shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

भारतीय संघामागे दुखापतींचा ससेमिरा कायम ..!!



                   सन २०२० साल संपले. या वर्षात अनेक चित्र विचित्र घटना घडल्या. वर्षाच्या सुरुवातीलाच संपूर्ण जगभर कोविड-१९ म्हणजेच कोरोना व्हायरसने थैमान घातले. या अचानक आलेल्या महारोगाने अनेकांचे जनजीवन विस्कळीत केले तर कित्येकांचे आयुष्यच उध्वस्त झाले. कोरोना व्हायरसने जगातले कोणतेच क्षेत्र सोडले नाही की जे प्रभावित झाले नाही. सर्वसामन्यांचे तर खाण्यापिण्यापासून हाल झाले.

                     या सर्व धामधुमीत क्रिडा क्षेत्रही मोठया प्रमाणात हतबल झाले होते. खास करून क्रिकेट संदर्भात चर्चा करायची झाली तर या लोकप्रिय खेळालाही जवळ जवळ सहा महिने पूर्णपणे बंद ठेवावे लागले. २९ मार्च २०२० पासून होऊ घातलेली जगातील सर्वात लोकप्रिय व यशस्वी ठरलेली लिग आयपीएल स्पर्धाही स्थगित करावी लागली होती. नोव्हेंबर - डिसेंबर २०२० मध्ये होणारी टि-२० विश्वचषक स्पर्धाही पुढे ढकलण्यात आली. अनेक देशांच्या द्विपक्षीय मालिकाही रद्द करण्यात आल्या.
                      शेवटी जुलै २०२० मध्ये इंग्लंडने साहसी पाऊल उचलत विंडीजला आपल्या देशात खेळण्यास बोलविले. त्यानंतर हळूहळू आंतरराष्ट्रीय स्तरावर  कोरोना व्हायरस संदर्भातील सर्व नियमांचे पालन करत क्रिकेट खेळले जाऊ लागले. १९ सप्टेंबर २०२० इंडियन प्रिमियर लिग युएईत सुरू झाली. खेळाडूंना जैविक सुरक्षा कवचात ठेऊन स्पर्धा यशस्वीही करण्यात आली.
                       संपूर्ण जगभर असलेल्या लॉकडाऊनमुळे क्रिकेटच्या सर्व गतिविधी बंद असल्याने खेळाडूंनाही सराव व फिटनेस राखण्यात अचडणी आल्या. तरीही जगभरातील बरेच खेळाडू स्वतःला फिट राखून आयपीएलमध्ये खेळले.
                        नेमके याच आयपीएल स्पर्धेच्या सुरुवातीलाच युएईमध्ये चेन्नई सुपर किंग्जचे ऋतूराज गायकवाड व दिपक चहार कोरोना बाधीत झाले. सीएसकेच्या जवळ जवळ तेरा सदस्यांना कोरोना व्हायरसने आपल्या विळख्यात घेतले होते. आयपीएल स्पर्धा सुरू झाल्या नंतर जगभरातून आलेल्या बऱ्याच खेळाडूंनाही दुखापतींनी ग्रासण्यास सुरूवात झाली.
                      या स्पर्धेच्या सुरूवातीलाच दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणारा भारताचा प्रमुख वेगवान गोलंदाज इशांत शर्मा दुखापतग्रस्त झाला व संपूर्ण स्पर्धेतून बाद झाला. त्याची दुखापत इतकी गंभीर होती की, त्यानंतर होऊ घातलेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी त्याची भारतीय संघात निवड होऊ शकली नाही. तिच अवस्था सनरायझर्स हैद्राबादचा गोलंदाजीचा कणा असलेल्या भुवनेश्वर कुमार बाबत घडली. त्यालाही आयपीएल बरोबरच ऑस्ट्रेलिया दौऱ्याला मुकावे लागले.
                     आयपीएल स्पर्धा चांगलीच रंगात आली असताना सनरायझर्सकडून खेळणारे भारतीय खेळाडू विजय शंकर व यष्टीरक्षक फलंदाज ऋध्दीमान साहा जखमी झाले. संघाची गरज ओळखून भारतीय संघ प्रबंधंनाने ऋध्दीमान साहाला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर नेले. त्याच्यावर जलद उपचार करून कसोटी मालिकेपूर्वीच फिट केले. त्याला पहिल्या कसोटीत खेळण्याची संधीही दिली. दुर्देवाने त्या कसोटीत तो अपयशी ठरल्याने त्याला संघाबाहेर व्हावे लागले.
                      आयपीएल दरम्यानच मुंबई इंडियन्सचा कर्णधार व भारताचा आघाडीचा फलंदाज रोहीत शर्मा हॅमस्ट्रिंगमुळे अडचणीत आला. आयपीएलचे ४ सामने तो मुकला. परंतु शेवटचा साखळी, क्वॉलिफायर - वन व अंतिम सामना तो खेळला. अंतिम सामन्यात त्याने सामनावीर पुरस्कार मिळवत संघाला विक्रमी विजेतेपदही मिळवून दिले. परंतु या दरम्यान त्याची दुखापत चांगलीच चिघळली. त्यामुळे त्याला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर न निवडता बंगलोरला एनसीएत पुनर्वसन प्रक्रीयेसाठी पाठविले. या दरम्यान त्याला वन डे, टि-२० मालिका व पहिल्या दोन कसोटयांना मुकावे लागले.
                        केकेआरकडून आयपीएलमध्ये लक्षवेधक कामगिरी केल्याने भारतीय संघात स्थान मिळालेला मिस्ट्री स्पिनर वरूण चक्रवर्तीला शेवटच्या साखळी सामन्यात दुखापत झाली व त्याची ऑस्ट्रेलिया वारी हुकली.
                         ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील वनडे व टि २० मालिका भारतीय खेळाडूंना दुखापतींबाबत बऱ्यापैकी गेल्या. परंतु अॅडलेडच्या पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या डावात भारताचा संघ अवघ्या ३६ धावात गारद झाला. त्याच डावात भारताचा प्रमुख वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी जखमी झाला. त्यामुळे त्याला मायदेशी परतावे लागले.
                         मेलबोर्नच्या " बॉक्सिंग डे " कसोटीत ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात गोलंदाजी टाकताना आणखी एक हुकमी जलदगती गोलंदाज उमेश यादवच्या पायाला दुखापत झाली. त्यामुळे तो त्या सामन्याबरोबरच उर्वरीत मालिकेलाही मुकला व पुढील इलाजासाठी मायदेशी परतला.
                          सात जानेवारील सुरू होणाऱ्या सिडनीच्या तिसऱ्या कसोटीपूर्वी भरवशाचा फलंदाज चेतेश्वर पुजाराचा अंगठा जखमी झाला. हे कमी की काय म्हणून या कसोटी मालिकेत संधी न मिळालेला फलंदाज के.एल राहुलच्या मनगटाला सरावा दरम्यान शनिवारी दुखापत झाली. त्याची दुखापत गंभीर असल्याने त्याला मायदेशी परतावे लागले. पुढील दोन कसोट्यात त्याच्या सेवेची गरज भारताला लागण्याची शक्यता होती. मात्र त्याच्या मायदेशी परतण्याने संघाला मोठा हादरा बसला आहे.
                         संघातील महत्वाच्या खेळाडूंना होत असलेल्या दुखापती उपलब्ध खेळाडूंच्या मानसिकतेवर कुठलाच परिणाम करणार नाही. या अपेक्षेसह भारतीय संघास उर्वरीत सामन्यांसाठी शुभेच्छा देऊया !       

लेखक : -  
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक. 
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत. 
Email:  dattavighave@gmail.com
close