तपास लावण्यात सोनई पोलीस यंत्रणा अपयशी .. ?
प्रतिनिधी । मोहन शेगार :
सोनई- घोडेगांवचे ग्रामदैवत असलेले श्री घोडेश्वरी देवीच्या मंदिरातुन १७ किलो चांदीची धाडसी चोरी होवुन ३ महिन्याचा कालावधी झाला तरी अजुनही दागिने चोरुन नेणाऱ्या चोरट्यांना पकडण्यासाठी पोलिसांना अजुनही यश आले नाही.
दि. १९ नोव्हेंबर २०२० रोजी घोडेगावचे ग्रामदैवत श्री घोडेश्वरी देवीच्या मंदिरात चोरट्यानी सुमारे १७ किलो चांदीचे दागिने चोरून नेले. या गुन्ह्याचा तपास लागत नसल्याने ग्रामस्थांनी दि. १ डिसेंबर २०२० रोजी घोडेगाव चौफुल्यावर रस्ता रोको आंदोलन केले गेले. या आंदोलनात महिला, व गावकरी देखील मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. शेवगाव उपविभागाचे पोलिस उपअधीक्षक सुदर्शन मुंडे यांनी येऊन ग्रामस्थांना आंदोलन मागे घेण्याची विनंती केली.
आंदोलनात सहभागी झालेल्या महिलांच्या हस्ते उपअधीक्षक मुंडे आणि सोनई पोलिस ठाण्याचे तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक रामचंद्र कर्पे यांना लेखी निवेदन देण्यात आले. त्यानंतर आंदोलन मागे घेतले. परंतु आज सदरच्या चोरी प्रकरणाला तीन महिन्यापेक्षा जास्त कालावधी होवूनही तपासात कुठल्याही प्रकारची गती आलेली दिसत नाही. पोलीस कुठल्याही प्रकारचा तपास या प्रकरणात करत नसल्याचा आरोप सर्वसामान्य नागरीकांकडून केले जात आहेत. सदर प्रकरणाचा तपास लागणार की नाही अशी शंका ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत.
दरम्यान पोलीस खात्यावरील विश्वास टिकवण्यासाठी तरी पोलीसांनी गांभिर्याने घेऊन हा तपास करावा अशी मागणी घोडेश्वरी देवीच्या भक्त व गावकरी करीत आहे
सोनईत मात्र अवैध धंदे जोरात..!
अवैध धंद्यांमुळे गुन्हेगारी वाढली. असून सोनई पोलीस ठाण्याच्या हद्दीत सध्या अवैध धंदे जोरात बोकाळलेले असताना सोनई पोलीसांकडून धंदे बंद करण्यासाठी कुठल्याही प्रकारचे प्रयत्न झालेले दिसून येत नाहीत.त्यामुळे परिसरात गुन्हेगारी वाढत आहे. त्यामुळे सोनई पोलीस ठाण्याला कर्तव्यदक्ष व धडाडीच्या पोलीस अधिकार्याची नेमणूक होणे गरजेचे आहे.
अनेक गुन्ह्याचा तपासात प्रगती येत नाही व अवैध धंद्याना उधान आल्याने सोनईकर पुर्णतःवैतागले असल्याचे दिसून येत आहे.

