात करण्यासाठी कार्यरत होते. या पार्श्वभूीवर कोरोना लसीकरण होत असल्यामुळे सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता. 

लसीकरणानंतर संबधितांचे योग्य ते निरिक्षण आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात येत आहे. या मोहिमेचा शुभारंभ प्रांताधिकारी शशिकांत मंगरुळे यांच्याहस्ते करण्यात आला. तहसीलदार तथा इन्सीडंट कमांडर अमोल निकम, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.भास्कर भंवर, वैद्यकीय अधिकारी डॉ.संदीप कचेरीया, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.सुरेश घोलप, वैद्यकीय अधिकारी डॉ.सीमा घोगरे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ. सचिन बांगर, गट विकास अधिकारी सुरेश शिंदे, आरोग्य सहायक विनायक वाडेकर, सतीश बुरंगुले, कैलास ढगे तसेच आरोग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

वैद्यकीय अधिकारी डॉ.श्रीमती छाया लोहारे, डॉ.वाबळे, डॉ.मालपाणी यांना कोरोना प्रतिबंध लस देऊन लसीकरणाची सुरुवात करण्यात आली.

लसीकरणाच्या लाभार्थ्यांची पोर्टलवर नोंदणी करण्यात आली असून, दररोज शंभर लाभार्थ्यांना लसीकरण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे अशी माहिती प्रांताधिकारी शशिकांत मंगरुळे यांनी दिली. लसीकरण झाल्यावरही मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सींगचे पालन करावे, असे आवाहन वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केले. लसीकरण मोहिमेची सर्व तयारी आरोग्य प्रशासनाने पूर्ण केली आहे. त्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. 

संबंधित लसटोचक आणि पर्यवेक्षक यांचे यासंदर्भात प्रशिक्षणही पूर्ण झाले आहे. लसीकरण मोहिमेतील या पहिल्या टप्प्यात केवळ आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिली जाणार आहे. कोरोना प्रादूर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने जारी केलेल्या दिशानिर्देशांचे लसीकरणादरम्यान पालन करण्यात आले.
close